राहुल गांधींची भाषा...आणि जिभेचा लगाम!

By विजय दर्डा | Published: March 27, 2023 07:08 AM2023-03-27T07:08:54+5:302023-03-27T07:09:37+5:30

राहुल गांधी यांना शिक्षा झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जीवनातल्या भाषेच्या वापराबाबतचे गंभीर प्रश्न पुन्हा एकवार समोर आले आहेत!

Congress Leader Rahul Gandhi's language and the reins of the tongue! | राहुल गांधींची भाषा...आणि जिभेचा लगाम!

राहुल गांधींची भाषा...आणि जिभेचा लगाम!

googlenewsNext

कुठेतरी एक शेर वाचला होता जो आज सारखा आठवतो आहे..
जुबान में हड्डीयाँ नही होती,
पर इसी जुबान से 
हड्डीया तुडवाई जा सकती है!
अर्थातच विषय राहुल गांधी यांचा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकातील एका सभेत त्यांनी ललित मोदी, नीरव मोदी यांच्या बरोबर आणखी काही नावे घेतली आणि आश्चर्यचकित करणारा एक प्रश्न उपस्थित केला की सगळ्या चोरांचे आडनाव मोदीच का असते?  त्यांच्या या बोलण्याने पूर्णेश मोदी नामक एक सज्जन दुखावले गेले आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली. राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान ४९९ आणि ५०० अंतर्गत त्यांनी खटला दाखल केला. न्यायालयाने राहुल यांना दोषी मानले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यापाठोपाठ लोकसभेतले त्यांचे सदस्यत्वही गेले.

या घटनेला अनेक बाजू आहेत. कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका व्हावयाच्या आहेत. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची खासदारकी जाण्याने काँग्रेसवर काय परिणाम होईल, हे प्रकरण लोकांच्या न्यायालयात घेऊन गेल्यास काँग्रेसला फायदा होईल, या कारणांनी विरोधी पक्ष एकत्र येतील, मजबूत होतील? महाराष्ट्रात बच्चू कडू आणि सुधीर पारडे, तसेच देशाच्या इतर राज्यांतही शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द का झाले नाही, हा प्रश्न काँग्रेस उपस्थित करणार का?  असे पुष्कळ प्रश्न भविष्यकाळाच्या उदरात दडलेले आहेत. विरोधी पक्षांचे राजकारण कसे वळण घेते यावर या प्रश्नांची उत्तरे अवलंबून असतील.

या प्रश्नांच्या बाबतीत आता आणखी खोलात जाणे फारसे महत्त्वाचे नाही. मला महत्त्वाचा वाटतो तो मुद्दा आहे : मर्यादाशील भाषा!
सर्वसामान्यपणे एखाद्या गोष्टीवरून वाद वाढायला लागला तर लोक अगदी सहजपणे म्हणतात, चुकून बोलले गेले असेल...  संबंधित व्यक्तीही कधीकधी म्हणते, चुकून बोलले गेले, जीभ घसरली! पण जीभ खरोखर घसरते का, की समजून न घेता बोलण्याचा तो परिणाम असतो? माझे वडील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी  जवाहरलाल दर्डा आणि माझी आई, दोघेही म्हणत, बोलायचे असेल तेव्हा समजून-उमजून बोला. तुमच्या बोलण्याचा काय परिणाम होईल, कोणाचे मन दुखावले जाणार नाही ना, याचा विचार करा. काळजी घ्या!

अर्थात सगळेच आई-वडील आपल्या मुलांना हेच शिकवत असतात. तरीही चूक झालीच तर भारतीय सनातन परंपरेमध्ये क्षमा मागण्याची सोय आहे. जैन धर्मात तर विशेष क्षमापर्वसुद्धा आहे; परंतु आपल्याकडून चूक झाली असे ज्याला वाटते, त्यालाच क्षमेचा हक्क आहे. तुम्ही जाणूनबुजून काही बोलाल आणि तरीही माफी मागाल तर ते उचित कसे असेल? राजकारणात तर भाषा सांभाळून वापरण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण नेत्यांचे समर्थक त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असतात. नेता बोलबच्चन असेल तर पाठीराख्यांची भाषासुद्धा स्वाभाविकपणे तशीच असते. राजकारणात आज ज्या प्रकारची भाषा वापरली जात आहे ती ऐकून पुन्हा एक शेर आठवतो..
आजकल कहाँ जरूरत है 
हाथों में पत्थर उठाने की, 
तोडनेवाले तो जुबानसे ही 
दिल तोड देते है...
शालीनतेच्या निकषावर भाषा  संसदीय आणि सभ्य ठरते. राजकीय नेत्यांकडून किमान अपेक्षा ही की त्यांची भाषा मर्यादांचे उल्लंघन करणारी असू नये! परंतु दुर्दैवाने हल्ली राजकीय भाषेनेच शालीनता खुंटीवर टांगून ठेवण्याचे ठरवलेले दिसते. बोलण्याआधी काही किमान विचार करणारे लोक हल्ली कोणत्याच राजकीय पक्षांमध्ये दिसत नाहीत. संसद सभागृहात  विकृत शब्दांचा वापर झाला तर संसदेच्या कार्यवाहीतून ते शब्द हटवले जातात; परंतु बाहेर अपशब्द वापरले गेले तर? परस्परांचे शत्रू असल्याप्रमाणे हल्ली एकमेकांवर हल्ले चढवले जातात. लोकशाहीत वैचारिक मतभिन्नता असतेच; परंतु म्हणजे मारेकरी, कातील, राक्षस, मौत के सौदागर, विषाची शेती, साप, विंचू अशा अपशब्दांचा वापर व्हावा, असे नव्हे! हे मी सत्ताधारी आणि विरोधक  अशा सर्व पक्षांना उद्देशून सांगत आहे. 

पंतप्रधान झाल्यानंतर ती व्यक्ती कुठल्या एका पक्षाची नव्हे, तर संपूर्ण देशाची पंतप्रधान होते. देशाच्या प्रत्येक नागरिकाने त्या पदाच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे.पत्रकारितेबरोबरच मी दीर्घकाळापासून सार्वजनिक जीवनात वावरतो आहे. १८ वर्षे मी संसदीय जीवनाचा अनुभव घेतला आहे. या देशात जर सलोख्याचे वातावरण तयार करायचे असेल तर त्यात भाषेची भूमिका मुख्य असेल. विशिष्ट समाज किंवा विशिष्ट धर्माच्या व्यक्तीवर टीका करताना कुणी मर्यादा सोडत असेल तर ती संपूर्ण बिरादरी दुखावली जाते. या ताणातून समाजाचे ताणेबाणे बिनसतात. अशा छोट्या छोट्या चुकाच मोठ्या समस्यांना जन्म देत असतात.

जुन्या काळातले राजकीय नेते ही बाब समजून होते, म्हणून तर  कठोर टीका करतानाही ते कधीही भाषेची शालीनता सोडत नसत. टीका कडवट असली, तरी परस्पर आदराला धक्का लागत नसे. दुर्दैवाने परिस्थिती बिघडते आहे. भारतासारख्या बहुआयामी आणि बहुसांस्कृतिक, तसेच बहुभाषिक देशात बोलण्याच्या बाबतीत जास्त दक्ष राहण्याची गरज आहे. लक्षात घ्या, त्याच जिभेचा वापर करून कडू गोळीसुद्धा मधात घोळवून देता येते.
कबीराने म्हटले होतेच,
ऐसी बानी बोलिये, मनका आपा खोय ।
औरन को शीतल करे, आपौ शीतल होय ।

Web Title: Congress Leader Rahul Gandhi's language and the reins of the tongue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.