...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 07:44 AM2024-07-03T07:44:54+5:302024-07-03T07:45:24+5:30

राहुल गांधी पुन्हा चर्चेत परतले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून पहिल्या बाकावर आसनस्थ व्हायला त्यांच्या राजकीय जीवनातील दोन दशके खर्ची पडली.

As the leader of the opposition, Rahul Gandhi is once again in the political discussion | ...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय

...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार 

राहुल गांधी विरोधी पक्षनेते या नात्याने सभापती ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन करत आहेत, बाजूला नरेंद्र मोदी आणि संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू  उभे आहेत. हे छायाचित्र पुरेसे बोलके होते. मोदी आणि राहुल यांनी बिर्ला यांना सभापतींच्या आसनाकडे नेले. १९५० पासून तशी प्रथा आहे. उभय नेत्यांच्या बाबतीत मात्र हे पहिल्यांदाच घडत होते.

राहुल यांचा पुन्हा उदय झाला आहे असा याचा अर्थ घ्यावयाचा काय?  विरोधी पक्षनेतेपद स्वीकारून ते पहिल्या बाकावर आले त्यासाठी जवळपास आज दोन दशके वाट पाहावी लागली. लोकसभेत पहिल्या दिवशी सभागृहात आले तेव्हा राहुल यांनी साधा कुर्ता पायजामा परिधान केला होता. गुणसूत्रे प्रभावी असतातच. त्यांचे पिता राजीव गांधी आणि आई सोनिया याही विरोधी पक्षनेत्या होत्या. सोनिया तर वाजपेयींच्या काळात ५  वर्षे या पदावर होत्या.

राहुल यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. संसदेच्या इमारतीत  सर्व सुविधांनी युक्त कार्यालय मिळेल. स्वीय सचिवासह इतर कर्मचारी दिमतीला असतील. लोकपाल, सीबीआयचे संचालक, दक्षता आयोग, माहिती आयोग अशा अनेक वैधानिक पदांच्या निवड समित्यांत ते असतील. पंतप्रधानांच्या भाषणांवर प्रतिसाद, तसेच कोणतीही चर्चा यापुढे राहुल सुरू करतील. खासदारकीच्या दोन दशकांच्या काळात त्यांनी फक्त ९९ प्रश्न विचारले आणि २६ चर्चांत भाग घेतला. त्यांच्या स्वतःच्याच पक्षाच्या खासदारांपेक्षाही कमी काळ ते सभागृहात उपस्थित होते. जास्त करून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला त्यांनी दांड्या मारल्या. यावेळी त्यांना सध्याच्या खवळलेल्या पाण्यातून पक्षाची नाव पुढे काढावी लागणार आहे. संसदीय चर्चांत त्यांची गाठ मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी पडेल. राहुल गांधी यांच्या आवडीनिवडी आणि वृत्ती यावर त्यांचा पुढचा राजकीय प्रवास ठरेल.

आगामी गांधीयुगासाठी राहुल गांधी यांना वेगळी साधने शोधावी लागतील. अर्जुनाचे कौशल्य, त्याचप्रमाणे शकुनी मामाचा धूर्तपणा त्यांना गरजेचा आहे. त्यांच्या पक्षाचे मित्र महत्त्वाकांक्षी असले तरी वैचारिक पातळीवर निराश झालेले आहेत. त्यांना धरून ठेवणे सोपे नाही.  वय राहुल यांच्या बाजूने आहे. त्यांना समाजमान्यताही आहे. इंडिया आघाडीतील बहुतेक नेते, त्यांचे वय सामाजिक आणि आर्थिक पातळीवर सक्षम दिसतात. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे, कानिमोझी, ओमर अब्दुल्ला, अभिषेक बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि आदित्य ठाकरे हे राहुल यांचे नैसर्गिक मित्र आहेत. द्रमुक आणि राष्ट्रीय जनता दल यांनी त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पसंती दिलेली आहे. 

काँग्रेस पक्षाला बऱ्याच राज्यात गमावण्यासारखे काही नाही हे राहुल गांधींच्या पथ्यावर पडणारे आहे.  प्रादेशिक सुभेदारांचे वर्चस्व मान्य करून ते थोड्या काळासाठी काही खेळी खेळू शकतात. २००४  साली शरद पवार या आपल्या टीकाकाराशी जुळते घेऊन सोनियांनी काँग्रेसला सत्तेवर आणले होते. संयुक्त पुरोगामी आघाडीतील मित्रपक्षांना त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे दिली होती. लोकसभेत मोदी यांच्या दमदार फळीचा सामना करणे राहुल यांच्यापुढचे मुख्य आव्हान असेल. मोदी यांचे राजकारण, अर्थकारण, मुत्सद्देगिरी यातील उणिवा शोधण्याची कला राहुल यांना अवगत करावी लागेल. मोदी यांनी राज्य व केंद्र सरकारमध्ये हुकमती कारभार केला आहे. त्यामुळे आता त्यांना माघारही घेता येणार नाही. मित्रपक्षांनी अवाजवी मागण्या केल्या तर ते गडबडू शकतात. राहुल यांनी ती संधी पकडून मोदींवर केवळ शैलीने नव्हे, तर अभ्यासपूर्ण मात केली पाहिजे.

विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांना मोदी यांचा प्रत्येक शब्द, युक्तिवाद यांचा प्रतिवाद करावा लागेल. विविध विषयातल्या तज्ज्ञ संशोधकांचा ताफा त्यांच्याकडे असावा  लागेल. त्याचप्रमाणे अर्थकारण, राजकारण, सरकारी कारभार, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि पर्यावरण अशा विषयांवर सल्ले देणारे जाणकारही हाताशी लागतील. मुद्यांचे खंडन मंडन करणारे कुशल माध्यमतज्ज्ञ त्यांना मिळवावे लागतील.  

सोनिया आता मागे सरकल्यानंतर राहुल यांनी  काँग्रेस एकत्र ठेवली पाहिजे आणि पक्ष सदैव लढाईस सज्ज   लष्करासारखा झाला पाहिजे. राज्याराज्यात भाजपच्या मधल्या फळीतले नेते अजूनही शिकाऊ आहेत.  काँग्रेसमध्ये नेते तुलनेने अधिक तरुण किंवा मध्यमवयीन असून, अगदी मोजकेच साठीच्या घरात आहेत. सचिन पायलट, रेवंथ रेड्डी, डी. के. शिवकुमार, गौरव गोगोई, नाना पटोले, दीपेंदर हुडा, शशी थरूर, भूपेश बघेल हे नेते एकेकट्याने आणि संघटितपणे आपापल्या राज्यात निवडणुकांमध्ये उत्तम कामगिरी करू शकतात.

२०१३ च्या जानेवारीत राहुल गांधी यांनी जयपूरमध्ये पत्रकारांना सांगितले होते, ‘काँग्रेस जगातली सर्वांत  मोठी राजकीय संघटना असूनही त्यांचे स्वतःचे असे काही नियम नाहीत. प्रत्येक मिनिटाला आम्ही नवे नियम  तयार करतो आणि नंतर ते गाडून टाकतो. पक्षातल्या कुणालाच नियम ठाऊक नाहीत.’ राहुल यांनी एकच नियम पाळला पाहिजे, तो म्हणजे गांधी नावाच्या मागे असलेली जादू ओसरली आहे, ती पुन्हा प्राप्त करणे. पुढचे पंतप्रधान होण्यापासून ते केवळ एक पाऊल मागे आहेत. पाचव्या पिढीतल्या गांधींनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, गांधींकडून गांधींसाठी आणि गांधींकरिता अशी काँग्रेस यापुढे असणार नाही. आतापर्यंत पक्ष टिकला; परंतु इथून पुढे पक्षाची भरभराट व्हायची असेल तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे.

 

Web Title: As the leader of the opposition, Rahul Gandhi is once again in the political discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.