बधिर झालेला देश गुंगीतून जागा व्हावा म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 05:46 AM2022-11-08T05:46:35+5:302022-11-08T05:47:24+5:30

केवळ निवडणुकीतल्या विजयाने पालटेल इतके ‘वास्तव’ सोपे नाही. देशाची विवेकबुद्धी जागी करण्यासाठीच ‘भारत जोडो’चे पदयात्री निघाले आहेत!

In order for the deaf country to wake up from its stupor rahul gandhi bharat jodo yatra | बधिर झालेला देश गुंगीतून जागा व्हावा म्हणून...

बधिर झालेला देश गुंगीतून जागा व्हावा म्हणून...

googlenewsNext

डॉ. गणेश देवी
‘दक्षिणायन’चे प्रणेते, सांस्कृतिक क्षेत्रातले कार्यकर्ते

केवळ निवडणुकीतल्या विजयाने पालटेल इतके ‘वास्तव’ सोपे नाही. देशाची विवेकबुद्धी जागी करण्यासाठीच ‘भारत जोडो’चे पदयात्री निघाले आहेत!

आधुनिक जगाच्या इतिहासात ‘३५०० किलोमीटर अंतर पार करणारी एक सामूहिक पदयात्रा’ ही घटना निर्विवादपणे विलक्षण आहे. अशा प्रकारच्या पदयात्रा याआधीही निघाल्या. मात्र पायी चालत, एवढे अंतर कापून ही पदयात्रा जात आहे, हे ‘भारत जोडो यात्रे’चे खास वैशिष्ट्य आहे. ज्या परिस्थितीमुळे राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी पदयात्री यांनी या पदयात्रेचा निर्णय घेतला ती परिस्थिती केवळ राजकीय दृष्टीने पाहून वास्तवाचे पूर्णपणे आकलन करता येणार नाही. केवळ राजकीय अर्थाने गेल्यास या सामूहिक पदयात्रेचे विश्लेषण पूर्ण होणार नाही.

गेल्या सात-आठ वर्षांत भारतीय घटनेत अनुस्यूत असणाऱ्या संस्थांचे सातत्याने अध:पतन होताना दिसते आहे. त्याकडे पाहता केवळ निवडणुकीतल्या विजयाने वास्तवाला कलाटणी देणे अशक्य झालेले दिसते. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित चैतन्य देशात पुन्हा जिवंत करायचे, तर संपूर्ण समाजात निर्माण झालेली एकप्रकारची बधिरता कमी करणे  आवश्यक आहे. संपूर्ण देशाची विवेकबुद्धी जागी करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर कळपाप्रमाणे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. पक्षबदल ही एक सर्वसामान्य, सर्वमान्य कृती आहे असे वाटावे इतपत राजकीय बधिरता या देशात रुजत चालली आहे. त्या गुंगीतून देशाला जागे करण्यासह राजकारणातली हरपलेली नीतिमत्ता पुन्हा जागृत करणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. ही यात्रा एक प्रकारची तपश्चर्या आहे असे राहुल गांधींनी पुन्हा पुन्हा म्हटले आहे. हे केवळ सभेमध्ये टाळ्या घेण्यासाठी केलेले विधान नाही.

सुरुवातीला ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाच्या पडझडीला आवर घालण्यासाठी असेल असे बऱ्याच जणांना वाटत होते. परंतु कन्याकुमारीहून निघालेल्या या यात्रेला प्रारंभीच्या नऊ आठवड्यांच्या अवधीत ७०० हून अधिक सामाजिक संघटना, कामगार संघटना, जन आंदोलनांचे समर्थन मिळाले आहे.  हा उत्साह बघता, या यात्रेने भारतीय लोकशाहीच्या वृक्षाला नवीन पालवी फुटत आहे याचे संकेत स्पष्टपणे दिले आहेत.

या यात्रेचे नाव ‘‘भारत जोडो’’ असल्याने ‘काय जोडता’? किंवा ‘काय जोडायचे आहे?’ असा विचित्र प्रश्नही उपस्थित केला गेला होता. या शीर्षकामागे एक विस्तृत सामाजिक इतिहास आहे. या शीर्षकाचा संबंध थेट १९४२ च्या भारत छोडो किंवा मराठीत चले जाव, इंग्रजीत क्विट इंडिया म्हटले गेले त्या ऐतिहासिक आंदोलनाशी आहे विसरून चालणार नाही.

१५ जुलै १९४२ रोजी वर्ध्यामध्ये महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली कॉँग्रेसची बैठक झाली होती. म्हणजे आंदोलनाच्या तीन आठवडे आधी. त्या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले. त्यापैकी एक होता, ‘जेव्हा जेव्हा फॅसिझमशी लढावे लागेल तेव्हा तेव्हा तो लढा सुरु करणे.’

१९४२ च्या या ठरावाची आपल्या देशाला आज किती नितांत गरज आहे हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. सर्व माध्यमे सरकारच्या दहशतीखाली थिजून गेलेली असताना,  केवळ विरोधी किंवा वेगळा विचार केला म्हणून व्यक्तींना ‘यूएपीए’खाली कैदेत टाकण्यात येत असताना, स्वतंत्र विचार मांडणारे नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, कलबुर्गी, गोविंदराव पानसरे यांच्यासारखे दिवसाउजेडी वैचारिक अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडत असताना; १९४२ च्या गांधींच्या ठरावास पुन्हा एकदा चालना देणे नितांत गरजेचे आहे. 

नोटाबंदी आणि कोरोना यात देशातील बहुसंख्य समाज भरडून निघत असताना केवळ तीनच उद्योगसमूहांची संपत्ती अफाट वाढत असणे हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या खोलवरच्या दुखण्याचे स्पष्ट लक्षण आहे. भीतीचे वातावरण, प्रचंड आर्थिक विषमता यांच्याबरोबरच सामाजिक सलोखाही आज धोक्याची रेषा ओलांडून गेला आहे. राज्यघटनेत प्रत्येक नागरिक समान असण्याचे वचन दिलेले असले तरीही केवळ धर्माच्या आधारावर काही नागरिक उच्च आणि इतर कनिष्ठ बनवले जात आहेत. घटनेत सर्व अनुसूचित भाषांना समान दर्जा दिला असला तरीही हिंदीचा आग्रह विनाकारण अवघ्या देशावर लादला जात आहे. शिवाय देशाच्या संघराज्यात्मक रचनेला खो देण्याचे कामही राजरोस सुरु आहे. 

- या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी देश सज्ज करायचा असेल तर ते केवळ लोकसभेच्या दालनातल्या गोंधळातून साध्य होऊ शकणार नाही. प्रत्यक्ष नागरिकांबरोबर संवाद करुन भारताची विस्कटलेली राजकीय, आर्थिक, सामाजिक घडी पुन्हा बसवता येईल या विस्तृत हेतूने  मार्गक्रमण करणारी ही यात्रा आता महाराष्ट्रातून मार्गस्थ होते आहे.  गेल्या कितीतरी शतकात आपण कमावलेल्या प्रागतिक विचारांचे शिंपण या यात्रेवर करणे ही महाराष्ट्राची जबाबदारी असेल. 

१९४२ च्या चले जाव लढ्याची सुरुवात महाराष्ट्रातच झाली होती. त्याही आधी रयतेच्या राज्याची निर्मिती करण्याचे महान कार्य शिवबांनी केले ते महाराष्ट्रातच आणि आपल्या संपूर्ण संत परंपरेतून, शिवाय फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारातून समतेची कल्पना बहरली तीही महाराष्ट्रातच ! 
ज्या भागातून यात्रा जाणार आहे त्या भागातून मी फिरलो आणि आजपर्यंत कधीही न अनुभवलेला लोकांचा प्रचंड उत्साह अनुभवू शकलो. महाराष्ट्रातून ही यात्रा जेव्हा उत्तर हिंदुस्थानात प्रवेश करेल तेव्हा ती महाराष्ट्राच्या वैचारिक प्रागतिक परंपरेची छाप नक्कीच घेऊन पुढे जाणार असेल. भारत जोडो यात्रेमध्ये गोंगाट नाही, गोंंधळ नाही, फक्त गर्दीही नाही. फक्त घोषणाही नाहीत. त्यात निरागसतेचा एक अभूतपूर्व उत्सव आहे. त्यात माणुसकीचा एक अत्युच्च आविष्कार आहे. आणि म्हणूनच ही यात्रा आयुष्यात एकदाच पाहायला, घ्यायला मिळेल असा एक अनुभव आहे.

Web Title: In order for the deaf country to wake up from its stupor rahul gandhi bharat jodo yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.