राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’साठी चंद्रपुरातून दोन हजारांवर कार्यकर्ते वाशिमच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 05:57 PM2022-11-14T17:57:42+5:302022-11-14T18:06:32+5:30
जाती-धर्मात निर्माण केलेली दरी मिटविण्यासाठी राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा; विजय वडेट्टीवार
चंद्रपूर :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काढलेल्या ‘भारत जोडो’ पदयात्रेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून ट्रॅव्हल्स व अन्य वाहनांद्वारे दोन हजारांवर कार्यकर्ते सोमवारी चंद्रपुरातून रवाना झाले. चंद्रपूरहून रवाना झालेल्या वाहनांना काँग्रेस नेते माजी बहुजन कल्याण मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा झेंडा दाखविला. ही मंडळी मंगळवार, दि. १५ रोजी वाशिम येथून पदयात्रेत सहभागी होणार आहेत. वाशिम आणि पातूर अशा दोन ठिकाणी या मंडळींचा मुक्काम असणार आहे.
भाजप विकासाच्या नावावर मते मागतात आणि धर्माचे राजकारण करतात. जाती-धर्मात तेढ निर्माण केला जात आहे. देशाची मालमत्ता विकली जात आहे. चीनने घुसखोरी करून सुमारे २०० किमीचा भूभाग बळकावला आहे, अशी टीका आमदार वडेट्टीवार यांनी यावेळी केली. देश मजबूत करण्यासाठी, जाती-धर्मांमध्ये निर्माण केली जात असलेली दरी मिटविण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही भारत जोडो पदयात्रा काढलेली आहे. देशाची जनता एकत्र असली तरच विकास साधता येतो. या पदयात्रेवर काहींनी टीका केली. मात्र, विरोधकांचा हा प्रयत्न फसला आहे. त्यावर त्यांनाच जनतेकडून उलट प्रतिक्रिया मिळत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. विविध धर्मांतील मंडळी आपल्या परीने राहुल गांधी यांची पदयात्रेदरम्यान भेट घेत आहेत. यावरून भारत जोडो पदयात्रेचे महत्त्व अधोरेखित होणार आहे, याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, माजी शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, बल्लारपूर तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चित्रा डांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी का नाही केली ?
चित्रा वाघ यांनी चंद्रपुरात येऊन चंद्रपूरची दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. त्या भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी का नाही केली ? त्यांना चंद्रपूरच्या दारूबंदीशी काय घेणे-देणे, असा सवाल यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच जगदंबा तलवार आणा; पण त्यासोबतच रोजगारही आणावा, असा टोला लगावत राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याने ५ लाख बेरोजगारांचा रोजगार हातून गेला आहे, अशीही टीकाही वडेट्टीवार यांनी केली.