Russia-Ukraine Crisis : बापरे! लेक युक्रेनमध्ये अडकली; भामट्याने फ्लाईट तिकीट देतो सांगून आईला घातला 44 हजारांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 08:25 AM2022-02-25T08:25:26+5:302022-02-25T08:35:18+5:30

Russia-Ukraine Crisis : युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीसाठी फ्लाईटचं तिकीट देतो असं सांगून एका आईला भामट्याने हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. 

Russia-Ukraine Crisis daughter stuck in ukraine thug grabbed rs 44000 from mp woman in the name of getting flight ticket | Russia-Ukraine Crisis : बापरे! लेक युक्रेनमध्ये अडकली; भामट्याने फ्लाईट तिकीट देतो सांगून आईला घातला 44 हजारांचा गंडा

फोटो - आजतक

googlenewsNext

नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला आहे. रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय अडकून राहिले आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीसाठी फ्लाईटचं तिकीट देतो असं सांगून एका आईला भामट्याने हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. 

मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये ही घटना घडली आहे. पीएमओ कार्यालयाचा कर्मचारी असल्याचं खोटं सांगून एका व्यक्तीने महिलेला फ्लाईट तिकीट मिळवू देऊ शकतो असं सांगितलं. तसेच तिच्याकडून तिकिटासाठी तब्बल 44,000 रुपये घेतले. पण दोन दिवस झाले तरी तिकीट न मिळाल्य़ाने आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विदिशाच्या वैशाली विल्सन यांची मुलगी सृष्टी युक्रेनमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करत आहे. पण युद्धबाबत माहिती मिळताच वैशाली यांना आपल्या मुलीची खूप काळजी वाटू लागली. मुलीला पुन्हा भारतात आणण्यासाठी त्या धडपड करू लागल्या. 

संधीचा फायदा उचलून तब्बल 44 हजारांचा गंडा

एका भामट्याने याच संधीचा फायदा उचलून त्यांना तब्बल 44 हजारांचा गंडा घातला. पंतप्रधान कार्यालयातून फोन केला आणि तिकिटासाठी पैसे पाठवायला सांगितले. महिलेने देखील मुलीच्या काळजीपोटी पटकन सांगण्यात आलेल्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठवले, पण दोन दिवस झाले तरी तिकीट न मिळाल्याने तिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून महिलेने ज्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवले त्या खातेधारकाचं नाव आणि पत्ता शोधत आहेत. काही जणांची चौकशी देखील करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

रशियाचा युक्रेनवर 'डबल अटॅक', वेबसाईटसह बँकांना केलं लक्ष्य

रशिया युक्रेनवर सातत्याने सायबर अटॅक करत आहे. एका रिपोर्टनुसार, रशियाने युक्रेनच्या सरकारी वेबसाइट्स, बँक आणि इतर संस्थाना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेननुसार, त्यांना गेल्या आठवड्यात चेतावणी मिळाली होती की हॅकर्स सरकारी एजन्सी, बँक आणि डिफेंस सेक्टरवर अटॅक करणार आहे. गेल्या काही दिवसात युक्रेनवर सातत्याने सायबर अटॅक्स होत आहे. यासाठी युक्रेनने रशियाला जबाबदार धरले आहे. नवीन रिपोर्टनुसार, युक्रेनवर पुन्हा एकदा सायबर अटॅक करण्यात आला आहे. यामध्ये अनेक बँकांच्या वेबसाइटसह संसदेच्या वेबसाईटला देखील निशाणा बनवण्यात आले आहे. मात्र, कोणत्या बँकांवर याचा परिणाम झाला आहे, याची माहिती युक्रेनने दिलेली नाही. 

Web Title: Russia-Ukraine Crisis daughter stuck in ukraine thug grabbed rs 44000 from mp woman in the name of getting flight ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.