...पण पवार स्वत:ला असमर्थ मानत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:16 AM2019-06-05T03:16:50+5:302019-06-05T06:17:49+5:30
लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेमतेम चार जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसनेही चंद्रपूरची एक जागा कशीबशी मिळविली. हे दुबळेपण विचारात घेऊन एकत्र येणे आणि एक होणे हाच त्या पक्षांसमोरचा आताचा एकमेव पर्याय आहे.
साऱ्या देशात संघाचे निशाण उंचावून फडकू लागले असताना राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील चिमुकल्या पक्षाच्या महत्त्वाकांक्षाही पतंगासारख्या आकाशात भराऱ्या घेत असतील तर तो त्या पक्षाच्या उतरत्या काळाचा व आत्महत्येच्या इराद्याचा पुरावा आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात अलीकडे झालेल्या भेटींमुळे त्यांचे पक्ष परस्परांजवळ येतील आणि किमान महाराष्ट्रात (बाहेर राष्ट्रवादी कुठेही नसल्यामुळे) त्यांचे बळ वाढेल असे वाटले होते. पवारांना याची जाणीव आहे. पण ज्यांचा विचार चिंचवड किंवा सांगलीबाहेर पोहोचत नाही, याची त्यांच्या छोट्या अनुयायांना जाणीव असेल असे वाटत नाही. त्याचमुळे विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा (व तीत पुन्हा एकवार आपटी खाण्याचा) निर्धार त्यांच्या संघटनेने आपल्या मुंबई बैठकीत परवा केला आहे.
पवारांचा पक्ष विदर्भात नाही, मराठवाड्यात नाही, कोकणात नाही, मुंबईत नाही. त्याचे जे काय किरकोळ स्वरूप असेल ते पश्चिम महाराष्ट्रातच तेवढे आहे. तेथेही आता मोहिते गेले, भुजबळांचे बळ क्षीण झाले आणि प्रत्यक्ष पवारांनाही निवडणूक लढविण्याची ‘इच्छा’ उरली नाही. एकाच नेत्याचा व एकाच घराण्याचा पक्ष असला की तो नेता व ते घराणे दुबळे होऊ लागले की तो पक्षच खंगत जातो. काँग्रेसचे तसे नाही. राहुल किंवा सोनिया यांच्यामागे शंभर वर्षांच्या लढ्याची व त्यागाची परंपरा आहे. तो पक्ष मूल्यांवर उभा आहे. पवारांचा पक्ष माणसांवर चालणारा आहे. अशावेळी राजकीय शहाणपण समर्थांच्या सोबतीने जाण्यात आह़े़ पण पवार स्वत:ला असमर्थ मानत नाहीत. तीच अहंता त्यांच्या घरात आणि पक्षातील अनेकांत आहे. तळाचे कार्यकर्ते त्यांचे दुबळेपण सांगतात. पण त्यांचे ऐकतो कोण? पवारांची फडणवीसांशी भेट झाली किंवा मोदींना दोन मिनिटे भेटले तरी आपण बलवान आहोत, असे त्यांच्या पक्षातील अनेकांना उगाचच वाटत असते. पण त्या भेटीनंतर लगेचच मोदींचे सरकार प्रफुल पटेलांना जेव्हा आर्थिक अन्वेषण विभागासमोर ‘उत्तरा’साठी बोलावते तेव्हा त्या भेटीचे दुबळे मोल साऱ्यांना कळून चुकते.
कोणा तलवार नावाच्या मध्यस्थाच्या मदतीने पटेलांनी त्यांच्या सत्ताकाळात १११ विमाने घेतली. एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्सचे एकत्रीकरण केले. मात्र त्या साऱ्यात देशाची विमानेच खाली आली. त्यांच्या या व्यवहारात घोटाळा असल्याचा आरोप मोदी सरकारने करून ६ जूनला त्यांच्या चौकशीला आरंभ करण्याचे जाहीर केले आहे. अजित पवार व सुनील तटकरेंवर ७८ हजार कोटींच्या खर्चातून एकही इंच जमीन पाण्याखाली न आणल्याचा आरोप याआधीच झाला आहे व तेही चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत. चौकशीला भिऊन नव्हे, तर सामोरे जाऊन सरकारशी लढा देणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची आताच्या काळातील गरज आहे. लोकसभेत महाराष्ट्रातून त्यांच्या जेमतेम चार जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसनेही चंद्रपूरची एक जागा कशीबशी मिळविली. हे दुबळेपण विचारात घेऊन एकत्र येणे आणि एक होणे हाच त्या पक्षांसमोरचा आताचा एकमेव पर्याय आहे. मात्र तसे न करता ‘आम्ही स्वबळावर लढू’ अशा निरर्थक कविता लोकांना व पक्षाला ऐकविणे यात कवित्व असले, तरी शहाणपण मात्र नाही. पवार हे कमालीचे अनुभवी व जाणते राजकारणी आहेत.
पण ते आपल्या अनुयायांच्या व नातेवाइकांच्या हेकेखोरीपुढे हतबल झाले असावेत असेच त्यांचे आताचे दीनवाणेपण आहे. त्यांनी ऐक्याची तयारी करायची आणि कुणा उदयनराजांनी ‘ती नको’ म्हणायचे व तेवढ्यावर पक्षाने ऐक्याकडे पाठ फिरवायची. यात कुणाचा दुबळेपणा उघड होतो? अशावेळी त्यांचे जाणते अनुयायी आणि सल्लागार कुठे असतात? आणि पवार त्यांचे ऐकून ते मनावर तरी केव्हा घेणार? सारे संपल्यावर..? तसे असेल तर त्यांना शुभेच्छाच तेवढ्या द्यायच्या उरतात. लोकसभेत काँग्रेसचे ५२ सदस्य आहेत. विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी त्या पक्षाला आणखी दोन सदस्यांची गरज आहे. ते त्याला मिळू नये यासाठी तर पवारांच्या चालढकलीचा हा पुरावा नाही?