काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या बंगल्यात महिलेचा गळफास; सुसाईड नोटमध्ये म्हणते, “आता सहन होत नाही...”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:55 PM2021-05-17T12:55:08+5:302021-05-17T12:57:49+5:30
३९ वर्षीय महिला सोनिया भारद्वाज हरियाणाच्या अंबाला येथील बालदेव नगर येथील रहिवासी आहे. तिच्या पतीचं नाव संजीव कुमार असं आहे.
भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या शाहपूरा परिसरात असलेल्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेते उमंग सिंघार(Umang Singhar) यांच्या बंगल्यात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या महिलेने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेच्या पर्समधून सुसाईड नोट जप्त केली आहे.
महिला तपास अधिकारी रिंकू जाटव यांनी सांगितले की, ३९ वर्षीय महिला सोनिया भारद्वाज हरियाणाच्या अंबाला येथील बालदेव नगर येथील रहिवासी आहे. तिच्या पतीचं नाव संजीव कुमार असं आहे. मयत महिला भोपाळमध्ये माजी मंत्री उमंग सिंघार यांच्या शाहपूर येथील बंगल्यात राहत होती. रविवारी या महिलेने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली. मात्र माजी मंत्र्यांच्या घरात महिलेने गळफास घेतल्याच्या बातमीनं मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
महिलेने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
या महिलेने ज्या रुममध्ये गळफास घेतला होता. त्याठिकाणी पोलिसांनी सुसाईड नोट आढळली. ज्यात महिलेने लिहिलंय की, मला तुमच्या आयुष्यात स्थान हवं होतं. आता मला सहन होत नाही. राग खूप येतो पण उत्तर मिळत नाही. त्यासोबत महिलेने तिच्या मुलाबाबत लिहलंय की, तू मला आवडतोस, परंतु मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. आय लव्ह यू. मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे असं त्यात म्हटलं आहे.
पोलीस करतायेत घटनेचा तपास
सध्या पोलीस या महिलेच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. या महिलेचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे. मागील २५ दिवसांपासून ही महिला या बंगल्यात राहत होती. तर माजी मंत्री उमंग सिंघारही आत्महत्येच्या २ दिवसापर्यंत बंगल्यातच राहत होते. तपासानंतरच या महिलेचे आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांच्यात काय संबंध होते? याबाबत खुलासा होऊ शकतो. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश भदौरिया म्हणाले की, महिलेचे पतीसोबत काही वाद सुरू होते. या महिलेला १८ वर्षाचा एक मुलगाही आहे. माहितीनुसार उमंग सिंघार यांनी त्यांच्या मतदारसंघात जावं असं या महिलेला वाटत नव्हतं. परंतु ते २-३ दिवसांपूर्वीच मतदारसंघात गेले होते. तर उमंग सिंघार म्हणाले की, मी स्वत: हैराण आहे. ती माझी चांगली मैत्रिण होती तिने असं का केलं? असं त्यांनी सांगितले.