दाजीसाहेबांची गळाभेट, सोनिया गांधींना फोन; धुळ्यात राहुल गांधीनी जपली 'आपुलकी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 04:15 PM2024-03-13T16:15:47+5:302024-03-16T09:03:48+5:30
महागाई बेरोजगारी आणि भागीदारी हे या तीन मुद्द्यांवरच केंद्राची वाटचाल सुरू आहे हे तीन प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरला आहे अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी धुळ्यातील चौक सभेत केली
मुंबई/धुळे - सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज सोशल मीडियावर ट्विट करत काँग्रेसने महिलांसाठी देऊ केलेल्या ‘नारी न्याय गॅरंटी’ची घोषणा केली आहे. त्यानुसार, देशातील गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपयांची गॅरंटी देण्यात आली आहे. राहुल गांधी संध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज धुळे जिल्ह्यात त्यांची सभा झाली असून धुळ्यातून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. तर, सभेपूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते दाजीसाहेब पाटील यांची भेट घेऊन प्रकृतीची विचापूस केली.
महागाई बेरोजगारी आणि भागीदारी हे या तीन मुद्द्यांवरच केंद्राची वाटचाल सुरू आहे हे तीन प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरला आहे अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी धुळ्यातील चौक सभेत केली. भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने खासदार राहुल गांधी यांचे धुळ्यात आगमन झाले. धुळ्यात येताच त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची देवपूर येथील निवासस्थानी जाऊन घेतली. यावेळी त्यांनी कैसे है दाजी साहब? असं विचारित त्यांची गळाभेट घेत जादू की झप्पी दिली. तसेच, कुटुंबीयांशी संवाद साधला आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशीही फोनवरुन बोलणे करुन दिले.
दरम्यान, काही दिपवसांपूर्वी दाजीसाहेब पाटील कोल्हापूरला गेले असता अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यावेळी, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी, ते अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर होते. येथील उपचारानंतर त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती बरी असून राजकीय नेतेमंडळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घरी येऊन भेट घेत आहे. यासंदर्भाने राहुल गांधींना समजताच त्यांनीही घरी जाऊन दासीसाहेबांची भेट घेतली.
महिलांसाठी काँग्रेसची ५ गॅरंटी
दरम्यान, राहुल गांधींनी आज सोशल मीडियातून महिलांसाठी काँग्रेसकडून ५ गॅरंटीची घोषणा केली आहे. देशात काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांसाठी खालील ५ योजना सुरू केल्या जाणार आहेत.
१) महालक्ष्मी: सर्वात गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपयांची गॅरंटी
२) अर्धी लोकसंख्या, पूर्ण हक्क : केंद्र सरकारमध्ये सर्व नव्या भरती प्रक्रियांचा अर्धा हिस्सा हा महिलांसाठी आरक्षित करण्याची गॅरंटी.
३) शक्तीचा सन्मान : आशा, अंगणवाडी आणि मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या महिलांच्या वेतनामध्ये केंद्र सरकारचं योगदान दुप्पट करण्याची गॅरंटी
४) अधिकार मैत्री: सर्व पंचायतीमध्ये एका अधिकार मैत्रीच्या नियुक्तीची गॅरंटी, जे महिलांना जागरूक करून त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार देण्यासाठी मदत करतील
५) सावित्रीबाई फुले वसतीगृह : देशात नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहांची संख्या दुप्पट करणे, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वसतीगृत बांधण्याची गॅरंटी.