'भाजपा घर,पक्ष फोडण्यात वस्ताद, अजित पवार मजबुरीने गेले असावेत'; विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 06:03 PM2024-08-13T18:03:52+5:302024-08-13T18:08:16+5:30
Vijay Wadettiwar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाला खोचक टोला लगावला.
Vijay Wadettiwar ( Marathi News ) : राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून नेत्यांनी दौरे वाढवले आहेत. पक्षफोडीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. आज बुलढाण्यात काँग्रेसचा मेळावा झाला, यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.
"बारामतीत तुतारी वाजणारच"; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं!
"भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचं घर फोडण्यात आणि पक्ष फोडण्यात वस्ताद आहे. त्यांना त्यात आनंद मिळतो, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. अजित पवार मजबुरीने तिकडे गेले असतील, हे आता त्यांना आता समजले असेल. आता त्यांना पश्चाताप होत असेल, असंही वडेट्टीवार म्हणाले.
"येणाऱ्या विधानसभेत भाजपाला ५०, ५५ च्या पुढे जाणार नाही असा त्यांचा सर्व्हे आहे. आता कितीही योजना आणल्या तरी काहीही फरक पडणार नाही. गुजरातला अस्मिता, स्वाभिमान या लोकांनी गहान ठेवला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. गुजरातला गुंतवणूक झाली तर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. महाराष्ट्रातील लोक गुजरातचे गुलाम झाले आहे, अत्यंत वाईट सुरू आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही राज्यातील लोकांनाच रोजगार दिला जाईल. पक्ष फोडण्यात भाजपाला आनंद होतो, इंग्रजांकडून यांनी शिकले आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
'योजनांसाठी तिजोरीत पैसे नाहीत'
आता राज्यातील सर्व योजनांना कात्री लावली आहे. आता या महिन्यात ७० टक्के पगाराचीच तरतुद आहे, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र बसून विधानसभा निवडणुकीवर चर्चा करणार आहे. अधिकाधिक जागा काँग्रेसने लढाव्या असं आम्हाला समोर येत आहे, लाडकी बहीण योजनेमुळे बहीण भुलून मत देईल असं त्यांच्या डोक्यात आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.