Rajiv Satav: "...तर पक्ष नेतृत्वाने राजीव सातव यांना राज्याचे नेतृत्व करण्याचीही संधी दिली असती"
By राजेंद्र दर्डा | Published: May 17, 2021 09:08 AM2021-05-17T09:08:01+5:302021-05-17T09:09:12+5:30
गाव आणि देश घट्ट जोडणाऱ्या नेत्याचा अकाली वियोग; राजीव सातव यांनी स्वतःला जातीच्या, प्रदेशाच्या चौकटीत कधीच सीमित केले नाही. त्यांची वृत्ती निर्लेप आणि स्वप्ने मोठी होती... दुर्दैवाने हे सारे अकाली संपले!
काँग्रेसचे उमदे नेतृत्व खासदार राजीव सातव यांचे अकाली जाणे धक्कादायक आहे. राज्य आणि देशपातळीवर दमदार नेतृत्व करण्याची क्षमता असलेला तारा निखळला आहे. त्यांची प्रकृती कधी खालावत, तर कधी सुधारत असल्याची माहिती मिळत होती; परंतु अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. काळाने त्यांना हिरावून नेले. त्यांच्या अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारख्या तरळत आहेत.
कमी वयात स्वतःला सिद्ध करून राजीव सातव यांनी नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची मने जिंकली जात्याच असलेल्या अभ्यासूवृत्तीमुळे प्रत्येक विषय जाणून घेण्याची त्यांना ओढ होती. आमदार, खासदार आणि पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे निभावल्या. राजीव यांना पहिल्यांदा संसदेत पाठवणारी २०१४ची लोकसभा निवडणूक गाजली होती. त्यावेळी महाराष्ट्रात लोकशाही आघाडी सरकार सत्तेत होते. मी राज्याचा शालेय शिक्षणमंत्री होतो. प्रचारासाठी औरंगाबाद ते लातूर, नांदेड आणि हिंगोली, असा प्रवास केला. हिंगोलीत तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह अनुभवला. विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ, त्यातील राजकीय गणिते वेगळी असतात. त्यामुळे लढाई कठीण होती. मात्र, राजीव यांची विजयी मुद्रा मोठी आश्वासक होती. कार्यकर्ते आणि पक्ष ही त्यांची ताकद होती. त्यावेळी महाराष्ट्रात नांदेडहून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव या दोनच जागा काँग्रेसने राखल्या होत्या. निवडणुकीत जातीय समीकरणे मांडणारे विद्वान कमी नाहीत. राजीव सातव माळी समाजातून पुढे आलेले, मात्र त्यांनी स्वतःला जातीय चौकटीत कधीच सीमित केले नाही. कोणाला तसे करूही दिले नाही. सर्वांशी एकोपा आणि सर्व समाजात ऐक्य साधले. त्यांच्या मतदारसंघात फिरताना मला हे सातत्याने जाणवत होते. मी त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला आलो याचा त्यांना मोठा आनंद होता, त्यांनी निवडून आल्यानंतर प्रत्यक्ष भेटून तो व्यक्त केला. देशात बदललेली परिस्थिती आणि पुढची दिशा यावर ते सतत बोलत असत. त्यांची वैचारिक बैठक पक्की होती. राहुल गांधी यांचे विश्वासू असा त्यांचा परिचय दिला जायचा; पण ते म्हणायचे, मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे.
काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांना गुजरातचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. लढाई कठीण होती. ते गुजरातमध्ये ठाण मांडून होते. अनेकदा बोलणे होत असे. जी जबाबदारी दिली ती नेटाने पुढे नेणे हा त्यांचा स्थायिभाव होता. गुजरातमध्ये त्यांनी ठसा उमटवला. पहिल्यांदाच खासदार होऊन लोकसभेत चमकदार कामगिरी केली. उत्कृष्ट संसदपटू ठरले. राज्यसभेतही त्यांची छाप पडू लागली होती. खरे तर आणखी आकाश कवेत घेण्याची ऊर्जा त्यांच्याकडे होती. ते राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात दीर्घकाळ चमकत राहिले असते. किंबहुना राज्यात पुढे कधी तरी काँग्रेस स्वबळावर सत्तेत आली असती तर पक्ष नेतृत्वाने राजीव सातव यांना राज्याचे नेतृत्व करण्याचीही संधी दिली असती. ही भावना आज अनेकांच्या मनात नक्की असेल. कारण राजीव यांच्याकडे ती क्षमता आणि ताकदीचे नेतृत्वगुण होते.
‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने राजीव सातव यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘मी हा सोहळा पाहायला आलो होतो. इतके दिग्गज इथे बसले आहेत, त्यांच्यात माझा काय निभाव लागणार? पण माझा अंदाज आणि समज चुकला. इतक्या मोठ्या यादीतून ‘लोकमत’ने मला शोधले आणि मी हा पुरस्कार स्वीकारत आहे यावर विश्वास बसत नाही!’
-राजीव यांचे बोलणे, वागणे हे असे साधे, निर्लेप, सदैव विनम्र होते.
विद्यमान राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यभर संवाद पदयात्रा काढली होती. त्यासाठी मी, राजीव सातव, विश्वजित कदम उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका खेड्यात एकत्र आलो. त्यावेळचा राजीवचा उत्साह आजही नजरेसमोर येत आहे. आम्ही रस्त्याच्या बाजूला शेतातच सर्वांनी एकत्र भोजन घेतले. मी शिक्षणमंत्री होतो. चर्चेत त्या गावातील एकशिक्षकी शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, हा मुद्दा मांडण्यात आला. त्यावेळी तेथूनच तीन दिवसांत शिक्षक उपलब्ध होईल अशी व्यवस्था केल्याचे मला आठवते. गुरुत्वीय लहरीची आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा औंढा नागनाथचा लिगो प्रकल्प (भारतातली अशी एकमेव प्रयोगशाळा), केन्द्रीय सशस्त्र सीमा दल, हिंगोली (सीएसएसपी) आणि एसआरपी या तीन महत्त्वाच्या गोष्टी राजीव सातव यांनी आपल्या मतदारसंघासाठी केल्या. अत्यंत विचारपूर्वक केलेल्या या योगदानामुळे हिंगोलीचा चेहरामोहराच बदलला.
मतदारसंघातील लोकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच जागरूक असत, हे मी मंत्री असताना अनुभवले आहे. सौम्यपणे समस्या मांडून ते आग्रह धरायचे आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करायचे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना राजीव यांनी देश आणि गाव घट्ट जोडून ठेवले होते. विविध राज्यांत त्यांना जाता आले. युवक काँग्रेसचे नेतृत्व करताना त्यांनी देशभरातील तरुणांना जोडले. बैठका, ऑनलाइन आढावा ही त्यांच्या कामाची पद्धत होती. सतत अनुभव सांगायचे. कार्यकर्त्यांचे देशभर जाळे असलेल्या, महान परंपरेच्या पक्षाचा मी घटक आहे, याचा सार्थ अभिमान त्यांच्याकडून सतत व्यक्त होत असे. आपण समाजाचे देणे लागतो ही शुद्ध भावना असणारा दिलदार तरुण नेता आपल्याला सोडून गेला हे काही केल्या खरे वाटत नाही. त्यांचा नेहमीप्रमाणे फोन येईल, औरंगाबादला आलो की नक्की भेटेन असे ते सांगतील, असेच अजूनही वाटते आहे... त्यांचे ते शब्द सतत काना-मनात घुमत आहेत.
(लेखक माजी मंत्री आणि लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ आहेत)