राहुल गांधींना पर्याय कोण? संघटित व्हा आणि पुढे जा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 05:16 AM2019-07-31T05:16:22+5:302019-07-31T05:16:28+5:30
एवढे दिवस लोटले तरी काँग्रेस पक्षाला राहुल गांधींचा पर्याय शोधता आला नाही.
एवढे दिवस लोटले तरी काँग्रेस पक्षाला राहुल गांधींचा पर्याय शोधता आला नाही. परिणामी, त्या पक्षाचे अध्यक्षपद रिकामेच राहिले. राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा डॉ. मनमोहन सिंग यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनाही त्याविषयीची तातडी दिसत नाही. येत्या १०-१५ दिवसांत नवा अध्यक्ष निवडला जाईल, असे आजवर दोन-तीनदा सांगितले गेले. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही, याचे एक कारण पक्षातील वरिष्ठांसह इतर सहकाऱ्यांचा आग्रह राहुल गांधींना त्यांचा राजीनामा परत घ्यायला लावतील, याविषयी अनेकांना वाटणारा विश्वास हा होता. अनेकांच्या राजीनाम्याचे खरे कारणही तेच होते. प्रत्यक्षात राहुल गांधी आपल्या निर्णयापासून मागे फिरायला राजी नाहीत आणि अध्यक्षपदाचा प्रश्न तसाच राहिला आहे. पक्षाचे नेतृत्व तरुणांकडे जावे असे त्यांना व इतरांनाही वाटते. मात्र त्यातील जी नावे समोर येत आहेत, त्यांच्याविषयी एकवाक्यता नाही. या तरुण नेत्यांपैकीज्योतिरादित्य शिंदे यांना त्यांच्या गुना या परंपरागत मतदारसंघात पराभव पाहावा लागला.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु त्याला सर्वत्र मान्यता मिळताना दिसत नाही. तेथील मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना ते पद नको; कारण त्यांना मुख्यमंत्रिपद सोडायचे नाही. या पदावर प्रियंका नकोत; कारण त्या गांधी घराण्यातील आहेत. कमलनाथ, अमरसिंग किंवा सिद्धरामय्यांसारखी वजनदार माणसे पक्षात आहेत, पण त्यांना त्यांच्या राज्याबाहेर जनाधार नाही. डॉ. मनमोहन सिंग पक्ष व देश या दोहोंनाही आदरणीय आहेत; पण राजकीय नेतृत्वाला लागणारे गुण त्यांच्यात नाहीत. मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे यांचीही नावे मध्यंतरी पुढे आली. परंतु, त्यांचाही जनाधार मर्यादित व स्थानिक आहे. १९५० च्या दशकात कै. ढेबर यांच्याकडून इंदिरा गांधींकडे पक्षाचे नेतृत्व आले, तेव्हापासून पक्षाचे खरे नेतृत्व गांधी-नेहरू घराण्यातच राहिले. परिणामी, बाकीचे अध्यक्ष आले आणि गेले तरी त्यांची नावे, एका कामराजांचा अपवाद वगळता फारशी कुणी स्मरणात ठेवली नाहीत.
१९६९ च्या काँग्रेस फुटीनंतर तर पुन्हा गांधी हे घराणेच पक्षाच्या नेतृत्वस्थानी राहिले. त्या घराण्याला १०० वर्षांच्या त्यागाची, इतिहासाची व काँग्रेसच्या मूल्यांची प्रतिष्ठा असल्यानेही तसे झाले. इतरांकडे ते नाही, मध्यंतरी देवकांत बरूआसारखी माणसे आली आणि गेलीही; पण त्यांची नावेही आता कुणाला आठवत नाहीत. राष्ट्रीय नेतृत्व प्रबळ असल्याने प्रादेशिक नेते वाढले नाहीत आणि कोणत्याही प्रादेशिक नेतृत्वाने राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा प्रयत्न केला नाही. यशवंतराव होते, पवारही होते; पण त्यांना महाराष्ट्राचे व त्यातही मराठ्यांचे नेते म्हणूनच पाहिले गेले. इतिहास व जनाधार यांचा राष्ट्रीय वारसा एका गांधी घराण्याखेरीज दुसºयाजवळ नाही आणि काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा न होता नेहमी नेत्यांचा व त्यांनी इतर हाताशी धरलेल्या त्याच्या अनुयायांचा राहिला. हे स्थानिक नेतेही गांधी कुटुंबावर अवलंबूनच मोठे झाले. त्यामुळे पक्षाची नवी बांधणी गांधीजी म्हणायचे तशी वरून खाली न करता खालूनच वर जायला हवी. ते करायला राहुल गांधी तयार दिसतात. इतरांनी त्यांना साथ द्यायची आहे. ते करण्यात त्यागाचीही गरज आहे. ते उत्तरदायित्व मोठे आहे आणि अनेकांना ते पेलणारेही नाही. पक्षातील होतकरू, प्रामाणिक, कष्टाळू व बुद्धिमान तरुणांना हेरून त्यांना पुढे करण्याची पक्षाची एकेकाळची परंपरा व दृष्टीच आता पुन्हा स्वीकारावी लागणार आहे. एका अपयशाने खचण्याचे कारण नाही. १९९९ पर्यंत भाजपवाले निवडणुका हरतच आले. तरीही ते उभे राहिले. काँग्रेसला हरण्याची सवय नसल्याने एका पराभवात तो पक्ष खचल्यासारखा झाला. मात्र त्यातील प्रत्येकाची जबाबदारी त्याला नवी उभारी देण्याची आहे. त्यासाठी कष्ट करण्याची, जनतेत मिसळण्याची, स्वातंत्र्यलढ्याच्या निष्ठा जागविण्याची व गांधीजींच्या परंपरेला उजाळा देण्याची आहे. विरोधी पक्ष ही लोकशाहीची फार महत्त्वाची आधारशिला आहे. ती जपणे हे देशकार्य आहे. त्यासाठी पक्षाच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांनी एकदिलाने एकत्र येणे गरजेचे आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची निवड असो, की पक्षाला नवी उभारी देण्याची... त्यासाठी पक्षातील होतकरू, प्रामाणिक, कष्टाळू व बुद्धिमान तरुणांना हेरून त्यांना पुढे करण्याची पक्षाची एकेकाळची परंपरा व दृष्टीच आता पुन्हा स्वीकारावी लागणार आहे.