मधल्या फळीचा पेच ; क्रिकेट असो वा काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:36 AM2019-07-13T11:36:01+5:302019-07-13T13:54:36+5:30
भारतीय संघाचा सेमी फायनलमध्ये झालेला पराभव असाे की काॅंग्रेसचा लाेकसभेच्या निवडणुकांमध्ये झालेला पराभव, त्याला मधल्या फळीची निश्क्रियता कशी कारणीभूत आहे, त्याचा घेतलेला आढावा.
- प्रशांत दीक्षित
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत बाद होण्यामागची कारणे कोणती याची चर्चा आता सुरू झाली आहे. भारताचा विजयी रथ जोरात धावत होता तेव्हा त्यातील त्रुटी कोणाच्या लक्षात येत नव्हत्या. पराभव झाल्यावर त्या सर्वांच्या लक्षात येत आहेत. पराभवानंतर असे नेहमीच होते. खेळ असो वा राजकारण क्रिकेट संघाची मधली फळी मजबूत करण्याकडे भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाने पुरेसे लक्ष दिले नाही हा मुद्दा प्रामुख्याने मांडला जात आहे. सामना संपल्यावर लगेच सचिन तेंडुलकरने, त्याच्या नेहमीच्या सभ्य व सौम्य भाषेत हा मुद्दा मांडला. बोरिया मुजुमदार, हर्ष भोगले अशा क्रिकेटसमीक्षकांनी त्याचे अधिक विश्लेषण केले. क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर व संजय जगदाळे यांनीही हा मुद्दा अधिक ठोसपणे मांडला. भारतीय संघातील पहिल्या तीन क्रमांकाचे खेळाडू उत्तम खेळ करीत असल्यामुळे पुढील खेळाडूंच्या तयारीकडे लक्ष दिले गेले नाही. ही चूक निवड समिती व संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची आहे. पण अद्याप शास्त्रींना कोणी जबाबदार धरलेले नाही. खरे तर संघापेक्षा व्यक्तिगत आवडीनिवडींना अधिक महत्त्व देण्याचा शास्त्रींचा स्वभाव आहे व ते अहंमन्यही आहेत. गेल्या चार वर्षांत चार ते सहा या क्रमांकावर २१ खेळाडू खेळविले गेले. ही संख्या पाहिली तर निवड समिती व शास्त्री यांनी मधल्या फळीचा कसा खेळखंडोबा केला ते लक्षात येईल. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तीन यष्टिरक्षक खेळविण्याच्या शास्त्रींच्या निर्णयाची तर पाकिस्ताननेही खिल्ली उडविली आहे. सलामीची जोडी लवकर तंबूत परतली तर खेळपट्टीवर ठाण मांडून मोठी खेळी खेळण्याची क्षमता असणारे खेळाडू संघात असावे लागतात, असे खेळाडू घडवावे लागतात, तरुण खेळाडू शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा सराव द्यावा लागतो (केवळ आयपीएलमधील खेळावर अवलंबून राहून चालत नाही) आणि मधली फळी उभारण्यासाठी खेळाडूंना संधी व प्रशिक्षण द्यावे लागते, त्यासाठी काही वर्षे खर्च करावी लागतात असे अनेक मुद्दे भारताच्या पराभवाच्या मीमांसेतून पुढे आले. मधली फळी उभी करणे हे वेळ खाणारे काम आहे व खेळाडूंवर विश्वास टाकावा लागतो, निरनिराळ्या परिस्थितीत पुन्हा-पुन्हा संधी द्यावी लागते, एखाद-दुसऱ्या सामन्यातील खेळावर निर्णय घेऊन चालत नाही हे चर्चेचे सार आहे.
क्रिकेटमधील पराभवाबाबत दुसरा मुद्दा हा की भारताकडे ‘प्लॅन बी’तयार नव्हता. सलामीची जोडी झटपट बाद झाली तर करायचे काय, खेळ कसा पुढे न्यायचा याचा काहीही आराखडा नव्हता. तशा परिस्थितीची कल्पनाही कोणी केली नव्हती. व्यूहरचनाच नसल्यामुळे खेळाला हवा तसा आकार भारतीय संघाला देता आला नाही. कोहली, शर्मा, राहुल बाद होताच संघ गडबडला. पंत, कार्तिक हे विश्वचषकापेक्षा आयपीएलसारखे खेळले, धोनीला फलंदाजीला लवकर पाठवून संघ सावरावा हे शास्त्रींना सुचले नाही, कारण प्लॅन बी संघाकडे तयारच नव्हता. आता भारतीय संघ भारतात परत आल्यावर बीसीसीआयच्या बैठका होतील, त्यामध्ये या त्रुटींवर चर्चा होईल आणि २०२३च्या विश्वचषकासाठी संघबांधणीस आत्तापासूनच सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. पुढील विश्वचषक भारतात होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाबाबत जे घडले तसेच काँग्रेस व विरोधी पक्षांबाबत घडते आहे. दोन्हीमध्ये विलक्षण साम्य दिसते. राहुल गांधी असे म्हणतात की, मी बरीच मेहनत घेतली आणि कार्यकर्त्यांनीही खूप काम केले; पण मधल्या नेत्यांनी काम केले नाही. माझा प्रचार सर्व लोकांपर्यंत पोहोचविला नाही. राहुल गांधी यांनी त्रागा करून राजीनामा दिला. पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या राजीनामापत्राचा रोख हा मधल्या फळीतील नेत्यांवरच आहे. मधली फळी कमकुवत असणे हा काँग्रेसचा जुना रोग आहे. काँग्रेसचे नेतृत्व मी करणार नाही, असे राहुल गांधी यांनी जाहीर केल्यावर काँग्रेसमध्ये आलेली हतबलता ही मधली फळी मजबूत नसल्याचे लक्षण आहे. काँग्रेसला सध्या गळती लागली आहे, कारण या आमदारांना पक्षात ठेवेल असे नेतृत्व राज्यपातळीवर नाही. गांधी घराण्याच्या करिश्म्यावर जिंकण्याची सवय काँग्रेसला लागली आहे. सलामीच्या जोडीच्या भरवशावर राहणाºया भारतीय क्रिकेट संघाप्रमाणेच हे आहे. हे काँग्रेसपुरते मर्यादित नाही. सध्या दिशाहीन झालेल्या प्रत्येक पक्षामध्ये मधल्या फळीचा कच्चा दुवा स्पष्टपणे दिसून येईल.
अर्थात याला कारण त्या पक्षांचे प्रमुख नेतेच आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीमध्ये मधल्या फळीकडे जसे लक्ष दिले गेले नाही किंवा निवड समिती व व्यवस्थापकांच्या लहरींवर निवडी होत राहिल्या. तोच प्रकार काँग्रेस व अन्य पक्षांत घडतो. मधल्या फळीतील नेते बलवान झाले तर आपल्या स्थानाला धोका होईल, असे सर्वोच्च नेते मानीत असतात. महात्मा गांधी हे सर्वमान्य आणि सर्वश्रेष्ठ नेते होते. पण त्यांच्या काळातील काँग्रेसमध्ये मधल्या फळीतील नेतेही सक्षम होते. मधल्या फळीतील नेत्यांच्या म्हणण्याकडे स्वत: गांधी लक्ष देत, त्याची दखल घेत. हे नेते महात्माजींना उघड विरोधही करत आणि महात्माजी त्यांना आपलेसे करून घेत. नेहरूंच्या काळात हे प्रमाण कमी झाले असले तरी प्रादेशिक नेत्यांना महत्त्व होते. इंदिरा गांधींपासून मधल्या फळीपेक्षा निष्ठावान नेत्यांना महत्त्व दिले जाऊ लागले. तरीही स्थानिक नेत्यांना काही स्थान होते. गेल्या दहा वर्षांत काँग्रेसमधील मधली फळीच अदृश्य झाली. अन्य प्रादेशिक पक्षांकडे पाहिले तर वेगळे चित्र दिसत नाही. सर्वोच्च नेता निष्प्रभ ठरला की सर्व पक्षच विस्कळीत होतो, अशी स्थिती सर्व पक्षांमध्ये आहे. दुसरा मुद्दा ‘प्लॅन बी’चा. संकट आले तर काय करायचे याचा आराखडा काँग्रेस वा अन्य पक्षांकडे नव्हता. मोदींचा पराभव होणार याच अपेक्षेत सर्व विरोधी नेते राहिल्याने पराभवाचीही शक्यता लक्षात घेऊन पुढील कार्यक्रम ठरविण्याकडे लक्षच दिले गेले नाही. यामुळे पराभव होताच सर्वजण गडबडले. काय करावे हेच समजत नाही अशी स्थिती नेत्यांची झाली. राहुल गांधी यांनी राजीनामा देण्यामागे हेही एक कारण आहे.
याबद्दल फक्त काँग्रेसला दोष देता येणार नाही. मधल्या फळीकडे दुर्लक्ष आणि प्लॅन बी किंवा सी तयार नसणे हा भारतीय स्वभावात मुरलेला दोष आहे. खालपासून वरपर्यंत संघबांधणी हे मूल्य आपल्याकडे रुजलेले नाही. राजकारणाप्रमाणेच कॉर्पोरेट वर्ल्ड याला अपवाद नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमध्येही हेच चित्र दिसते. सांस्कृतिक क्षेत्रातही सर्वोच्च पदावर करिश्मा असलेली व्यक्ती असली तर तोपर्यंत ती चळवळ वा संस्था यांचा बोलबाला असतो. ती व्यक्ती बाजूला गेली वा अपयशी ठरली की संस्था कोसळते वा झपाट्याने मोडकळीस येते. कारण अपयश आल्यास काय करायचे याचा कार्यक्रम हाताशी नसतो. अपयश येताच दिशाहीनता येते. युरोप-अमेरिकेतील अनेक संस्था वा कंपन्या या शतकानुशतके कार्यक्षमपणे काम करीत असतात. कारण तेथे मधली फळी मजबूत करण्याकडे कायम लक्ष दिलेले असते. मधल्या फळीतून तेथे सर्वोच्च पदावरील व्यक्ती येतात. आणि त्या व्यक्तीही पुढील मधली फळी तयार करण्याकडे लक्ष देतात. त्याचबरोबर अपयश आल्यास काय करायचे याचा आराखडा प्रत्येक महत्त्वाच्या पायरीवर तयार असतो. यामुळे अपयशातून तेथील कंपन्या व संस्था लवकर सावरतात.
याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यातून पुढे आलेला भारतीय जनता पार्टी हे, निदान सध्या तरी, भारतात अपवाद आहेत हे मान्य करावे लागेल. संघ परिवाराच्या काही गोष्टी आक्षेप घ्याव्या अशा असल्या तरी या दोन दोषांपासून या संघटनेने स्वत:ला बरेच दूर ठेवल्याचे मान्य करावे लागते. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयामध्ये मोदींचा करिश्मा व अमित शहा यांचे नियोजन यांचा महत्त्वाचा वाटा असला तरी तितकाच महत्त्वाचा वाटा मधल्या फळीतील नेत्यांचा आहे. मोदींना पुन्हा सत्तेवर आणायचे या जिद्दीने मधल्या फळीतील नेत्यांनी काम केले. ही फळी रातोरात किंवा गेल्या पाच वर्षांत उभी राहिलेली नाही. त्यामागे कित्येक वर्षांची मेहनत आहे. पुन्हा सत्तेवर आल्यावर मोदींनी केलेल्या नेमणुकांकडे बारकाईने पाहिले तर आपल्या नंतरच्या वयोगटातील मेहनती नेत्यांना संधी देण्याकडे त्यांनी लक्ष दिलेले आढळेल. केंद्र सरकार, प्रशासन व पक्ष या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते मधली फळी सक्षम करीत आहेत. समजा भाजपचा पराभव झाला असता तरी विरोधी पक्ष म्हणून कसे काम करायचे व काय धोरण ठरवायचे, याचा आराखडा मोदी-शहा जोडीकडे होता असेही सांगतात. त्यांच्या कामाची पद्धत पाहता ही गोष्ट खरी असावी. अर्थात मोदींच्या करिश्म्याचा सध्या इतका गौरव होत आहे, की इंदिरा गांधींप्रमाणे ‘मोदी म्हणजेच भाजप’ असे होण्याचा धोका नाकारता येत नाही. तथापि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती पाहता असे होण्याची शक्यता कमी दिसते.
भारतीय राजकारणातील भाजपचा प्रभाव कमी करायचा असेल तर काँग्रेसने मधली फळी सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. हे काम गांधी घराणेच काँग्रेसमध्ये करू शकते. कार्यकारी अध्यक्ष वा गांधी घराण्याबाहेरील अध्यक्षाला हा अधिकार अद्याप काँग्रेस पक्षाने दिलेला नाही. मात्र त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल आणि त्याला काळही बराच लागेल. २०२३च्या वर्ल्डकपसाठी मधली फळी तयार करण्याकडे बीसीसीआयला जसे लक्ष द्यावे लागेल, तसेच काँग्रेसला २०२४साठी करावे लागेल.