काँग्रेसचा हिंदू झोक स्वागतार्ह व राजकीय फायद्याचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 07:55 PM2018-12-03T19:55:57+5:302018-12-03T19:56:37+5:30
राहूल गांधींची हिंदू ओळख इतक्या ठळकपणे दाखविणे हेही हिंदू मनाला रुचण्यासारखे नाही हे काँग्रेस नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
- प्रशांत दीक्षित-
हिंदू असल्याचे उघडपणे जाहीर करून काँग्रेसला पुन्हा जुन्या मुळांकडे घेऊन जाण्याचा राहुल गांधीचा निर्णय राजकीय दृष्ट्या किती योग्य आहे हे भाजपच्या तीव्र व गोंधळलेल्या प्रतिक्रियांवरून दिसते. दुसरीकडे राहूल गांधींची हिंदू ओळख इतक्या ठळकपणे दाखविणे हेही हिंदू मनाला रुचण्यासारखे नाही. टोकाची हिंदू ओळख दाखविण्याचा अट्टाहास राहूल गांधींनी टाळला तर हिंदू समूहमनाशी जोडून घेऊन देशातील राजकारणात काँग्रेसची जुनी ओळख ते पुन्हा जागवू शकतात. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली बदलणार्या काँग्रेसविषयी......
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा चेहरा बदलण्यास वेगाने सुरूवात झाली आहे. काँग्रेसने पूर्वी मुस्लीमांचा अनुनय केला अशी टीका होत असे. ही टीका मुख्यत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातून होत होती. आता काँग्रेस हिंदूंचा अनुनय करीत आहे अशी टीका होऊ लागली आहे. ही टीका माध्यमांमधून मुख्यत: सुरू झाली आहे. जनतेमधून नव्हे. जनतेला हा बदल मानवलेला दिसतो. तसे नसते तर काँग्रेसच्या या बदलेल्या चेहर्यावर भाजपकडून तिखट प्रतिक्रिया उमटली नसती. काँग्रेसच्या या बदललेल्या चेहर्याचा कितपत राजकीय लाभ मिळतो हे ११ डिसेंबरला निवडणुकीच्या निकालावरून कळेल. मात्र गुजरात व कर्नाटकात या बदललेल्या चेहर्याचा प्रभाव पडला होता हे विसरता येत नाही.
हिंदू मतांकडे झोक ही काँग्रेसची निश्चितच राजकीय खेळी आहे. मात्र त्याबद्दल पक्षाला दोष देता येणार नाही. प्रत्येक पक्ष असे डावपेच टाकीत असतो. राहूल गांधी यांच्या मंदिर प्रवेशापासून काँग्रेसचा हा चेहरा बदलण्यास सुरूवात झाली. आता राहूल गांधींची हिंदू आयडेंटिटी अधिकाधिक स्पष्ट करीत हिंदू मतांकडे काँग्रेसचा झोक वाढविण्यात आला आहे.
गुजरात निवडणुकीच्या प्रचारापासून राहूल गांधींनी हिंदू अनुनय सुरू केला. ही स्मार्ट स्ट्रॅटेजी होती व त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला नसला तरी काँग्रेसबद्दलचा दृष्टीकोन बदलत गेला यात शंका नाही. र०१४च्या मोदी लाटेमधील पराभव हा काँग्रेस नेत्यांना अनपेक्षित नसला तरी दारूण पराभव अपेक्षित नव्हता. त्यानंतरही काँग्रेसची पिछेहाट होतच राहिली. या पराभवाची कारणे शोधताना अँथनी यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याने भगव्या दहशतवाद या शब्दप्रयोगाचा उल्लेख केला होता. दहशतवादाशी भगवा शब्दाला जोडणे हे हिंदूंना दुखावणारे आहे असे अँथनींचे प्रतिपादन होते व ते योग्य होते.
भ्रष्टाचाराची उघड झालेली प्रकरणे, अण्णा हजारे यांचे आंदोलन, मनमोहनसिंग यांचा दुबळा कारभार, तरूणांच्या आकांक्षांना साद न घालणारे काँग्रेसचे नेतृत्व ही कारणे २०१४च्या पराभवामागे होती. या सर्वांवर प्रभाव टाकणारे कारण हे काँग्रेसची हिंदूंबद्दलची वाढती वैचारिक असहिष्णुता हे होते. काँग्रेस अँटी हिंदू आहे अशी भावना वाढत्या प्रमाणात होत गेली.
सोनिया गांधी यांच्या भोवती सल्लागार मंडळांचे कडे होते. अल्पसंख्यांकांबद्दल कणव असणारे त्यामध्ये अनेक होते. भारताला डाव्या विचारांकडे नेण्याचा संकल्प सोडलेले होते. अल्पसंख्यांकांबद्दल कणव हा गुण चांगला आहे व देशाच्या स्थिरतेसाठी व भौतिक समृद्धीसाठी तो अत्यावश्यकही आहे. पण ही कणव अतिरेकी होणे हे काँग्रेसबरोबर देशासाठीही घातक होते. मौत का सौदागर हे मोदी यांना लावलेले विशेषण हिंदूंना दुखावणारे होते. मोदींना हे विशेषण लावले गेले तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते व राष्ट्रीय स्तरावर त्यांचे आगमन झालेले नव्हते. त्यामुळे या विशेषणाचा देशव्यापी परिणाम झाला नाही. पण हिंदूंच्या सामूहिक मनात एक खंत निर्माण झाली. त्यापाठोपाठ. देशातील मालमत्तांवर अल्पसंख्यांकांचा पहिला अधिकार आहे असे मनमोहनसिंग म्हणाले. यातून बहुसंख्य हिंदूंच्या मनात भीती निर्माण झाली. आपल्या अधिकारांवर अतिक्रमण होत आहे अशी भावना झाली. सोनिया गांधींच्या सल्लागार मंडळांपैकी हर्ष मंदरसारख्यांनी अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणारे विधेयक आणले. त्यामध्ये दंगल करणार््या अल्पसंख्यांकांनाही कायद्याने संरक्षण दिले होते. म्हणजे दंगल झाल्यास फक्त हिंदूंवरच कायद्याची कारवाई होणार होती. काँग्रेस सरकारच्या या अतिरेकी अल्पसंख्यांक प्रेमावर त्यावेळी बुद्धीमंतांनी मौन पाळले. त्यावेळी या मंडळींनी आपला प्रभाव टाकून याला अटकाव केला असता तर मोदींचा उदय कदाचित झालाही नसता.
अर्थात असे होण्यामागे सोनिया गांधींची मानसिकताही समजून घेतली पाहिजे. त्या भारतात नवख्या होत्या व राजकारणात त्यांना रस नव्हता. भारतीय मातीशी, येथील संस्कृतीशी, त्यातील उभ्याआडव्या धाग्यांशी त्यांचा संबंध आला नाही. हीच गोष्ट राहूल व प्रियांका या त्यांच्या मुलांबद्दल म्हणता येईल. या देशाच्या संस्कृतीमध्ये आपण परके वा उपरे आहोत, येथे आपण अल्पसंख्य आहोत ही भावना त्यांच्या मनात असणे शक्य आहे. याबद्दल खात्रीपूर्वक काही सांगता येत नसले तरी मानवी स्वभावाचा विचार करता ही शक्यता नाकारता येत नाही. यातून देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटावे अशी राजकीय व्यवस्था निर्माण झाली पाहिजे असे त्यांना वाटले असावे. यातून काँग्रेस अधार्मिक होण्यास प्रारंभ झाला.
यातून हिंदूंच्या समूहमनाशी असलेला काँग्रेसचा संबंध तुटला.
स्वातंत्र्यानंतर ८०च्या दशकापर्यंत हिंदू समूहमनाशी काँग्रेसचा संबंध घट्ट होता. नेहरूंना धार्मिक आचारांचा तिटकारा असला तरी शुद्ध धर्म विचार, ज्याला अध्यात्मिक विचार म्हणता येईल, अशा विचारांबद्दल आस्था होती. शुद्ध आचरणाच्या धार्मिक नेत्यांबद्दल नेहरूंना पूज्यबुद्धी नसली तरी आपलेपणा होता. अशा धर्मनेत्यांशी त्यांचा संवादही होत असे. इंदिरा गांधी या कणखर नेत्या म्हणून आपल्याला परिचित असल्या तरी त्यांची मानसिक ठेवण अध्यात्मिक होती. त्यांच्या मातोश्री तर रामकृष्ण मठाच्या क्रियाशील सदस्य होत्या व नेहरूंचाही त्याबद्दल आक्षेप नव्हता. संजय गांधी यांच्या अकाली मृत्यूनंतर इंदिराजी धार्मिकतेकडे अधिक झुकल्या. मात्र तेव्हाही कडव्या धर्म विचारांना त्यांच्या व्यवस्थेत स्थान नव्हते. या काळातील सर्व नेते कडवे हिंदुत्ववादी कधीच नव्हते पण अहिंदूही नव्हते. त्यांचा स्वभाव, आचरण हे हिंदू संस्कृतीतील होते. या संस्कृतीचे गुणदोष त्यांच्यात प्रकर्षाने दिसत.
राजीव गांधींच्या काळात काँग्रेस व हिंदू समूहमन यांच्यातील संबंध उसवू लागले. ते लक्षात आल्यामुळेच राजीव गांधी यांनी राममंदिराबाबत नरम भूमिका घेतली. नरसिंह राव हिंदू मानसिकतेचे होते, पण तरीही हिंदू काँग्रेसपासून दुरावण्यास ते अटकाव करू शकले नाहीत. त्यांच्या काळात संघाच्या आक्रमक धोरणामुळे हिंदू व्होट बँक तयार होऊ लागली व ती काँग्रेसच्या विरोधात जाऊ लागली. वाजपेयी यांनी संघविचारसरणीला बाजूला ठेऊन नेहरूंसारखा कारभार केला. त्यांनी मोदींप्रमाणे उघड हिंदुत्व स्वीकारले असते तर कदाचित २००४ची निवडणूक पुन्हा जिंकली असती. २००४ची निवडणूकीत वैचारिक लढ्यापेक्षा राजकीय डावपेचांचा लाभ काँग्रेसला अनपेक्षितपणे मिळाला.
युपीएच्या पहिल्या सत्रात काँग्रेस समतोल होती. कम्युनिस्ट पक्षाच्या वैचारिक आडमुढेपणा झुगारण्याचे मनमोहनसिंग यांचे धाडस लोकांना पसंत पडले होते. पण २००९नंतर चित्र बदलू लागले. सोमनाथ मंदिराचे उद््घाटन करण्यास राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी जाण्यास किंवा या मंदिराच्या जीर्णोध्दाराला पटेलांनी प्राधान्य देण्यास नेहरूंचा विरोध असला तरी यावरून त्यांना अकांडतांडव केले नाही. केवळ पत्र लिहून आपली नाराजी कळविली, राजेंद्रप्रसाद वा सरदार पटेल यांना अटकाव केला नाही. सोनिया गांधींच्या काळात समजा असे झाले असते तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता. हा तेव्हाची काँग्रेस व अलिकडील काँग्रेस यांच्यातील फरक आहे.
राहूल गांधी काँग्रेसला पुन्हा जुन्या मुळांकडे घेऊन जात असले तर राजकीय दृष्ट्या तो योग्य निर्णय आहे हे मान्य केले पाहिजे. हा निर्णय किती योग्य आहे हे भाजपच्या तीव्र व गोंधळलेल्या प्रतिक्रियांवरून दिसते. भाजपच्या प्रतिक्रिया त्या पक्षाच्या नेत्यामधील अस्वस्थता दाखवितात. प्रतिपक्षाला अस्वस्थ करणे हे राजकारणातील उत्तम अस्त्र असते. राहूल गांधी त्यांचा प्रभावी वापर करीत आहेत. गुजरातमध्ये याचा थोडा उपयोग नक्कीच झाला. लिंगायतांना आरक्षण देण्याची आगलावी भूमिका सिद्धारामय्या यांनी घेतली नसती तर कर्नाटकातही याचा अधिक उपयोग झाला असता. हिंदू मतपेढीवरील आपल्या वर्चस्वास तडा जात आहे का अशी शंका भाजपला भेडसावित आहे. खरे तर भाजपने इतकी धास्ती बाळगण्याची गरज नाही. पण काँग्रेसच्या या बदलत्या चेहर्याला कसे प्रत्युत्तर द्यावे हे अद्याप पक्षाला कळलेले नाही.
दुसर्या बाजूला हिंदू समूहमनाशी काँग्रेसला जोडताना टोकाचे वर्तन करण्याची गरज राहूल गांधी वा काँग्रेस नेत्यांना का वाटावी हेही कळत नाही. काँग्रेसला हिंदूबद्दल आस्था आहे व अल्पसंख्याकांचा अनुनय वा कडवी धर्मनिरपेक्षतता आम्ही पाळणार नाही हे सूचित करणे पुरेसे होते. त्याऐवजी राहूल गांधी हे जानवेधारी काश्मीरी कौल ब्राह्मण असून दत्तात्रेय गोत्राचे आहेत अशी तीव्र हिंदू आयडेंटीटी सांगण्याची गरज नव्हती. हिंदू असण्यासाठी इतक्या तपशीलवार ओळखीची गरज नसते. व्यक्तिगत आयुष्यात कदाचित असेल पण राजकीय क्षेत्रात नक्कीच नसते. राजकीय क्षेत्रातील हिंदू तितका मोकळ्या मनाचा आहे. राहूल गांधींची हिंदू ओळख इतक्या ठळकपणे दाखविणे हेही हिंदू मनाला रुचण्यासारखे नाही हे काँग्रेस नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. सार्वजनिक जीवनातील हिंदुत्व हे अल्पशब्दात व अल्प वर्तनातूनही कसे दाखविता येते हे स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेस नेत्यांची चरित्रे पाहिली तरी राहूल गांधींना कळेल.
टोकाची हिंदू ओळख दाखविण्याचा अट्टाहास राहूल गांधींनी टाळला तर हिंदू समूहमनाशी जोडून घेऊन देशातील राजकारणात काँग्रेसची जुनी ओळख ते पुन्हा जागवू शकतात. याचा राजकीय फायदा किती होईल हे ११ डिसेंबरच्या निकालात कळेलच. पण सध्या देशात बोकाळलेला कडव्या हिंदुत्वाचा डंख राहूल गांधींच्या या धोरणामुळे मोडला तरी देशाचे भले होईल. त्याचबरोबर डाव्या विचारांची उसनी शिदोरी बाजूला ठेऊन काँग्रेस स्वत:च्या डाव्या वळणावर येऊन उभी राहिली तरी देशाचा फार मोठा लाभ होईल. राहूल गांधी हे करतील काय?
(पूर्ण)