विदर्भातील काँग्रेसचे दुर्दैवी वर्तमान
By गजानन जानभोर | Published: February 6, 2018 12:28 AM2018-02-06T00:28:01+5:302018-02-06T00:28:26+5:30
गुजरात पाठोपाठ राजस्थानातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने मिळविलेले नेत्रदीपक यश सत्तांध भाजपा नेत्यांना जमिनीवर आणणारे आहे.
गुजरात पाठोपाठ राजस्थानातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने मिळविलेले नेत्रदीपक यश सत्तांध भाजपा नेत्यांना जमिनीवर आणणारे आहे. लहरीपणातून घेतलेले निर्णय जनतेवर लादता येत नाहीत, ती कधीतरी तीव्रतेने व्यक्त होत असते, हा धोक्याचा इशारा मतदारांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे. भविष्यात काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ येणार असे संकेत दिसत असताना विदर्भातील काँग्रेस नेते मात्र एकमेकांशी भांडण्यात गर्क आहेत. पक्षहितापेक्षा या नेत्यांचा वैयक्तिक अहंकार वरचढ ठरत असल्याने या हाणामाºयांना अंत नाहीच.
पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांना पक्षाने दिलेली नोटीस काँग्रेसला कृतघ्न झालेल्या नेत्यांचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. याबाबतीत पक्षश्रेष्ठी खरंच गंभीर असतील तर असे अनेक चतुर्वेदी प्रत्येक जिल्ह्यात जागोजागी सापडतील. काँग्रेसने या नेत्यांना काय दिले नाही? शिक्षणसंस्था, साखर कारखाने, सात पिढ्यांची सोय होईल एवढे भरभरून दान पक्षाने त्यांच्या पदरात टाकले. कार्यकर्त्यांच्या तोंडातील घास हिसकावून या नेत्यांच्या मुलांनी लायकी नसताना मोक्याची पदे भोगली. नागपुरातील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विस्तीर्ण परिसर बघितल्यानंतर चतुर्वेदींच्या लाभार्थीपणाची स्क्वेअरफूटनिहाय खात्री पटते. आपण काल कुठे होतो, आज काय आहोत? हा एकच प्रश्न नितीन राऊत, अनिस अहमद, वसंत पुरके या माजी मंत्र्यांनी स्वत:ला विचारला तर पक्षाबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनात दाटून येतील. वडिलांच्या पुण्याईवर अजूनही जगत असलेल्या गेव्ह आवारी या माजी खासदाराच्या सोज्वळ चेहºयामागील कुरापतींना पक्षनिष्ठा म्हणायची का? हा प्रश्नही कधीतरी विचारायलाच हवा. चंद्रपुरात नरेश पुगलिया-विजय वडेट्टीवार यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यातील वादाचे कारण काय तर पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण कुणी करावे? तिथे हंसराज अहीर आजारपणातून बरे झालेल्या सुधीर मुनगंटीवारांना घेण्यासाठी विमानतळावर जातात आणि इकडे पुगलिया-वडेट्टीवार एकमेकांचे कपडे फाडतात. भंडाºयात नाना पटोलेंच्या काँग्रेस प्रवेशाने खुद्द राहुल गांधी हर्षून गेले. पण, पटोले काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आलेत की वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी? या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत असलेल्या प्रश्नाचे उत्तर राहुल गांधींकडेही नाही. गंमत म्हणजे, भंडाºयाच्या पोटनिवडणुकीत राकाँचा उमेदवार उभा राहील आणि कालपर्यंत ज्यांची सावलीही सहन होत नव्हती त्या प्रफुल्ल पटेलांसोबत याच पटोलेंना प्रचार करावा लागेल. ही अपरिहार्यता की अगतिकता?
ज्या गांधीजींच्या संचितावर आजवर भरण-पोषण होत आले त्या काँग्रेसचे नेते या महात्म्याच्या जयंती-पुण्यतिथीलाही एकत्र येत नाहीत, याची लाज आता दिल्लीश्वरांनाही वाटेनाशी झाली आहे. ‘राष्ट्रपतींचा मुलगा’ असे एवढेच कर्र्तृत्व असलेल्या रावसाहेब शेखावतांसाठी सुनील देशमुखांसारखा हिरा या पक्षाने कधीचाच गमावला आहे. सात वेळा खासदार राहून चुकलेल्या विलास मुत्तेमवारांचा पूर्ण दिवस गडकरींना शिव्या देण्यातच सत्कारणी लागतो आणि शिवाजीराव मोघेंना साहित्यिकांच्या ‘पिण्या’चीच अधिक चिंता असते. थोडक्यात काय तर विदर्भातील काँग्रेस नेते बेदरकार आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. नेमके कष्टावे कुणासाठी आणि लढावे कुणाविरुद्ध? निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातील ही तगमग एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या विदर्भातील काँग्रेसचे दुर्दैवी वर्तमान आहे.
- गजानन जानभोर
ँ्नंल्लंल्ल.्नंल्लुँङ्म१@’ङ्म‘ें३.ूङ्मे