कर्नाटकात राहुल गांधींना लक्ष्य करण्याचे भाजपचे डावपेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:13 AM2018-05-11T00:13:28+5:302018-05-11T00:13:28+5:30

भाजपच्या नेतृत्वाने कर्नाटकातील आपली रणनीती अचानक बदलली आहे. कर्नाटकात प्राचाराचा आरंभ करताना नरेंद्र मोदींनी सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले होेते. त्यांच्या सरकारची संभावना त्यांनी ‘सिद्धा रुपय्या सरकार’ (प्रत्यक्ष पैसे घेणारे सरकार) असे केले होते. सिद्धरामय्यांनी कर्नाटकची लूट केली असे भाजपचा प्रत्येक नेता म्हणत होता. पण मोदींनी अचानक मार्ग बदलून राहुल गांधींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

BJP's strategy to target Rahul Gandhi in Karnataka | कर्नाटकात राहुल गांधींना लक्ष्य करण्याचे भाजपचे डावपेच

कर्नाटकात राहुल गांधींना लक्ष्य करण्याचे भाजपचे डावपेच

Next

- हरीश गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर) 

भाजपच्या नेतृत्वाने कर्नाटकातील आपली रणनीती अचानक बदलली आहे. कर्नाटकात प्राचाराचा आरंभ करताना नरेंद्र मोदींनी सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले होेते. त्यांच्या सरकारची संभावना त्यांनी ‘सिद्धा रुपय्या सरकार’ (प्रत्यक्ष पैसे घेणारे सरकार) असे केले होते. सिद्धरामय्यांनी कर्नाटकची लूट केली असे भाजपचा प्रत्येक नेता म्हणत होता. पण मोदींनी अचानक मार्ग बदलून राहुल गांधींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मोदींच्या प्रत्येक प्रचार सभेत ते आता राहुल गांधींवर टीका करू लागले आहेत. कर्नाटकची प्रादेशिक अस्मिता जागविण्यात सिद्धरामय्या यांना यश येत आहे हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले आहे. मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघेही उत्तर भारतीय असून ते दक्षिणेवर ताबा मिळविण्यासाठी निघाले आहेत असा प्रचार सिद्धरामय्या यांनी करण्यास सुरुवात केली. एका दक्षिणी नेत्याला लक्ष्य करण्यात येत आहे असे चित्र उभे करण्यात ते यशस्वी झाल्यामुळे मोदींनी राहुल गांधींवर टीका करून सिद्धरामय्यांना लक्ष्य करणे सोडून दिले असल्याचे आता दिसू लागले आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येदीयुरप्पा यांचा लौकिक चांगला नाही. तसेच टष्ट्वीटरच्या युुद्धात सिद्धरामय्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल कसाही लागो सिद्धरामय्या यांनी आपले नेतेपण मात्र सिद्ध केल्याचे दिसून आले आहे.

जावडेकरांना कनिष्ठ भाजप नेत्याचे आव्हान
मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांना अमिताभ सिन्हा या एकेकाळी भाजपचा प्रवक्ता असलेल्या कनिष्ठ नेत्याने आव्हान दिल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. दयाल सिंग सायं महाविद्यालयाचे चेअरमन म्हणून अमिताभ सिन्हा यांची नेमणूक केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयाचे नाव बदलून ते वंदेमातरम् दयाल सिंग सायं महाविद्यालय केले. त्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अकाली देलाने निदर्शनास आणून दिले. तेव्हा महाविद्यालयाचे नाव पूर्ववत करण्याचे सिन्हा यांना जावडेकरांनी सांगितले पण या विषयात आपण हस्तक्षेप करू नये असे सिन्हा यांनी जावडेकरांना सुनावले! त्यामुळे जावडेकरांची गोची झाली, कारण ते सध्या कर्नाटकचे भाजपचे प्रचार प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी कर्नाटकात मुक्काम ठोकून आहेत. तरीही त्यांनी उच्च शिक्षण सचिव, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली. त्यानंतर महाविद्यालयाच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक बोलावून नामकरण करण्याचा निर्णय मागे घेण्यास अमिताभ सिन्हा यांना सांगितले. यासंदर्भात जावडेकरांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचेकडेही तक्रार केली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीनंतरच हा विषय तडीस लागू शकेल. पण त्यामुळे सत्तारूढ पक्षातील मतभेद मात्र उघड होऊ लागले आहेत.

मायावती, एक दबंग नेत्या
बसपाच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेशसिंग यांच्यात झालेल्या राजकीय आघाडीचा तपशील हळूहळू प्रकाशात येत आहे. ही आघाडी मे २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीपुरती राहील पण २०२२ मध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीत ती लागू असणार नाही असे ठरले आहे. लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मायावतींचा पक्ष लढवील तर समाजवादी पक्षाला ३५ जागांवरच समाधान मानावे लागेल. या आकड्यात बदल होणार नाही. मतदारसंघ मात्र बदलू शकतील. कैराना लोकसभा जागेसाठी विरोधकांचा उमेदवार उभा करण्याबाबतही मायावतींनी भेटण्यास नकार दिला. ही जागा रालोदचे नेते जयंत चौधरी लढवू इच्छितात पण रालोदच्या तिकिटावर एका मुस्लीम महिलेस ही जागा द्यावी असे मायावतींना वाटते. कैराना मतदारसंघात जाटांचे प्राबल्य असल्याने ते मुस्लीम उमेदवारास मत देण्याची शक्यता नाही. त्यामुळे रालोदच्या जाटांवरील प्रभावाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. पण मुस्लीम उमेदवार जर विजयी झाला तर जाटांनी रालोदच्या उमेदवारास मत दिले हे स्पष्ट होईल. २०१४ साली भाजपने कैराना व बागपत या जागा जिंकल्या असल्याने रालोदशी याबाबत सौदेबाजी करण्याची भाजपची तयारी नाही.

काँग्रेसचे स्वप्नरंजन
आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा जर मिळाल्या आणि सर्व विरोधक जर एकत्र आले तर पंतप्रधानपदाचा दावा आपण करू शकतो असे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. पण मायावती यांनी काँग्रेससोबत कोणताही व्यवहार करण्यास नकार दिला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला स्थान उरले नाही आणि त्यांची मते बसपा किंवा सपाच्या उमेदवारांकडे वळत नाहीत, असे मायावतींना अखिलेशसिंग यांना सांगितले आहे. पण समाजवादी पक्षाला जर काँग्रेसशी आघाडी करायची असेल तर त्याने आपल्या ३५ जागांमधून काँग्रेसला जागा द्याव्यात असेही मायावतींनी स्पष्ट केले आहे. त्यावर अखिलेशसिंग यादव यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले कारण बुवाजींसोबत युती करण्याबाबत त्यांनीच पुढाकार घेतला आहे. पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि अन्य राज्यात काँग्रेससह युती करण्याबाबत मायावती या कठोर भूमिका घेत आहेत. काँग्रेसला उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या १५ जागा हव्या आहेत आणि त्या देण्याची बसपाची आणि सपाची तयारी नाही. त्यामुळे स.पा. व बसपा यांच्या मदतीशिवाय सर्वात जास्त जागा जिंकण्याचे राहुल गांधींचे स्वप्न पूर्ण होणे अवघड आहे.

सहाराचे उपेंद्र राय यांची अटक
सहारा टी.व्ही.चे माजी प्रमुख संपादक उपेंद्र राय यांना सी.बी.आय.ने अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्डरिंग कायद्याची कलमे लागू केली जाऊ शकतात. त्यांनी निरनिराळ्या बँकात रु. ५७ कोटी जमा केले होते व त्यातील ५३ कोटी एका वर्षाच्या आत काढून घेतले होते. ई.डी.चे अधिकारी राजेश्वरसिंग यांनी सी.बी.आय.कडे केलेल्या तक्रारीवरून राय यांना अटक करण्यात आली आहे. वास्तविक राजेश्वरसिंग आणि उपेंद्र राय यांच्यात मैत्रीसंबंध होते. पण त्यांच्यात अढी निर्माण झाल्यावर राय यांनी सी.बी.आय.कडे राजेश्वरसिंग यांची तक्रार केली. सी.बी.आय.ने चौकशी सुरू करतात राजेश्वरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ही चौकशी थांबवली. त्यानंतर राजेश्वरसिंग यांनी राय यांच्याविरुद्ध ते ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार सी.बी.आय.कडे केली. त्यामुळे सी.बी.आय.ने राय यांना अटक केली. आता राय यांनी बँकेतून काढलेले रु. ५३ कोटी कुठे गेले याचा मोदींचे सरकार शोध घेत आहे. राय यांचे कार्ती चिदंबरम यांचेशी संबंध असावेत असे सरकारला वाटते.

Web Title: BJP's strategy to target Rahul Gandhi in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.