नेत्यांनो, कामाला लागा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 06:36 AM2019-06-12T06:36:35+5:302019-06-12T06:39:32+5:30
मोदींनी नियोजन आयोग मोडला, निर्वाचन आयोग अधिकारहीन केला,
अमेठीत पराभूत झालेले राहुल गांधी वायनाड या केरळमधील लोकसभा क्षेत्रातून प्रचंड बहुमताने विजयी झाले. अमेठीतील पराभवाचा परिणाम काही काळातच त्यांनी झटकल्यासारखा दिसला व ते पुन्हा आपल्या जबाबदाऱ्यांच्या मागे लागले. पुढ्यात राहिलेले मोठे स्वप्न विरल्यानंतर येऊ शकणारी विरक्ती त्यांना शिवली नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची व गांधी कुटुंबाबाहेरचा नेता त्या पक्षाच्या अध्यक्षपदावर निवडण्याची विनंती पक्षाला करून ते पुनश्च जनतेत सामील झाले. केरळात त्यांनी किमान तीन मोठ्या पदयात्रा व लोकयात्रा काढल्या. नेत्याच्या या कृत्याने त्याच्या अनुयायांना काहीच शिकवू नये काय? कारण ते अजून घराबाहेर पडल्याचे, लोकांत मिसळू लागल्याचे व पक्षाची डागडुजी करू लागल्याचे अन्यत्र कुठे दिसले नाही. निवडणुकीतील जय-पराजय या नित्याच्या व सहजपणे घेण्याच्या बाजू आहेत. त्या तशा न घेता, हाच जणू साºयाचा अंत आहे अशी मनाची समजूत करून थिजून बसणारी माणसे पक्ष कसा उभा करणार? आणि ते देशाला दिशाही कशी दाखवणार? खरे तर त्यांच्यासमोर आज असलेले आव्हान निवडणुकीतील स्पर्धेहूून मोठे आहे.
मोदींनी नियोजन आयोग मोडला, निर्वाचन आयोग अधिकारहीन केला, रिझर्व्ह बँकेला भाजपची खासगी बँक बनविली, देशातल्या सगळ्या बँका बुडवल्या, विमान कंपन्यांना टाळे लावले, विद्यापीठ अनुदान आयोगाची इभ्रत घालविली आणि शिक्षणाचे संघीकरण चालविले. आता तर त्यांनी न्यायालयाचेही संघीकरण करण्याची सुरुवात करून कर्नाटकच्या न्यायालयावर कॉलेजियमचा सल्ला धुडकावून आपला एक माणूस नेमला. यातली प्रत्येक गोष्ट घटनेचा अवमान करणारी, प्रस्थापित लोकशाहीचे हातपाय तोडणारी आणि घटनेला पोथी बनविण्याचा त्यांचा इरादा सांगणारी आहे. यातल्या प्रत्येक गोष्टीविरुद्ध लढा देण्याची व त्यासाठी जनतेला सोबत घेण्याची गरज आहे. अनेक लहान-मोठे राजकीय पक्ष (आता त्यांनाही त्यांची खरी किंमत समजली आहे) सोबत यायला तयार आहेत. पण मध्यवर्ती नेतेच गळाठले असतील तर? की एकट्या सोनिया, राहुल आणि प्रियंका यांनीच साºया राजकारणाचे ओझे अंगावर घ्यायचे असते?
काँग्रेस पक्षात तरुण नेत्यांची फळी मोठी आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, देवरा, गोगोई, तांबे अशी किती तरी नावे सांगता येतील. पण त्यांचे अस्तित्व त्यांच्या क्षेत्राबाहेर दिसत नाही. त्यातले बहुतेक जण स्वत:साठी काम करतात, पक्षासाठी नाही. महाराष्ट्रातले किती नेते त्यांच्या मतदारसंघाबाहेरच्या लोकांना ठाऊक आहेत? आणि त्यातल्या किती जणांना महाराष्ट्र ठाऊक आहे? असे एक मतदारसंघीय पुढारी व कार्यकर्ते स्वत:शिवाय पक्ष वाढू देत नाहीत, उलट आहे तोही छोटा करण्याचाच प्रयत्न करतात. भाजप व संघ यांनी अनेक सेवा संस्था काढल्या. नेत्रपेढ्या, रक्तपेढ्या, डॉक्टरांच्या संघटना किंवा कायदेशीर सल्ला देणारी पथके. काँग्रेसला हे सहज करता येणारे होते. पण त्यासाठी सेवाकार्याला वाहून घेण्याची व त्यातून पक्षाला माणसे देण्याची जी दृष्टी लागते ती त्यांच्यात नाही. परिणामी पक्ष तुटतो, संघटना जाते, घरे तुटतात आणि पिढ्यान्पिढ्या पक्षात राहिलेली माणसे पक्षाबाहेर जातात. तसे जाताना त्यांना संकोच वा लाज, शरम वाटत नाही. सत्ता ही आकर्षक बाब आहे. पण ती स्वबळावर मिळवायची असते. अन्यथा आपण सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोईच फक्त होऊ शकतो हे विख्यांना, राण्यांना किंवा मोहित्यांना कळत नाही काय? देशात पंतप्रधानाचे पद एक असते व ते १३० कोटी लोकांमधून एकालाच मिळणारे असते. हीच बाब मुख्यमंत्र्याबाबतही आहे. केवळ ती पदे आम्हाला आमच्या नेत्यांनी दिली नाही म्हणून कळ काढणाºयांची खरे तर पतच तपासून पाहिली पाहिजे. देशाची मागणी मोठी आहे, ती त्यागाची व परिश्रमाची आहे. भाजपला पर्याय देण्याची आहे. आव्हाने मोठी आहेत आणि ती तुमच्या सामर्थ्याला समर्थ आव्हान देणारीही आहे. अशा आव्हानांसमोर जे उभे होतात तेच संघटना बांधतात व तेच देशही उभा करीत असतात.
निवडणुकीतील जय-पराजय या नित्याच्या व सहजपणे घेण्याच्या बाजू आहेत. त्या तशा न घेता, हाच जणू साºयाचा अंत आहे अशी मनाची समजूत करून थिजून बसणारी माणसे पक्ष कसा उभा करणार? आणि ते देशाला दिशाही कशी दाखवणार?