राहुल गांधींना जनादेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 05:29 AM2018-12-12T05:29:18+5:302018-12-12T05:33:04+5:30

काँग्रेसचा उत्साह कायम राहिला आणि येणाऱ्या काही महिन्यांत इतर पक्षांनी त्यांची ताकद वाढविली, तर लोकसभेच्या येत्या निवडणुकाही त्यांना जिंकता येणार आहेत. तशी भीती भाजपाच्या मनात आता निर्माणही झाली आहे.

acceptance of rahul gandhi increased after congress wins chhattisgarh rajasthan madhya pradesh assembly election | राहुल गांधींना जनादेश

राहुल गांधींना जनादेश

Next

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन हिंदी भाषिक राज्यात काँग्रेसने मारलेली जबरदस्त मुसंडी पाहता, लोकसभेच्या येत्या निवडणुकीच्या तयारीला मोदी, भाजपा व त्यांचा संघ परिवार यांनी आतापासूनच काही चांगल्या गोष्टी करणे आणि राममंदिरासारखे ईश्वरी मुद्दे बाजूला ठेवून माणसांच्या प्रश्नांकडे येणे आवश्यक आहे. या तीनही राज्यांत भाजपाचे सरकार होते. त्यातल्या मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये ते १५ वर्षांपासून सत्तेवर आहेत, तर राजस्थानात त्या पक्षाची सत्ता गेल्या पाच वर्षांपासून राहिली आहे. तेलंगणा व मिझोरम या दोन लहान राज्यांत भाजपाला यश मिळविता आले नाही आणि काँग्रेसच्याही जागा कमी झाल्या आहेत.

गेल्या चार वर्षांत मोदींच्या सरकारने ज्या तऱ्हेचा राज्यकारभार केला, तो सामान्य जनतेला गृहित धरणारा व धनवंतांचीच दखल घेणारा होता. नोटाबंदी, जीएसटी किंवा सगळ्या जुन्या संवैधानिक संस्थांची मोडतोड यांचा सामान्य जनतेवर अनिष्ट परिणाम होत राहिला आणि धनवंत माणसे मात्र त्यामुळे सुखावत राहिली. सामान्य माणसांना राम मंदिराचे स्वप्न दाखवून त्याच्या भुलभुलैयात त्याला आपण हरवू शकतो, या भ्रमातही त्यांचा पक्ष राहिला. एके काळी रोमचे सम्राट आपल्या दरिद्री प्रजेला भुलविण्यासाठी रथांच्या शर्यती, गुलामांच्या हाणामाऱ्या किंवा वन्यपशू व गुलामांच्या लढती असे खेळ जाहीरपणे करीत. तसा प्रकार भाजपाच्या पुढाºयांनी आता देशभर चालविला आहे. कला महोत्सव, नृत्यांचे उत्सव, गायनाचे व सिनेनटांचे कार्यक्रम यांना राष्ट्रीय कार्यक्रमाचे नाव देऊन त्यांचे उरूस ते गावोगावी भरवित आहेत. मात्र, या काळात शेती व शेतकरी यांची झालेली घसरण, बेरोजगारांच्या संख्येत झालेली वाढ, श्रीमंत व गरीब यांच्यात वाढत जाणारी दरी आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाढत असलेले भाव यासारख्या गोष्टींकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. मोदींच्या गर्जना मोठ्या होत्या. विरोधी पक्षांवर तोंडसुख घेतले की, ते नामोहरम होतात, हा त्यांचा व त्यांच्या पक्षाचाही भ्रम मोठा होता. मात्र, सामान्य माणसे प्रचार आणि वास्तव यातील अंतर आता समजू लागली आहेत. त्याचमुळे या निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्याआधीच देशातील सर्वेक्षणे भाजपाची घसरण दाखवित होती.

भाजपा व मोदी यांनी काँग्रेसचे तरुण नेते राहुल गांधी यांना नको तशी नावे ठेवली व कधी कुणावर झाले नसतील, असे अत्यंत अघोरी प्रहारही त्यांच्यावर केले. मात्र, त्या साऱ्यांवर मात करीत राहुल गांधींनी आपला पक्ष वाढविला, त्यातली भांडणे मिटविली आणि त्याला विजयाच्या मार्गावर आणले. प्रत्यक्षात ही लढत मोदी विरुद्ध राहुल अशीच होती आणि ती राहुल गांधींनी जिंकली आहे. त्यांच्या भूमिका ठाम होत्या, त्यांच्या भाषणांना वजन होते आणि त्यांचा शब्द विश्वसनीय झालेला या काळात दिसत होता. या उलट भाजपा मात्र त्याच त्या जुन्या भूमिका घेऊन वावरताना आढळला. फरक असला, तर तो एवढाच की, तो पूर्वीहून आता अधिक कर्मठ झाला असून, त्याच्यावरील संघाचे वर्चस्व आणखी वाढले आहे. या निवडणुकांनी भाजपाला मैदानाबाहेर घालविले नसले, तरी त्याचे अध्यक्ष अमित शहा यांच्या माजोरीपणाला जबर चपराक लगावली आहे.

या निवडणुकीतील सर्वात लक्षणीय बाब काँग्रेसच्या छत्तीसगडमधील विजयाची आहे. त्या विजयाने देशातील आदिवासी व दलितांचे वर्ग त्या पक्षाशी पुन्हा जुळले आहेत, हे देशाला दाखविले आहे. देशातला मध्यमवर्गही आता भाजपाचा बांधील मतदार राहिला नाही. अर्थकारणाच्या चटक्यांनी त्यालाही आपल्या भूमिकांचा फेरविचार करायला भाग पाडले आहे. या निवडणुकीतून काँग्रेसलाही शिकता येण्याजोगे फार आहे. भांडणे मिटविली, एकजूट केली आणि धाडसाने निवडणुकीला तोंड दिले, तर आपण अजूनही जनाधार मिळवू शकतो, हे त्यालाही या निवडणुकांनी शिकविले आहे. भाजपाला विरोध करणाऱ्या १७ पक्षांची बैठक नेमक्या याच सुमाराला दिल्लीला होणे ही बाब महत्त्वाची आहे. काँग्रेसचा उत्साह कायम राहिला आणि येणाऱ्या काही महिन्यांत इतर पक्षांनी त्यांची ताकद वाढविली, तर लोकसभेच्या येत्या निवडणुकाही त्यांना जिंकता येणार आहेत. तशी भीती भाजपाच्या मनात आता निर्माणही झाली आहे. निवडणुकीतील विजयाबद्दल राहुल गांधी आणि काँग्रेस अभिनंदनाला पात्र आहेत.

Web Title: acceptance of rahul gandhi increased after congress wins chhattisgarh rajasthan madhya pradesh assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.