अमेठी हातची गेली, रायबरेलीही धोक्यात! सोनिया गांधींना शोधावी लागणार सुरक्षित जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:40 AM2022-03-24T05:40:38+5:302022-03-24T05:41:07+5:30

काही दशके अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघांत काँग्रेस पक्ष पाय रोवून होता. आता सोनिया गांधींनाच उत्तर प्रदेशात सुरक्षित जागा शोधावी लागेल!

congress lost Amethi now raebareli also in danger | अमेठी हातची गेली, रायबरेलीही धोक्यात! सोनिया गांधींना शोधावी लागणार सुरक्षित जागा

अमेठी हातची गेली, रायबरेलीही धोक्यात! सोनिया गांधींना शोधावी लागणार सुरक्षित जागा

Next

- हरीश गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

अमेठीत २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून अवमानास्पद रीतीने  पराभूत झाले होते. उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा शेवटचा बालेकिल्ला रायबरेली हाही आता अडचणीत आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पाचही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस पक्षाला पराभवाची नामुश्की पत्करावी लागली आहे. 

त्याहूनही अतिशय अवमानास्पद म्हणजे सर्व काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रचार करूनही हे घडले. शेवटच्या टप्प्यात राहुल गांधीही प्रचारासाठी आले होते. परंतु अमेठीतही  सर्वच्या सर्व पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या. 

गेली काही दशके अमेठी, रायबरेली हे दोन आणि बाजूच्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष पाय रोवून होता. २००४ साली सोनिया गांधी रायबरेलीतून निवडून आल्या. इथून फिरोज गांधी आणि इंदिरा गांधीही अनेकदा निवडून आल्या होत्या. मात्र २०१९ मध्ये सगळेच बदलले आणि आता पक्षाच्या अध्यक्षांनाच उत्तर भारतात, विशेषत: उत्तर प्रदेशात सुरक्षित जागा शोधावी लागेल, असे चित्र दिसते आहे. २०१९ सालीही सपा, बसपा यांनी रायबरेलीत उमेदवार न देता काँग्रेसला अप्रत्यक्ष मदत केली हेही लक्षात घेतले पाहिजे. 



२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३९९ जागा लढवल्या. त्यापैकी केवळ २ जागांवर पक्ष विजय मिळवू शकला. ३८७ ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली हा केवढा दैवदुर्विलास. पक्षाला फक्त २.४ टक्के मते मिळाली. 

सोनिया गांधी यांनी आता अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. २००४ साली त्यांनी भाजपला हरविण्यासाठी मोठी आघाडी उभी केली होती, त्या दिशेने पुन्हा हालचाली करण्याची वेळ आलेली आहे. गांधी कुटुंबाने आधी आपले घर सावरले नाही, तर उत्तर पट्ट्यात पक्षाला पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता कमी दिसते.

भाजपचेही आत्मपरीक्षण
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांत भाजप भले निवडणूक जिंकला असेल; पण मुस्लिमांची केवळ २ टक्के मते पक्षाला मिळाली हे पक्ष श्रेष्ठी नजरेआड करू शकत नाहीत. पंतप्रधानांच्या नावे चालणाऱ्या अनेक योजनांचा लाभ मुस्लिमांनाही झाला; पण मते मात्र पुरेशी मिळाली नाहीत.
मतदानकेंद्रनिहाय मतांची तपासणी करता श्रेष्ठींना आश्चर्य वाटले. पक्षातल्या अनेकांनी मोठमोठे दावे करूनही मुस्लीम महिलांची मते पक्षाला मिळाली नाहीत. बहुसंख्याकांना न दुखावता मुस्लीम महिलांची मते कशी मिळवावीत या विवंचनेत भाजपचे नेते सध्या पडलेले दिसतात. 



उत्तर प्रदेशातून एखादी मुस्लीम महिला राज्यसभेत न्यावी अशी एक सूचना पुढे आली आहे. भाजप राज्यात राज्यसभेच्या किमान ७ जागा जिंकू शकतो. अनेक वर्षे पक्षाने नजमा हेपतुल्ला कार्ड वापरले. पण, अरब जगतात मोठा संपर्क असूनही त्यांचा फारसा प्रभाव आता पडत नाही. 

मुस्लिमांमध्ये पक्षाविरुद्ध केला जाणारा प्रचार लक्षात घेऊन भाजप एखादा नवा चेहरा समोर आणेल अशी शक्यता आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या चेअरमन शाईस्ता अंबर हिजाब प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. मुस्लीम मतांच्या बाबतीत भाजपच्या  हातून सगळे काही निसटलेले नाही असाच याचा अर्थ होतो.

एक संपली, लगेच दुसरी लढाई..
पाच राज्यांतील निवडणुकांची धूळ अद्याप खाली बसलेली नाही तोच निवडणुकांची नवी रणधुमाळी सुरू होण्याच्या खुणा दिसू लागल्या आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून राज्यसभेच्या ७५ जागा रिक्त होत आहेत. डॉ. सुब्रमण्यम स्वामी, डॉ. नरेंद्र जाधव, छत्रपती संभाजीराजे, एम. सी. मेरी कोम, स्वप्न दासगुप्ता, रूपा गांगुली, सुरेश गोपी यांच्यासारखे ७ नियुक्त सदस्यही पायउतार होतील. मात्र, जनमताचा इतका कौल मिळूनही भाजप राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळवू शकत नाही. १०० जागा पक्ष मिळवू शकतो; पण बहुमतासाठी १२२ जागा लागतात. 



सर्व राज्यांपैकी महाराष्ट्रातली लढत चुरशीची होईल. तिथल्या ६ जागा लवकरच रिक्त होत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांना पक्ष नामनियुक्त करण्याऐवजी तिकिटावर आणू इच्छितो. राज्यात भाजप राज्यसभेच्या केवळ दोन जागा जिंकू शकतो. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील पक्षनेते पीयूष गोयल यांना दुसरी जागा जाईल. तसे झाल्यास या फेरीत निवृत्त होत असलेल्या विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे यांची सोय लावणे कठीण जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अनुक्रमे प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांना निवडून आणतील. पी. चिदंबरम तामिळनाडूकडे जातील. राज्यसभेतील काँग्रेसच्या एकमेव जागेसाठी मात्र खेळ अद्याप खुला आहे.

Web Title: congress lost Amethi now raebareli also in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.