चिंतन कसले, चिंताच करायला हवी!
By विजय दर्डा | Published: May 23, 2022 07:16 AM2022-05-23T07:16:53+5:302022-05-23T07:17:33+5:30
लोकशाहीचे रक्षण करायचे तर भक्कम विरोधी पक्षाची आवश्यकता असते. विखुरल्या गेलेल्या अशक्त काँग्रेसला हे आव्हान पेलवेल का?
- विजय दर्डा
उदयपूरमध्ये ज्या दिवशी काँग्रेसचे तीन दिवसांचे नवसंकल्प चिंतन शिबिर समाप्त झाले, त्याच दिवशी अहमदाबादमध्ये भाजपचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर सुरू झाले. या दोन चिंतन शिबिरांबद्दल देशभरात चर्चा होणे स्वाभाविक आहे. लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाला देशात सबळ विरोधी पक्ष असावा असे, मनोमन वाटत असते; पण सध्या एका बाजूला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस, दिवसाचे चोवीस तास न थकता काम करणारे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या दिमतीला सक्षम-दक्ष सहकाऱ्यांची टीम आहे आणि दुसरीकडे काँग्रेस! एकूण न बोललेलेच बरे, अशी या पक्षाची अवस्था! उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराने या पक्षाला नवी दिशा दिली का, पक्षाच्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचा संचार झाला का, तोंडावर असलेल्या विधानसभा, २०२४ सालची लोकसभा निवडणूक या दोन्ही आव्हानांसाठी काँग्रेसने काही व्यूहरचना, तयारी केली का, या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष केव्हा मिळेल? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत आणि त्यांची उत्तरे दृष्टिपथात नाहीत!
चिंतन शिबिरानंतर काँग्रेसने ‘भारत जोडो’ अशी घोषणा दिली गेली. या घोषणेचा उल्लेख बातम्यांमध्ये झाला, तेव्हा उभे आयुष्य काँग्रेसला वाहिलेल्या एका खूप जुन्या काँग्रेस नेत्याने माझ्याशी बोलण्याच्या ओघात जे म्हटले, ते महत्त्वाचे. ते म्हणाले, ‘पहिल्यांदा आपले घर तर जोडा, भारत आपोआप जोडला जाईल. आपला पक्षच विखुरलेला आहे, तर देशाच्या गोष्टी करण्यात काय अर्थ?’
जी-२३ गटातले बंडखोर नेते जेव्हा पक्ष सुधारण्याच्या गोष्टी करतात तेव्हा त्यांना बंडखोर म्हटले जाते; पण लोकशाहीच्या मजबुतीसाठी विरोधी पक्ष मजबूत होणे आवश्यक आहे आणि ती भूमिका निभावण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे, हे कसे नजरेआड करता येऊ शकेल? काँग्रेस हा देशातला सर्वांत जुना आणि दीर्घ काळ देशाचे नेतृत्व करणारा पक्ष आहे. लोकांना नेमके काय हवे आहे हे समजून घेण्यात पक्ष नेमका कुठे कमी पडतो, यावर खरे तर चिंतन शिबिरात चर्चा व्हायला हवी होती. मतदार काँग्रेसवर विश्वास का ठेवत नाहीत, सामान्य लोकांपासून पक्ष का तुटला? - हे कळीचे प्रश्न आहेत. लोकांपासून पक्ष तुटला असे खुद्द राहुल गांधीही म्हणत असतात.
चिंतन शिबिरात यावरच विशेष चिंतन व्हायला पाहिजे होते; पण लोकांशी तुटलेली नाळ पुन्हा कशी जोडून घेणार, लोकांच्या भावना कशा समजून घेणार आणि आपले म्हणणे त्यांना कसे सांगणार ? यावर कसलेही नियोजन समोर आले नाही.
उदयपूरच्या शिबिरात सहभागी व्हायला राहुल गांधी जर रेल्वेने गेले असतील तर ते स्वत:ला लोकांशी जोडून घेऊ इच्छितात हा त्यांचा उद्देश स्पष्ट होता. सकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक स्टेशनवर त्यांचे स्वागत होत होते. ते कार्यकर्त्यांना भेटत होते. ही चांगलीच गोष्ट आहे; परंतु श्रेष्ठींनी आपल्याशी काहीच चर्चा कशी केली नाही, या उदयपूरच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या प्रश्नाला त्यांच्याकडे काय उत्तर आहे? उदयपूरच्या काँग्रेसजनांची किती निराशा झाली असेल याचा जरा विचार करा.
ही निराशाच उत्साहावर पाणी ओतत असते. इतक्या मोठ्या चिंतन शिबिरात काँग्रेसने आपले मंत्री आणि खासदारांना का बोलावले नाही, हाही एक प्रश्न आहे. केवळ राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत भागीदार आहे. पक्षाकडे केवळ ५३ खासदार आहेत. तरी यातल्या कोणालाही बोलावले नाही. राजस्थानातल्या मंत्र्यांनाही निमंत्रण नव्हते.
शिबिरासाठी ४५० नेत्यांना बोलावले, त्यातले ४३० लोक आले. त्यात अर्ध्याहून अधिक राहुल गांधींचे युवा समर्थक होते. बाकीच्यांमध्ये दीर्घकाळापासून विभिन्न पदांवर असलेल्यांचा समावेश होता. त्यांना जरा हे विचारले पाहिजे होते, की इतक्या वर्षांत पक्ष मजबूत करण्यासाठी आपण काय केलेत? - असा थेट प्रश्न केला, तर त्यांची बोलती बंद होईल. यातले बहुतेक लोक पक्ष मजबूत करण्याऐवजी एकमेकांना संपवण्यात आपली ताकद खर्च करीत राहिलेले आहेत.
एका तरुण काँग्रेसवाल्याने मला विचारले की, शीर्षस्थ पदांवर विराजमान नेत्यांमध्ये किती जणांकडे जनाधार आहे, किती जण स्वबळावर निवडणूक जिंकू शकतात? - हा खरा मार्मिक प्रश्न! अशा काळ्या लांडग्यांना जोवर राजकीय वनवासात पाठवले जात नाही तोवर पक्ष बळकट होणे हे एक स्वप्नच राहील.
काँग्रेसने दोन ऑक्टोबरपासून कन्याकुमारीहून “भारत जोडो अभियान” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसवर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या एका विशेषज्ञाने मला विचारले, साधारणपणे अशा यात्रा काश्मीरहून कन्याकुमारीला जातात. पण काँग्रेसची ही यात्रा काश्मीरमधून निघणार नाही, ती का ? उत्तरही त्यानेच दिले : काश्मीरमधून यात्रा सुरू केली, तर सर्वांत आधी गुलाम नबी आझाद यांना बरोबर घ्यावे लागेल. पक्ष सुधारणेच्या संदर्भात आझादसाहेबांनी अनेकदा आपले मुक्त विचार मांडले आहेत. मग त्यांना कसे बरोबर घेणार? ते जी-२३ गटाचे सदस्य. त्यांना बरोबर घेणे म्हणजे टीकाकारांसमोर गुडघे टेकणे!
- हे सगळे ऐकताना मला संत कबिरांचा एक दोहा आठवला.. ते म्हणतात, निंदक नियरे राखिये... निंदक जवळ असेल तर स्वत:मधल्या उणिवा कळतील, त्यात सुधारणा करून चांगला रस्ता धरता येऊ शकेल. चापलूसांची फौज बाळगली, तर राज्य बुडणार, हे नक्की!
पक्ष सुधारण्याच्या गोष्टी ज्यांनी केल्या ते काही काँग्रेसचे शत्रू नाहीत. ते भाजपचे एजंटही नाहीत. त्यांचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे. तरुण नेते पक्षापासून दूर का जात आहेत याचा विचारही पक्षाला करावा लागेल. हार्दिक पटेल या तरुणाला पक्षाने मोठ्या अपेक्षेने आणले होते. तो का निघून गेला? “नव्या नवऱ्याची जणू नसबंदी केलेली असावी, अशी माझी स्थिती होती”- हे हार्दिकचे पक्ष सोडतानाचे उद्गार आहेत. सुनील जाखड पक्ष सोडून का गेले? जाखड यांनी चार कटू गोष्टी सांगितल्या, पण त्या चिंतन शिबिराचा विषय व्हायला हव्या होत्या.
भारतीय जनता पक्ष आपल्या अंगणात सर्व पक्षातील नेत्यांचे स्वागत करत आहे पण काँग्रेसला त्याची फिकीर नाही. काँग्रेसकडे या क्षणाला कुठलाही रोडमॅप नाही, ही कटू असली तरी सोळा आणे खरी गोष्ट आहे. सुमारे तीन वर्ष सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष पद सांभाळले आहे. त्या प्रयत्न खूप करत आहेत पण स्थायी अध्यक्ष असल्याशिवाय कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण होणार नाही, हे कोण नाकारू शकेल?
राहुल गांधी म्हणतात मी अध्यक्ष होणार नाही आणि त्यांच्या बरोबरची चौकडी त्यांना अध्यक्षपदावर पाहू इच्छिते; जेणेकरून ते सत्तेचे केंद्र राहतील. राहुल गांधी यांच्या अनिश्चिततेमुळे काँग्रेसही सतत अनिश्चित स्थितीतच दिसते, असे पक्षाचे लोकच मानतात.
धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीतही पक्षात गोंधळ दिसतो. याबाबतीत काँग्रेस भाजपचाच कित्ता गिरवताना दिसते. श्रेष्ठींचा मानसन्मान, त्यांची पक्षावरची पकड खालच्या स्तरापर्यंत टिकून आहे काय हा सर्वांत मोठा मुद्दा आहे. खरेतर जेव्हा वरिष्ठ स्तरावर निर्णयाला उशीर होतो, गोंधळ असतो तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होत नाही. काँग्रेसने स्वतःला सावरण्यात खूपच उशीर केला आहे पण पक्षावर प्रेम, श्रद्धा असणारे अजूनही गावागावांत त्यांची वाट पाहत आहेत. विश्वासाची यात्रा त्यांच्यापर्यंत पोहोचू देत म्हणजे झाले!