भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो, कारण..., राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:37 AM2023-11-09T11:37:58+5:302023-11-09T11:38:17+5:30
भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो कारण आदिवासींनी मोठी आणि प्रगतीची स्वप्ने पाहावीत, असे त्यांना वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.
अंबिकापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भाजपवर आदिवासींचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप केला. भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो कारण आदिवासींनी मोठी आणि प्रगतीची स्वप्ने पाहावीत, असे त्यांना वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.
छत्तीसगडच्या अंबिकापूर मतदारसंघातील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधानांवर हल्ला चढवत म्हटले की, ते स्वत:ला इतर मागासवर्गीय (ओबीसी) व्यक्ती म्हणवतात, पण जेव्हा मागासवर्गीयांना पाठिंबा देण्याची वेळ येते तेव्हा ओबीसी ही जात नाही, असे ते म्हणतात.
राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या एका नेत्याने आदिवासी तरुणावर लघवी केल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल. ते जनावरांवर लघवी करत नाहीत, मात्र आदिवासींसोबत असे प्रकार करतात. ही भाजपची मानसिकता आहे. वनवासी म्हणजे जंगलात राहणारे. भाजप तुम्हाला वनवासी म्हणतो, आम्ही आदिवासी म्हणतो. भाजप तुमचे हक्क हिसकावून घेते.
शिकू नका, का म्हणतात?
- येत्या १५-२० वर्षात जंगले नाहीशी झाली तर वनवासी कुठे जाणार? ते (भाजप) तुम्हाला (आदिवासींना) म्हणतात की, इंग्रजी शिकू नका, कारण तुम्ही मोठी स्वप्ने पाहू नयेत किंवा ती पूर्ण होऊ नयेत, अशी त्यांची इच्छा आहे. पंतप्रधान प्रत्येक भाषणात स्वत:ला ओबीसी म्हणवून घेतात आणि ओबीसींच्या कल्याणाविषयी बोलतात. जातीची जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही केली तेव्हा ते म्हणाले की, एकच जात आहे आणि ती म्हणजे ‘गरीब’.
मग तुम्ही स्वतःला ओबीसी का म्हणता? एकच जात असेल तर तो श्रीमंत कोण, असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.
साहेबांनी आज सकाळीच सांगितले. सकाळी लवकर, माझ्या नामांकनाच्या वेळी माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सुरेश धिंगाणी यांच्या घरी ईडी पाठविली आहे. साहेब, छत्तीसगडियांना दुर्बल आणि भित्रा समजू नका. ते त्यांचा भात खातात तेही पूर्ण स्वाभिमानाने. छत्तीसगडियांच्या स्वाभिमानाची ही गोष्ट आहे.
- भूपेश बघेल,
मुख्यमंत्री, छत्तीसगड