धाराशिवमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन
By सूरज पाचपिंडे | Published: March 25, 2023 06:15 PM2023-03-25T18:15:32+5:302023-03-25T18:15:51+5:30
काँग्रेस नेते न्यायालयाचा अवमान करीत असल्याचा आरोप
धाराशिव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध नोंदवित शनिवारी धाराशिव येथे आंदोलन केले.
राहुल गांधी यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचा देशभरात भारतीय जनता पार्टीकडून निषेध नोंदविला जात आहे. शनिवारी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अवमान करणारे वक्तव्य केल्याने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे, याबद्दल काहीच न बोलत नाहीत. त्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करीत असल्याचा आरोप केला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा युवा मार्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी. जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, विजय शिंगाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज नळे आदी सहभागी झाले होते.