‘काकां’साठी सिटी.. ‘दादां’साठी झेडपी !
By सचिन जवळकोटे | Published: June 20, 2021 08:17 AM2021-06-20T08:17:23+5:302021-06-20T08:18:38+5:30
लगाव बत्ती...
- सचिन जवळकोटे
अखेर ठरला.. ‘बारामतीकरां’चा प्लॅन फिक्स झाला. सोलापूर जिल्ह्यातल्या विरोधकांचा ‘कार्यक्रम करेक्ट’ करण्याचा मुहूर्त आखला गेला. ‘अकलूज’च्या ‘दादां’चा सूड घ्यायचा, ‘पंढरपूर’च्या ‘पंतां’चा वचपा काढायचा. ‘सोलापूर’च्या दोन्ही ‘देशमुखां’चा बदला घ्यायचा. त्यासाठी ‘थोरल्या काकां’नी ‘महापालिका’ हस्तगत करायची, तर ‘अजितदादां’नी थेट ‘झेडपी’ काबीज करायची. त्यासाठी वाट्टेल तेवढं मोजायची अन् पाहिजे तेवढी माणसं फोडायची तयारीही ठेवलेली.. लगाव बत्ती..
‘आत्मघातकी बॉम्ब’ सोबत घेतलेत..
‘थोरले काका बारामतीकरां’चं सोलापूर जिल्ह्यावर पूर्वीपासूनच विशेष प्रेम. ते पहिले पालकमंत्री याच सोलापूरचे बनलेले. त्यांच्या प्रत्येक अचाट अन् अनाकलनीय प्रयोगात या जिल्ह्यानं नेहमीच साथ दिलेली. ‘पुलोद’वेळी ‘सुशीलकुमार’ असोत किंवा ‘घड्याळ’ स्थापनेवेळी ‘विजयदादा’. त्यांच्या अनेक विस्मयजनक मोहिमेत अनेकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला. ‘रक्ताळलेल्या पाठीवरचं खंजीर’ बनण्याची भूमिकाही इथल्या मंडळींनी दर्शवलेली. ‘माढा लोकसभे’च्या दुष्काळी माळरानावर जेवढी कुसळं उगवली नसतील, त्याहीहून अधिक मताधिक्यानं त्यांना निवडून देताना ‘पीएम’ पदाचं स्वप्न याच भोळ्या मतदारांनी पाहिलेलं.
जिल्ह्यात पूर्वी दोन गट. ‘झेडपी’समोर गाड्या फक्त ‘अकलूजकरां’च्या दिसतील, तर ‘इंद्रभवन’चा कॉल फक्त ‘जाई-जुई’लाच जाईल, असं ठरलेलं. हे दोन्हीही नेते ‘बारामतीकरां’चे विश्वासू सहकारी; तरीही स्वभावानुसार यांच्यावर विश्वास न ठेवता स्वत:चा स्वतंत्र तिसरा गट जिवंत ठेवण्यात ‘काकां’ना नेहमीच रस. तरीही पूर्वी शहरात ‘सुशीलकुमारां’चाच होल्ड असल्यानं ‘घड्याळ’वाले मेंबर नेहमीच बोटांवर मोजण्याइतपत राहिलेले. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत ‘दक्षिण-उत्तर’च्या दोन देशमुखांनी ‘शिंदेशाही’ची पाऽऽर वाट लावून टाकली. होत्याचं नव्हतं करून टाकलं. पालिका हातातून गेली. सलग दोन पराभवामुळं ‘सुशीलकुमारां’नीही सोलापूरवरचं लक्ष काढून टाकलं. अशा वादळातही अंधारातल्या वाटेवर ‘प्रणितीताई’ मोठ्या जिद्दीनं ‘आमदारकीचा दिवा’ तेवत ठेवून निघालेल्या. एकट्याच न हारता, न डगमगता. नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या पक्षाला सावरण्याची त्यांची ऊर्मी खरोखरच लाजवाब; मात्र ‘ईगो’ अन् ‘रुसवे-फुगवे’च्या माहोलमध्ये कार्यकर्त्यांना पुन्हा जिंकण्याचा आत्मविश्वासच कमावता न आलेला. मात्र हे असं का, यावर पुढं कधी तरी सविस्तर. ‘लगाव बत्ती’...
‘हात’ कमकुवत झालाय हे लक्षात आलेल्या ‘थोरल्या काकां’नी म्हणूनच शहराच्या राजकारणात आता जाणीवपूर्वक हात टाकलाय. माणसं फोडायला सुरुवात केलीय. ‘दिलीपराव’ अन् ‘महेशअण्णा’ म्हणजे राजकारणाच्या आखाड्यातले तगडे गडी. प्रचंड ताकदीचे ‘बॉम्ब’च; मात्र ‘आत्मघातकी’. वेळ पडली तर स्वत:ही फुटतील अन् आजूबाजूचा कॅम्पसही उद्ध्वस्त करतील. याचा दाहक अनुभव ‘हात’वाल्यांनी यापूर्वीही घेतलेला. खरंतर असे कैक ‘बॉम्ब’ आजपावेतो ‘सुशीलकुमारां’नी आपल्या अस्तनीत अत्यंत सावधपणे जपलेले. ‘आपले सहकारी मोठे झाले तरच आपलंही मोठेपण टिकून राहतं,’ हे त्यांनी चाणाक्षपणे ओळखलेलं; मात्र त्यांच्या पुढच्या पिढीनं ‘ॲग्रेसिव्ह पॉलिटिक्स’च्या नादात या मंडळींना दुखावून ठेवलेलं.
...अन् अशा या ‘डिस्टर्ब टीम’ला आपल्या सोबत घेण्याचा एककलमी प्रोग्राम सध्या ‘बारामतीकरां’नी आखलाय. ‘दिलीपराव’ आक्रमक. ‘महेशअण्णा’ चतुर. ‘तौफिकभाई’ बेधडक. यांच्या पाठीमागे जनाधारही दांडगा. विशेष म्हणजे ही सारी मंडळी ‘शिंदे’ घराण्याच्या विरोधात पूर्वी बिनधास्तपणे बंड करून उभारलेली. त्यामुळं ‘बारामतीकरां’चा हा नवा ‘ट्रिपल’ प्रोग्राम नेमका ‘जनवात्सल्य’च्या विरोधात आहे की ‘देशमुख’वाड्याच्या.. हे खुद्द ‘घड्याळ’वाल्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात येईनासं झालंय.
जाता-जाता : ‘जनवात्सल्य’चे खबरे ‘घड्याळ’वाल्यांकडेही आहेत, हे कळताच ‘धनुष्यबाण’वाले ‘पुरुषोत्तम’ म्हणे दचकले. ‘आपल्याला कोण टफ देऊ लागलंय ? थोरल्या काकांच्या गुप्त बैठकीतला रिपोर्ट जस्साच्या तस्सा बंगल्यावर पोहोचविणारे ते दोन खबरे कोण?,’ याचा शोध घेण्यासाठी त्यांनी ‘मनोहरपंत’ अन् ‘दिलीपभाऊ’ या दोघांनाही खूप कॉल केलेले. मात्र त्यांचे मोबाइल सतत एन्गेज. नंतर कळालं की, या खबऱ्यांची खबर नेमकी ‘गादेकरभाऊं’पर्यंत कशी पोहोचली, याचा शोध घेण्यामध्ये हे दोघे दिवसभर व्यस्त. समजलं तर व्हय म्हणा. नाय तर पुढं चला. लगाव बत्ती..
‘लक्ष्मीपुत्रां’ची समाजसेवा...
आर्थिक पाठबळाअभावी ज्यांना निवडणूक लढविता येत नाही, अशा निष्ठावान अन् हुशार कार्यकर्त्यांसाठी पूर्वी विधान परिषदेची निवडणूक असायची. ‘पार्टीचा व्हिप’ निघाला की काहीही न करता हे सर्वसामान्य उमेदवार सहजपणे निवडून यायचे. आपल्या आक्रमक भाषणानं अधिवेशनही गाजवायचे. मात्र, आता परिस्थिती पलटलीय. ही इलेक्शन आता विधानसभेपेक्षाही अधिक महागडी वाटू लागलीय. अशी ‘प्रोफेशनल सिस्टीम’ सर्वप्रथम आणली उद्योगपती ‘सुभाषबापूं’नी. तीच प्रथा (तोच उद्योग ) पुढं कन्टीन्यू. कर्जबाजारी होऊन ‘दीपकआबां’सारखे नेते गपगुमान घरी बसू लागले. कारण, हा खेळ ‘पेट्यांत’ नव्हे तर ‘खोक्यात’ खेळायचा असतो, हे त्यांच्या ध्यानातच न आलेलं.
यंदा तर दोन ‘लक्ष्मीपुत्र’ एकमेकांच्या विरोधात उभारण्याची शक्यता दाट. एक ‘पंढरपूरचे प्रशांतपंत’ तर दुसरे ‘कुमठ्याचे दिलीपराव’. दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी साम्य. दोघांनाही ‘मालक’ म्हणायला यांच्या कार्यकर्त्यांना आवडतं. लक्ष्मी दोघांकडंही ‘दुधा’च्या बरणीतून पाणी ओतून गेलेली. दोघांकडेही ‘साखरे’च्या पोत्यांच्या थैल्या रचून ठेवलेल्या. दोघांच्याही ‘बँके’त अनेक कुबेर कामाला असलेले. दोघांच्याही शिक्षण संस्थांचं प्रांगण सरस्वतीच्या लेकरांसोबतच ‘लक्ष्मीपुत्रां’च्याही किलबिलाटानं फुलून गेलेलं. आजकालची कॉलेज पोरं ज्या झपाट्यानं मोबाइलचं सिमकार्ड बदलतात, तेवढ्याच वेगात पक्षांची चिन्हं बदलण्याचाही या दोघांना छंद. दोघांनीही पहिल्याच निवडणुकीत अपयश पचविलेलं. मात्र, नंतर मोठ्या हिकमतीनं आमदारकीही मिळविलेली. दोघेही राजकीय घराण्याचे वारसदार असले तरीही स्वबळावर स्वत:चं अस्तित्व निर्माण करून जगाला दाखविलेलं.
व्हय. या दोघांचं समदंच भारी. निवडून येण्यासाठी काहीही करण्याची तयारी. त्यामुळंच ‘हे दोघं एकमेकांविरोधात उभारणार’ ही ‘ब्रेकिंग न्यूज’ ‘लोकमत’मधून झळकताच अनेक बँकांच्या मॅनेजरचे फोन म्हणे धडाधड ‘मेंबरां’ना गेलेले. तेव्हा काही ‘झेडपी मेंबरां’नी ठणकावून सांगितलं की, ‘काळजी करू नका. लवकरच तुमच्या बँकेचं कर्ज फेडू. फक्त वनटाइम सेटलमेंट आकडा सांगा.’ काही ‘पालिका मेंबरां’नीही विश्वास दिला की, ‘येस. पक्काऽऽ.. आमची एफडी तुमच्याच बँकेत फिक्स’.
सट्टा बाजारातही काही बुकींनी इलेक्शन खर्चाच्या आकड्यावर बोली पुकारलेली. कुणी म्हणालेलं ‘गेल्या वेळी वीस-पंचवीस खोकी फुटलेली. यंदा पन्नास खोक्यांना मरण नाही. लावा दहाला तीस !’ हे ऐकून दचकलेले दोन सामान्य कार्यकर्ते मात्र एकमेकांशी कुजबुजलेले ‘आजपर्यंत आपल्याला पेट्या अन् खोकी माहीत होत्या रेऽऽ आता पन्नास खोकी म्हणजे अर्धा ट्रंक ओपन होताना पहिल्यांदाच पाहायला मिळणार रे गड्याऽऽ.’ लगाव बत्ती..
( लेखक 'लोकमत सोलापूर' आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)