भारत जोडोचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 12:16 PM2022-09-08T12:16:01+5:302022-09-08T12:16:27+5:30
रोज एकेक नेता सोडून जात असल्याने रोज आणखी दुबळा बनत चाललेला काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेच्या रूपाने देशव्यापी मुद्दा घेऊन मैदानात उतरत असेल आणि राजकारणात अजिबात सातत्य नसलेले राहुल गांधी सलग पाच महिने पायी चालणार असतील तर त्यात त्यांचा व पक्षाचाच खरा कस लागणार आहे. ही कसोटी ते कसे पार करतात, हे पाहावे लागेल.
देशभरातील धार्मिक द्वेष, दंगलींमुळे उद्विग्न झालेले दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत भारत जोडो नावाने काढलेल्या यात्रेला आता साडेतीन दशकांहून अधिक काळ उलटला आहे. बाबांनी तशा दोन यात्रा काढल्या. पहिली कन्याकुमारी ते काश्मीर आणि दुसरी सिलचर ते सौराष्ट्र. खंडप्राय भारतातील अनुक्रमे दक्षिण-उत्तर व पूर्व-पश्चिम टोके जोडणाऱ्या या यात्रा. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी कन्याकुमारी येथून नेमक्या याच नावाने सुरू केलेल्या आणि देश जोडण्यासाठी म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेच्या हेतूने सुरू केलेल्या यात्रेची मात्र आमटे यांच्या यात्रेशी तुलना करता येणार नाही. स्वत: राहुल गांधींपासून अशोक गेहलोत, पवन खेरा प्रभृती या यात्रेचा राजकारणाशी संबंध नाही असे वारंवार सांगत असल्या तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. यात्रेच्या तयारीसाठी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर सामाजिक संस्थांंच्या प्रतिनिधींनीही हे गैरराजकीय आयोजन असल्याचे सांगून सहभागाची घोषणा केली.
खरे तर असा गैरराजकीय पवित्रा घेण्याची काहीही आवश्यकता नाही. सगळ्याच राजकीय पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भारतीय पक्षाने कालच नवी दिल्लीत त्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. भाजपचे चाणक्य समजले जाणारे गृहमंत्री अमित शहा सक्रिय झाले आहेत. सोमवारचा त्यांचा मुंबई दौरा केवळ शिवसेनेला दम देण्यासाठी किंवा मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्याच्या प्रयत्नाचा भाग नव्हता. महाविकास आघाडी नावाचे महाराष्ट्रातील आव्हान मोडीत काढण्याची, ‘मिशन महाराष्ट्र’ची सुरुवात मुंबईतून झाली आहे. बिहारमधील नाट्यमय सत्तांतरानंतर नितीश कुमार बाहेर पडले आहेत. दिल्लीत त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आधी जुन्या जनता दलाचे तुकडे एकत्र करायचे व नंतर देशातील सगळ्या भाजपेतर पक्षांची मोट बांधायची, अशी उघड रणनीती त्यांनी आखली आहे. हे सारे पाहता राहुल गांधी किंवा त्यांचा काँग्रेस पक्ष निवडणुकीची तयारी करीत असेल आणि भारत जोडो यात्रा त्या देशव्यापी तयारीचा भाग असेल तर ते खुलेपणाने मान्य करायला हवे. ताकाला जाऊन भांडे लपविण्याची अजिबात गरज नाही.
हा राजकीय भाग बाजूला ठेवला तरी ज्या मुद्द्यांवर ही यात्रा काढली जात आहे, ते मुद्दे अगदीच कुचकामी, टाकाऊ आहेत, असे नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष साडेतीन हजार किलोमीटर अंतराची, बारा राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून जाणारी दीडशे दिवसांची यात्रा काढताेय म्हणजे सारे काही देशात भाजपची सत्ता आल्यानंतरच घडले असेही नाही. देश तोडला जाण्याच्या प्रक्रियेतील त्यांच्याही कृत्यांची खुलेपणाने चर्चा व्हायला हवी. पण, एकंदर चित्र विषण्ण करणारे आहे. ‘ईश्वर, अल्ला तेरो नाम..’ म्हणत संपूर्ण जगाला सन्मती, शांतता व अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या या देशात एक प्रचंड अस्वस्थ करणारा धार्मिक व जातीय दुभंग रोज अनुभवास येत आहे. धार्मिक सहिष्णुता हे भारताचे वैशिष्ट्य आपण सारे विसरत चाललो आहोत. परधर्मीयांच्या श्रद्धास्थानांवर, आस्था, पूजापद्धतीवर हल्ला करणे म्हणजेच स्वधर्मसंरक्षण अशी काहीतरी विचित्र व्याख्या बनली आहे. दुर्दैवाने, सगळ्याच धर्मांमधील कट्टरपंथी मंडळी या आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत. बहुसंख्य माध्यमे विवेक विसरली आहेत. धर्मांधतेच्या नावाने सामान्य माणसांचे जगणे संकटात आले आहे. अतिरेक वाढीस लागला आहे. ते आणि आम्ही, ही भाषा धर्माच्या संदर्भाने कधी नव्हे इतकी ऐकू येऊ लागली आहे. त्यात बलवान कधी भरडले जात नाहीत. महिला, मुले, वृद्ध असे दुबळे वर्ग या धर्मांधतेला बळी पडतात.
अशावेळी, शांतता व स्थैर्याशिवाय विकास होत नाही, हे जाणूनदेखील सत्तेवर असलेली मंडळी विद्वेष, विखार पसरविला जात असताना बोलत नाहीत, चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न करीत नाहीत, ही खंत आहे. त्यामुळेच जगातल्या अन्य देशांना भारताच्या अंतर्गत व्यवहारात डोकावण्याची, टीकेची संधी मिळते. धर्म, संस्कृतीच्या विविधतेतही ऐक्य ही जगभरातील भारताची प्रतिमा डागाळते. या पार्श्वभूमीवर, रोज एकेक नेता सोडून जात असल्याने रोज आणखी दुबळा बनत चाललेला काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेच्या रूपाने देशव्यापी मुद्दा घेऊन मैदानात उतरत असेल आणि राजकारणात अजिबात सातत्य नसलेले राहुल गांधी सलग पाच महिने पायी चालणार असतील तर त्यात त्यांचा व पक्षाचाच खरा कस लागणार आहे. ही कसोटी ते कसे पार करतात, हे पाहावे लागेल.