अग्रलेख : खरगे यांच्यापुढचे आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 06:58 AM2022-10-20T06:58:17+5:302022-10-20T06:58:50+5:30
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता संपली आणि अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता संपली आणि अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले. काँग्रेस पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्षपदावर राहिलेल्या श्रीमती सोनिया गांधी यांचे उमेदवार खरगे, असा संदेश बाहेर गेल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार, असे आधीपासून वातावरण होते. मात्र, शशी थरूर यांनी इतक्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवताना त्याला एक वैचारिक अधिष्ठान निर्माण करून दिले. लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपद सोडले होते.
तेव्हापासून तीन वर्षे हंगामी अध्यक्ष म्हणून श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे जबाबदारी होती. काँग्रेस पक्षाचा एकामागून एक असा सातत्याने विविध राज्यांत पराभव होऊ लागल्याने अनेक नेत्यांची नाराजी वाढली होती. अशा तेवीस नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी नव्या नेत्याची निवड करण्याची मागणी लावून धरली होती. त्या सर्वांचा पाठिंबा मिळेल, या आशेवर आणि आपल्या बौद्धिक क्षमतेवर मते मिळतील, अशी आशा करणाऱ्या शशी थरूर यांना पराभव पत्करावा लागला. श्रीमती सोनिया गांधी यांचा पक्षात अद्यापही दबदबा असल्याचे यातून स्पष्ट दिसले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा श्रीमती गांधी यांची होती. मात्र, गेहलोत यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडायचे नव्हते. त्या वादात गेहलोत यांनी अप्रत्यक्षपणे बंडाचे निशाण फडकविले. पर्यायी नेतृत्व म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची निवड करण्यात आली. शशी थरूर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. थरूर यांचा स्पष्टवक्तेपणा आणि संघटनात्मक पातळीवर कामाचा कमी अनुभव लक्षात घेता श्रीमती गांधी यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी होती. तसेच घडत गेले आणि खरगे यांना बहुतांश सर्व प्रांतांतून मोठा पाठिंबा मिळाला. गेली काही वर्षे खरगे यांचा राजकीय वावर दिल्लीच्या राजकारणात आहे. राज्यसभेत ते विरोधी पक्षनेते आहेत. तत्पूर्वी युपीए दोन सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर त्यांची एक प्रतिमा तयार झाली होती. समन्वयी नेता, दलित नेता आणि सातत्याने काँग्रेसशी एकनिष्ठ या प्रतिमेची त्यांना या निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यास मदत झाली. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील व्यक्ती सलग चोवीस वर्षे होती. त्याला कोणाचा आक्षेप नव्हता, पण सक्रिय अध्यक्ष हवा, अशी अपेक्षा होती.
निवडणुकीत सतत पराभव होत असल्याने प्रांतिक पातळीवरील नेतृत्वामध्ये निराशेची भावनादेखील होती. त्याला छेद देण्याचे काम नव्या अध्यक्षांना करावे लागणार आहे. अनेक महत्त्वाच्या आणि विस्ताराने मोठ्या प्रांतांमध्ये काँग्रेसची संघटनात्मक ताकद संपली आहे. तेथे पक्षाची उभारणी करावी लागणार आहे. शशी थरूर अनेक मुद्द्यांवरून आपली भूमिका मांडत होते. नवी तरुण पिढी काँग्रेसपासून दूर गेली आहे. त्या पिढीला काँग्रेस पक्षाच्या विचारधारेत आणावे लागेल, हा मुख्य मुद्दा होता. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळतो आहे, असे दिसते आहे. त्याचे रूपांतर पक्षाचे बळ वाढविण्यात करावे लागणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कोणाची तक्रार नव्हती किंबहुना त्यांचे वय सोडून दुसरा कोणताही नकारात्मक मुद्दा नव्हता. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाला पक्षात लोकशाही प्रक्रिया सुरू व्हावी, संघटनात्मक बांधणीला महत्त्व द्यावे, निर्णय घेण्याची प्रक्रिया-व्यवस्था निर्माण करावी, अशीच अपेक्षा होती. अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच आपली मागणी मान्य झाल्याचे सांगत सर्व नाराज नेत्यांनी खरगे यांनाच पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारले.
परिणामी काँग्रेस विरोधकांना पक्षात फार मोठी दरी वगैरे निर्माण होईल, अशी अपेक्षा होती तसे काही घडले नाही. याउलट शशी थरूर आणि खरगे यांनी पक्षांतर्गत निवडणुकीच्या मर्यादा पाळून ही निवडणूक पार पाडली आहे. लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष भक्कम किंबहुना आक्रमकदेखील असावा, अशी अपेक्षा असते. खरगे किंवा थरूर व्यक्तिगत पातळीवर सरकारच्या विरोधात बाजू मांडण्यात आक्रमक आहेत. त्याला पक्ष संघटनेची जोड मिळत नाही. पक्षांतर्गत कार्याला महत्त्व नसल्याचे वातावरण असल्याने अनेक काँग्रेसजनांनी सोयीची भूमिका घेतली आहे. त्याला बळ देण्याचे खरगे यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.