एकमेकांना शह देण्याची पक्षामध्ये स्पर्धा; राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला यश येईल?
By विजय दर्डा | Published: September 12, 2022 11:04 AM2022-09-12T11:04:21+5:302022-09-12T11:05:08+5:30
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल; पण या उत्साहाचे रूपांतर ऊर्जेत करण्याचा मार्ग पक्षाकडे आहे का?
विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
बारा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून जाणारी काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली आहे. राहुल गांधी ही पदयात्रा करत आहेत. जवळपास पाच महिन्यांपर्यंत रोज ठरवलेले अंतर ते पार करतील. यात्रा एकूण ३५७० किलोमीटरची आहे. ही कठीण जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली आहे. काँग्रेस पक्षात नवीन प्राण फुंकावेत असे नक्कीच त्यांच्या मनात आहे; पण प्रत्यक्षात तसे होईल का?
ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली असली तरी प्रारंभी राहुल गांधी यांनी श्री पेरुम्बुदूर येथे जाऊन शहीद स्थळावर आपले पिता राजीव गांधी यांना वंदन केले. त्यामुळे यात्रेची सुरुवात श्री पेरुम्बुदूर येथूनच झाली, अशी जनभावना आहे.
राजीव गांधींनी इंदिराजींच्या बलिदानानंतर देशाची धुरा स्वीकारली. इंदिराजींच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत लोकसभा निवडणुकीत ४०४ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. त्यावेळी राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल लोकांच्या मनात अपरंपार विश्वासही होता. आज काँग्रेस पक्षासमोर या विश्वासाचेच संकट उभे आहे. मुळे उखडली गेली आहेत. अशात राहुल गांधी यांच्या यात्रेकडून काही उमेद राखणे अत्यंत स्वाभाविक होय. ‘भारत जोडो’ यात्रेच्या मार्गात तिरुअनंतपुरम, कोची, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, नांदेड, जळगाव, इंदोर, कोटा, दौसा, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोट आणि जम्मू या शहरांबरोबरच हजारो छोटी मोठी गावे येतील. यात्रा श्रीनगरमध्ये समाप्त होईल. ज्या ज्या भागातून यात्रा जाईल तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल यात काही शंका नाही.
भारताच्या गावागावात मुळे पसरलेला काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे! गरज आहे, ती या मुळांना पाणी घालण्याची! ओसाड जमिनीवर खतपाणी दिले गेले पाहिजे. त्यावर रोप उगवेल अशी उमेद कधीही सोडता कामा नये; परंतु हे काम सोपे राहिलेले नाही. या यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि चैतन्य संचारेल त्याचे परिवर्तन ऊर्जेत करण्याची खरी गरज आहे. पक्ष कूस बदलत आहे, असा विश्वास कार्यकर्त्यांना द्यावा लागेल. काँग्रेसमधल्या अंतर्गत निवडणुकांची चहलपहल हेदेखील एक आशादायी चिन्ह आहेच. लवकरच पक्षाला एक स्थायी अध्यक्ष मिळेल, अशी आशा करूया. सेनापतीच्याच बाबतीत गोंधळाची स्थिती असेल, तर सैन्य सैरभैर अवस्थेत असणार, हे ओघानेच आले.
राहुल गांधी यांची ही यात्रा भले राजकीय असेल; परंतु भारत जोडण्याची गरज आज सर्वाधिक आहे हे तर प्रत्येकालाच वाटते आहे. सगळीकडे एक उद्वेगाचे वातावरण दिसते आहे. धर्माचा चष्मा अधिक गडद होत चालला आहे. आपल्या देशासाठी हे काही सुचिन्ह नव्हे. अल्पसंख्याक समुदायातील एका व्यक्तीच्या मनात जरी स्वत:च्या सुरक्षेबाबत, अधिकाराबाबत किंतु आला, तरी तात्काळ त्या शंकेचे निवारण करावे लागेल. भारतीय घटनेने प्रत्येकाला एकसारखेच अधिकार दिले आहेत. कोणी गरीब असो किंवा कोणी श्रीमंत, देशाची राज्यघटना सर्वांना आपले विचार आणि आपल्या रिवाजांसार जगण्याचा हक्क देते. जात, धर्म किंवा गरिबीमुळे आपल्याशी भेदभाव केला जात आहे, असे देशातील एकाही नागरिकाला वाटता कामा नये.
एच. डी. देवेगौडा पंतप्रधान असताना मी त्यांच्याबरोबर झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे गेलो होतो. त्यावेळी त्या शहरात भारतीयांची एकंदर संख्या ३००० सुद्धा नव्हती; परंतु मला तिथे असे समजले की तिथले सरकार जोरदारपणे दिवाळी साजरी करते. का?- तर कोणालाही आपली उपेक्षा होते आहे असे वाटू नये. तिथले कृष्णाचे मंदिर पाहून मी चकित झालो. सांगण्याचा मुद्दा हा की कोणाही नागरिकाने आपल्याच धर्माच्या चष्म्यातून देशाकडे पाहू नये. माणेकशा असोत, जनरल करिअप्पा किंवा अब्दुल कलाम; यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांकडे आपण धर्म आणि जातीच्या चष्म्यातून पाहू शकतो का? - कदापि नाही. हे सगळे भारतीय आहेत. कोणी हिंदू आहे, कोणी जैन, कोणी बौद्ध, कोणी शीख किंवा पारशी किंवा मुस्लीम. आपण सर्व जण तिरंग्याखाली उभे आहोत आणि हा तिरंगा आपला प्राण आहे. तिरंग्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे असे दुसरे काहीही नाही. असताही कामा नये. तर राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा... ती किती फलद्रूप होईल? देशाला जोडण्याच्याही आधी हे पाहिले पाहिजे, की काँग्रेस पक्ष जोडण्याचे उद्दिष्ट कितपत सफल होईल?
पक्षात नेत्यांचीच मिजास इतकी, की आपली कोणी विचारपूस करत नाही, असे कार्यकर्त्यांना वाटते. एक दुसऱ्याला शह देण्याची स्पर्धा पक्षामध्ये लागली आहे. नेते ही जुनी सवय सोडतील काय? राहुल गांधी कष्ट उपसण्यासाठी कंबर कसून उभे राहिले आहेत. त्यांच्याबरोबरचे लोक त्यासाठी तयार आहेत का? राहुल गांधी स्वतः बदलतील का? - हाही कार्यकर्त्यांच्या मनातला एक मोठा प्रश्न आहे. जिल्हा आणि राज्यातील नेत्यांसाठी त्यांचे दर्शन सुलभ होईल काय? त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लोकसभेच्या दोन निवडणुका हरला आहे. आता खुद्द राहुल २४ तास पक्षाला वाहून घेतील काय? टीकेचे प्रहार झेलण्याची समज त्यांच्यामध्ये निर्माण होईल काय? राहुल गांधी यांनी कोणता टी-शर्ट घातला आहे किंवा आराम करण्यासाठी त्यांची गाडी किती आलिशान आहे, हे माझ्यादृष्टीने अजिबातच महत्त्वाचे नाही. सर्वांच्याच गाड्या आलिशान असतात. मूळ मुद्दा हा, की हा प्रयत्न काय सांगू पाहातो आहे? राहुल गांधी यांचा संदेश आहे ‘भारत जोडो’! परंतु कार्यकर्त्यांच्या मनात शंका-कुशंकांचे काहूर आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणून तर काही जण हल्ली म्हणतात, पुढचे पाठ, मागचे सपाट, असे होऊ नये म्हणजे मिळवले!