आदिवासी युवकावर युरीन करणारा अटकेत, भाजप नेत्यांसोबत करतो काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:28 PM2023-07-05T13:28:19+5:302023-07-05T13:30:17+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते
मध्य प्रदेशात घडलेल्या एका घटनेनंतर सोशल मीडियातून संतापाची लाट उसळली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही अत्यंत संतापजनक घटना पाहून राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तात्काळ पोलिसांना निर्देश दिले होते. हातात सिगारेट असलेली एक मद्यधुंद व्यक्ती, पायऱ्यांवर बसलेल्या एका व्यक्तीवर युरीन (लघवी) करतानाचा व्हिडिओत दिसून येते. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता त्या विकृत व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती भाजपा कार्यकर्ता असून अनेक नेत्यांसमवेतचे त्याचे फोटोही समोर आले आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. ट्विट करत मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले, 'सिधी जिल्ह्यातील एक व्हायरल व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे. यानंतर मी, दोषीला अटक करून, कडक कारवाई करण्यात यावी आणि एनएसए देखील लावण्यात यावा. अशी सूचना प्रशासनाला दिली." त्यानंतर, काही तासांतच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याच्यातील आकूडपणा चालताना दिसून येतो. प्रवेश शुक्ला असं या व्यक्तीचं नाव असून तो आमदार केदार शुक्लाचा प्रतिनिधी असल्याचीही माहिती समोर आली. मात्र, माझा व त्याचा संबंध नसल्याचे आमदार केदार शुक्ला यांनी म्हटलंय.
आमदार केदार शुक्ला यांचे सुपुत्र यांच्यासमवेत प्रवेश शुक्ला सदैव सोबती असत. सीधी येथील सर्वच लोकांना माहिती आहे की, प्रवेश शुक्ला हा आमदार केदार शुक्ला यांचा कार्यकर्ता आहे. तर, कुबरी गावच्या लोकांनी सांगितले की, प्रवेश शुक्ला हा स्थानिक नेता असून तो आमदारांसमवेतच असतो. दरम्यान, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासमवेतही प्रवेश शुक्लाचे फोटो आता समोर आले आहेत. दरम्यान, प्रवेश शुक्ला तुरुंगात असून त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करुन भाजप नेत्यांवर टीका केली आहे. भाजप सत्तेच असताना आदिवासी व्यक्तींवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीच्या अमानवीय कृत्यामुळे माणुसकीला काळीमा फासली गेलीय. भाजपचा आदिवासी आणि दलितांवरील असलेल्या द्वेषाचा हाच खरा चेहरा आहे, जो समोर आलाय, असेही राहुल गांधींनी म्हटले.
भाजपा राज में आदिवासी भाइयों और बहनों पर अत्याचार बढ़ते ही जा रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 5, 2023
मध्यप्रदेश में एक भाजपा नेता के अमानवीय अपराध से सारी इंसानियत शर्मसार हुई है।
यह भाजपा का आदिवासियों और दलितों के प्रति नफ़रत का घिनौना चेहरा और असली चरित्र है!
पायऱ्यांवर बसलेल्या व्यक्तीच्या तोंडावर केली लघवी
व्हायरल होत असलेल्या या व्हडिओत एक गरीब व्यक्ती पायऱ्यांवर बसलेली दिसत आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत. निळी जीन्स आणि चेक्सचा शर्ट घातलेला एक माणूस तिच्यासमोर उभा आहे. तो सिगारेट ओढत या गरीब व्यक्तीच्या तोंडावर लघवी करत आहे. लघवी करणारा माणूस दारूच्या नशेत असल्याचे दिसते. एवढेच नाही, तर मद्यधुंद अवस्थेत लघवी करणारा माणूस एका भाजप नेत्याच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे. मात्र याची पुष्टी झालेली नाही.