धक्कादायक...! चिदंबरम लपल्याचे ठिकाण सीबीआय, ईडीला माहीत होते पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 06:01 PM2019-08-21T18:01:31+5:302019-08-21T18:03:26+5:30
चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले होते.
आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर चिदंबरम यांच्या चेन्नई येथील घरी सीबीआयचे पथक मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दाखल झाले होते. मात्र, चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले होते. मात्र, सुत्रांनुसार सीबीआय, ईडीला चिदंबरम कुठे लपलेत या ठिकाणाची माहिती असल्याचे समोर आले आहे.
तपास संस्थांमधील सुत्रांच्या हवाल्याने एका हिंदी वृत्तसंस्थेने (अमर उजाला) ही माहिती दिली आहे. सीबीआय, ईडीला चिदंबरम यांच्या लपण्याच्या जागेचा ठावठिकाणा माहिती होता. मात्र, जाणूनबुजून ते जोरबाग येथील घरी शोधायला गेल्याचे सांगण्यात आले.
एका गुप्तचर संस्थेने चिदंबरम यांच्या ठावठिकाण्य़ाबद्दल अचूक माहिती दिली होती. चिदंबरम नॉर्थ अव्हेन्यूयेथील एका घरामध्ये लपले होते. तपास संस्थांनी जर मनावर घेतले असते तर ते चिदंबरम यांना ताब्यात घेऊ शकले असते. तसेच संध्याकाळपर्यंत त्यांचा फोनही सुरू होता आणि या प्रकरणातील सर्व आदेश वरिष्ठांकडून येत होते, असा गौप्यस्फोट या सूत्रांनी केला आहे.
अर्ध्या रस्त्यात बदलली कार
सुत्रांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात हजर होते. तेथून निघाल्यानंतर ते जोरबाग येथील घरी गेले नाहीत. त्यांना सीबीआय, ईडी अटक करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून निघाल्यानंतर रस्त्यातच गाडी बदलली होती. आणि जवळपास 8 वाजेपर्यंत त्यांचा फोन सुरू होता. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.