भारत जोडो यात्रा; राहुल यांना सापडली दिशा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 08:44 AM2022-11-22T08:44:16+5:302022-11-22T08:44:51+5:30
महाराष्ट्रात ही यात्रा थोडी सामूहिक संमोहनाच्या स्तरावर पोहोचली असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीच्या विधानावरून गदारोळ माजला आणि आतापर्यंत यात्रेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रीय माध्यमांनाही तिची दखल घ्यावी लागली.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार आणि पंडित नेहरूंचे पणतू राहुल असे दोन गांधी शुक्रवारी दिवसभर अकोला जिल्ह्यातील वाडेगावपासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगावपर्यंत भारत जोडो यात्रेत एकत्र चालल्याचा ऐतिहासिक प्रसंग देशाने अनुभवला. शेगावच्या जाहीर सभेत तुषार गांधी यांचे छोटेसे भाषण या ऐतिहासिक क्षणाचे महत्त्व सांगणारे होते. त्या निमित्ताने १९३०ची दांडी पदयात्रा, तिच्या अमृतमहोत्सवी वर्षात गांधी-नेहरूंची चौथी पिढी एकत्र चालल्याचा प्रसंग, सध्याचे द्वेषमूलक राजकारण, त्यावरील प्रेमाचा व सद्भावाची उपाययोजना अशी उजळणी झाली. कन्याकुमारीपासून निघालेल्या व काश्मीरमध्ये सांगता होणाऱ्या साडेतीन हजार किलोमीटरच्या ‘भारत जोडो यात्रे’तील हा एक रोमांचकारी क्षण होता.
आता नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांमधून प्रवास केल्यानंतर मध्य प्रदेश सीमेवर ही यात्रा दोन दिवस विसावा घेत असताना गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्रात राहुल गांधी व यात्रेला काय मिळाले आणि यात्रेतून, राहुलकडून महाराष्ट्राला काय मिळाले, याचा लेखाजोखा मांडायला हवा. यात्रेत काँग्रेसचे झाडून सारे नेते एकत्र आले, त्यांनी एकेका दिवसाचे, एकेका घटिकेचे योग्य नियोजन केले. शेगाव येथील सभेच्या रूपाने गेल्या अनेक वर्षांत दुर्मीळ बनलेले शक्तिप्रदर्शनही केले. असा एखादा मेगा इव्हेंट १३७ वर्षांमध्ये प्रथमच अत्यंत दुबळी बनलेली काँग्रेसही यशस्वी करू शकते, हा संदेश त्या सभेने दिला. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून कार्यकर्ते, सामान्य जनता यात्रेत सहभागी झाली. प्रत्येक जिल्ह्याला ठरावीक वेळ देण्यात आली होती. तिथे शक्तिप्रदर्शनात थोडी स्पर्धाही होती. काँग्रेस किंवा समविचारी पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांशिवाय राजकीय वर्तुळाबाहेरचे लोक, लेखक-विचारवंत मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले. एकंदरीत ७ नोव्हेंबरपासूनचा पंधरवाडा राज्याच्या राजकारणासाठी, समाजकारणासाठी भारावलेला, मंतरलेला होता.
महाराष्ट्रात ही यात्रा थोडी सामूहिक संमोहनाच्या स्तरावर पोहोचली असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीच्या विधानावरून गदारोळ माजला आणि आतापर्यंत यात्रेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रीय माध्यमांनाही तिची दखल घ्यावी लागली. या सगळ्या पृष्ठभूमीवर महत्त्वाचे निरीक्षण असे, की महाराष्ट्रातील पंधरा दिवसांत राहुल गांधी यांच्या वागण्या-बोलण्यात स्पष्टपणे पुरोगामी विचारधारेची दिशा पकडली आहे. सुरुवातीला नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत ही दिशा स्पष्टपणे जाणवली नाही. क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यात ते नेमक्या मुद्यांवर आलेले दिसले. तिथपासून त्यांनी जाहीर सभांमध्ये आदिवासी व वनवासी यातील फरक समजून सांगायला सुरुवात केली. आदिवासी म्हणजे मूळ निवासी, तेच देशाचे खरे मालक; परंतु भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींना वनवासी म्हणतो. त्याचा अर्थ जंगलात राहणारे ते वनवासी. ती विचारधारा आदिवासींना मूळ निवासी मानायला तयार नाही, ही मांडणी राहुल गांधी यांनी थेट सोमवारी गुजरातमधील सुरतच्या प्रचारसभेपर्यंत नेली.
‘भारत जोडो यात्रा’ आता मध्य प्रदेशात प्रवेश करील. ते तर आदिवासीबहुल राज्य. तिथे या दोन संकल्पनांमधील फरकाचा प्रचार आणखी वाढवला जाईल. महाराष्ट्रातील यात्रेच्या अंतिम टप्प्यात इथल्या जनतेच्या प्रतिसादाबद्दल आभार मानताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे साहस, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आणि महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार ही प्रेरणा असल्याचे म्हटले. ‘जय शिवाजी, जय महाराष्ट्र’ असा नाराही दिला. तत्पूर्वी, यात्रेचा सर्वाधिक मुक्काम मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात असताना शेगावच्या विराट सभेत त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केलेल्या शिवरायांच्या जडणघडणीचा आवर्जून उल्लेख केला.
राहुल यांची ही विचाराची दिशा महाराष्ट्रात सतत बोलल्या जाणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकर या पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारसरणीशी मिळतीजुळती असणे, हा केवळ योगायोग नाही. या देशातल्या सामान्य माणसांच्या सुख-दु:खाशी समरस व्हायचे असेल, त्यांच्या व्यथा-वेदना समजून घ्यायच्या असतील, बेरोजगार युवकांत उमेद वाढवायची असेल, शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवर चर्चा घडवायची असेल, स्त्री-पुरुष समानतेचा धागा पुढे न्यायचा असेल तर याच महापुरुषांच्या विचारांची कास धरावी लागेल, याचे स्पष्ट भान राहुल गांधींना असल्याचे हे निर्देश आहेत. हा धागा पुढे नेणे हे केवळ काँग्रेस पक्ष नव्हे, तर राज्यातील सगळ्याच पुरोगामी घटकांपुढील मोठे आव्हान आहे.