राहुल गांधींची ‘ती’ मिठी उत्स्फूर्त नव्हे, पूूर्वनियोजितच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:21 AM2018-07-27T06:21:54+5:302018-07-27T06:25:25+5:30
अविश्वासाचा प्रस्ताव मागे पडून राहुल गांधींची मिठी आणि नेत्रपल्लवीच चर्चेचा विषय ठरली.
- हरीश गुप्ता (‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राहुल गांधी हे राजकारणाचेही धडे घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यात ते बरेच लवकर तरबेज झाल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेस कार्यकारिणीतील बड्या धेंड्यांना डावलून कार्यकारिणीची फेररचना करताना त्यांनी अनेकांना आश्चर्याचे धक्के दिले. पक्षात पिढीचा बदल होणे आवश्यक आहे, हेही त्यांनी दाखवून दिले. त्यानंतर लोकसभेत त्यांनी पंतप्रधानांना मिठी मारून आणि नंतर आपल्या जागेवर बसून केलेल्या नेत्रपल्लवीने तर वादळच निर्माण झाले. त्यामुळे अविश्वासाचा प्रस्ताव मागे पडून मिठी आणि नेत्रपल्लवीच चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या त्या कृतीबद्दल राहुल गांधी परस्पर विसंगत वक्तव्ये करीत राहिले. त्याच दिवशी एनडीटीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी त्यांची कृती उत्स्फूर्त असल्याचे सांगितले. तसेच त्यानंतर त्यांनी केलेली नेत्रपल्लवीसुद्धा पूर्वनियोजित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिला पत्रकारांशी इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे चाय पे चर्चा करताना आपण त्या मिठीविषयी बºयाच आधीपासून विचार करीत होतो, असे त्यांनी सांगितले. त्यापलीकडे आणखी काही सांगण्यास त्यांनी नकार दिला. मिठीच्या योजनेविषयी त्यांनी पक्षातील कोअर ग्रुपशी चर्चा केली होती. तसेच त्याचे परिणाम काय होतील याविषयी सोनियाजी व प्रियंका यांचेशी विचारविमर्श केला होता. ही गोष्ट संसदीय परंपरांना धरून योग्य होणार नाही असे सोनिया गांधींना वाटत होते व त्यामुळे त्या चिंतित होत्या. पण मोदींनी स्वत: संसदीय परंपरांची कधी बूज राखली होती असा सवाल प्रियंका गांधींनी केला. वास्तविक अविश्वास ठराव आणणे हा विरोधी पक्षांचा अधिकार असताना तो ठराव मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडू दिला नव्हता. अशास्थितीत त्यांना मिठी मारण्यात कोणत्याही औचित्याचा भंग होत नाही अशा निष्कर्षाप्रत ते आले. या विचाराला राहुल गांधींनी शुक्रवारी प्रत्यक्षात उतरविले. अविश्वास ठरावावरील राहुल गांधींचे भाषण प्रभावशाली होते. ते स्वत:ही त्यामुळे उत्तेजित झाले होते व त्याच अवस्थेत ते खाली बसलेसुद्धा. मग अचानक त्यांना मिठीची योजना आठवली. त्यामुळे ते पुन्हा उभे होत बोलू लागले. एक मिनिटभर भाषण झाल्यावर खाली बसण्याऐवजी ते सरळ मोदींच्या आसनापाशी गेले व मोदींना मिठी मारून त्यांनी पहिला धक्का दिला. त्यामुळे दुसºया दिवशी अविश्वास ठरावाला हेडलाईन मिळण्याऐवजी राहुलजींच्या मिठीलाच जास्त प्रसिद्धी मिळाली.
पंतप्रधान मुद्यावर काँग्रेसचे ‘यू’टर्न
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या सूत्रांनी जेव्हा राहुल गांधी हे पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे सांगायला सुरुवात केली तेव्हा एकच हलकल्लोळ उडाला. कारण कार्यकारिणीची बैठक होईपर्यंत राहुल गांधी हेच सांगत होते की, २०१९ च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करणे हेच आपले लक्ष्य राहील. आपण पंतप्रधान होणार नाही, असेच ते सांगत होते. दीड वर्षांपूर्वी काही निवडक पत्रकारांसोबत (त्यात मीही एक होतो.) बोलताना त्यांनी पंतप्रधानपदासाठी २०२४ किंवा त्या पलीकडेही थांबण्याची आपली तयारी आहे, असे सांगितले होते. पण २०१९ मध्ये मोदी राहता कामा नये, हा त्यांचा आग्रह होता. पण कार्यकारिणीच्या सूत्रांनी जे काही सांगितले त्यामुळे मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार इ. मंडळी अस्वस्थ झाली. शरद पवारांसोबत तीनवेळा झालेल्या भेटीत जी बोलणी झाली होती त्याच्या हे विपरीत होते. पण राहुल गांधींनी लगेच खुलासा करून त्यामुळे होणारे नुकसान टाळले. महिला पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रा.स्व. संघाचा समर्थक पंतप्रधान वगळून अन्य कुणालाही पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी आहे! मायावती किंवा ममता किंवा अन्य कुणीही पंतप्रधान झालेले आपल्यास चालेल. महिला पंतप्रधान झालेली तुम्हाला चालेल का, या प्रश्नावर त्यांनी रा.स्व.संघाचे समर्थन नसलेली कोणतीही व्यक्ती चालेल, असे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे त्या पदासाठी दावेदार असलेल्यांना हायसे वाटले!
काँग्रेसशी जुळवून घेण्यास ममता तयार!
आगामी लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि तृणमूल काँग्रेसशी कोणत्याही प्रकारची आघाडी करण्यास काँग्रेसची तयारी आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. वास्तविक प. बंगालमध्ये काँग्रेसशी आघाडी करण्यास माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे उत्सुक होते. पण केरळात काँग्रेस व कम्युनिस्ट हे एकमेकांचे विरोधक असल्याने प. बंगालमध्ये त्यांचे ऐक्य होणे कठीण झाले आहे. समविचारी पक्षांना बाहेरून पाठिंबा देण्याची डाव्या पक्षांची तयारी राहील, असे काँग्रेसमधील धोरणी लोकांना वाटते. त्यामुळे डाव्या पक्षांना प. बंगाल, केरळ व त्रिपुरा या राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवू द्यावे, असा विचार काँग्रेस पक्षात बळावतो आहे. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना साथ देणे योग्य ठरेल, असे काँग्रेसला वाटते आहे. प. बंगालमधील ४२ जागांपैकी ७-८ जागांवर काँग्रेसचा न्याय्य हक्क आहे. पण तृणमूल काँग्रेसची तयारी ५-६ जागा देण्याची आहे. तृणमूल आणि काँग्रेस यांची आघाडी प. बंगालमध्ये ३९ जागा सहज जिंकू शकते, कारण कम्युनिस्टांचे कार्यकर्ते भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात विभागले गेले आहेत. २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेस व तृणमूल काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे लढवली होती. त्यावेळी काँग्रेसला दोन आणि तृणमूल काँग्रेसला ३४ जागा मिळाल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत गोरक्षेच्या आणि हिंदू भावनांच्या मुद्यावर आणि अॅन्टी इन्कम्बन्सीच्या लाटेवर भाजपा २१ जागा जिंकण्याची अपेक्षा करीत आहे. त्यावर मात करण्यासाठी ममता बॅनर्जी या काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास तयार आहे. शिवाय पंतप्रधानपदावर दावा सांगण्याचीही त्यांची तयारी आहे.
उत्तर प्रदेशातील फॉर्म्युला
सपा आणि बसपा यांनी उत्तर प्रदेशात एकत्र लढविण्याचे ठरवून जागा वाटपाचा जो फॉर्म्युला निश्चित केला आहे तो काँग्रेस आणि रालोद यांना अवगत करण्यात आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जो पक्ष जिंकला होता किंवा दुसºया क्रमांकावर होता ती जागा त्या पक्षाला देण्यात यावी, हा तो फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे काँग्रेसला सात जागा आणि अजितसिंग यांच्या रालोदला दोन जागा मिळू शकतात. उरलेल्या जागा बसपा आणि सपा यांच्यात विभागल्या जातील. उत्तर प्रदेशातील जितीन प्रसाद, आरपीएन सिंग आणि राहुल गांधींच्या तरुण तुर्कांना वाटत आहे की, पक्षासाठी १० जागा सोडण्यात याव्यात. मायावती यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, बसपाला मध्य प्रदेशात, छत्तीसगडमध्ये आणि राजस्थानमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या तरच आपण विरोधकांच्या आघाडीत सामील होऊ. तेव्हा उत्तर प्रदेशात काँग्रेससाठी दहा जागा सोडताना अन्य राज्यात आपल्या पक्षाला योग्य वाटा मिळावा अशी बसपाची इच्छा दिसते म्हणूनच बहुधा राहुल गांधींनी पंतप्रधानपदाचे कार्ड वापरायचे ठरवलेले दिसते!