विशेष मुलाखत - काँग्रेसच देशातला सर्वात मोठा पक्ष होता, आणि राहील!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 06:01 AM2022-05-25T06:01:39+5:302022-05-25T06:02:44+5:30
पुढच्या वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेले काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांचा संवाद
विशेष मुलाखत मुख्यमंत्री, उत्तराखंड
काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा परिणाम काय दिसतो? यातून पक्ष पुनरूज्जीवित होईल?
चिंतन शिबिरातून पक्ष नवा संकल्प घेऊन निघाला आहे दोन देशव्यापी आंदोलने होतील. त्यातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. त्यात काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रेचाही समाविष्ट आहे.
पक्षनेतृत्वाबाबत काही निर्णय झाला का? हंगामी अध्यक्षांच्या आधाराने पक्ष किती दिवस चालणार?
धीर धरा. पक्षाच्या निवडणुका होत आहेत. ती एक लोकशाही प्रक्रिया आहे शेवटी अध्यक्षांची निवडही होईल.
पदयात्रेतून पक्ष पुनरूज्जीवित होईल का?
महात्मा गांधी यांनी पदयात्रेने देश जागवला. विनोबांनी इतकी मोठी भूदान चळवळ चालवली. खरंतर आमची पदयात्रा पक्षाला पुनरूज्जीवित करण्यासाठी नाही; तर लोकांपर्यंत आमचे म्हणणे पोहोचवण्यासाठी आहे.
पक्षाचा जनाधार सतत घटतो आहे. नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून चाललेत. केवळ दोन राज्यांत काँग्रेसचेमुख्यमंत्री आहेत. पक्षाचे भविष्य काय?
निवडणुकीत हार-जीत होतच असते. हा मुद्दा जनाधाराशी जोडता कामा नये. काँग्रेस या देशाचा सर्वांत मोठा पक्ष होता आणि राहील. जे सत्तेच्या लोभाने पक्ष सोडून जात आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा.
पुढच्या वर्षी छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. काय रणनीती असेल?
जी जाहीर केली जाईल ती रणनीती कशी असेल? आधीच्या तीन सरकारांनी ज्यांच्याकडे लक्ष दिले नाही त्या सर्व वर्गांसाठी आम्ही काम करणार आहोत. मग ते शेतकरी असतील किंवा आदिवासी. आम्ही शहरी लोकांनाही पुष्कळ दिलासा दिला आणि उद्योगधंदे वाढवायलाही प्रोत्साहन दिले. प्रेमभावाने सेवा आणि जतन हीच आमची रणनीती आहे.
गोरक्षणाबाबत छत्तीसगडने तयार केलेले प्रारूप देशभर लागू केले जात आहे. हे प्रारूप काय आहे ?
छत्तीसगड सरकारने गायीचे शेण खरेदीची योजना गेल्या तीन वर्षांपासून चालविली आहे. त्यामुळे आमच्या राज्यात भटक्या गायी त्रासदायक न ठरता लाभदायक होत आहेत. लोक त्यांचे शेण विकतात. राज्यातल्या ५००० गोशाळांपैकी १५०० शेण विकून स्वयंपूर्ण झाल्या. त्यामुळे छत्तीसगड स्वच्छ भारत अभियानात गेली तीन वर्षे पहिला येत आहे.
परंतु या योजनेचे श्रेय आपल्याला मिळताना दिसत नाही?
गोरक्षणाचे जे प्रारूप भाजपने केले त्यात केवळ घोषणा देणे आणि मते मिळवणे आहे.
आम्ही योजना तयार केल्यावर यांना वाटले आता आपण गायीवरून राजकारण करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी लगेच ही योजना स्वीकारल्याचे जाहीर केले. गोवंशाविषयी श्रद्धा आणि लोकांच्या अडचणी जाणून आम्ही काम केले, श्रेय घेण्यासाठी नाही. काँग्रेसमध्ये श्रेय घेण्याची परंपरा असती तर “७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही”, हे याना देशाला सांगता कसे आले असते? त्यांच्याकडे विचार नाही आहेत आणि ते कायम आमच्या मागे राहतील.
आपण धर्माला अर्थकारणाशी जोडत आहात. त्याचा राजकीय फायदा मिळेल?
आपला हा प्रश्न गायीशी जोडलेला असेल तर मी एकच सांगतो, गोवंशाशी भारतीय समाजाचे नाते सांस्कृतिक तर आहेच शिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेशीही जोडलेले आहे. संघपरिवाराच्या संघटनांच्या, ज्यात भाजपही येतो, चुकीच्या धोरणांमुळे गाय ही देशात एक समस्या होऊन बसली. श्रद्धेचे सोंग करून या लोकांनी गायीला तिरस्कृत पशू केले. आम्ही मात्र धर्माला अर्थव्यवस्थेशी जोडत नसून राजकारणापासून वेगळे करत आहोत.
आपण ज्यामुळे निवडणूक जिंकाल अशा चार गोष्टी सांगा.
निवडणूक येईल तेव्हा चार काय, चौदा सांगू! तोवर थोडी वाट पाहा.