अध्यक्षपदी राहुल : आव्हाने अनेक तशा संधीही अपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:09 AM2017-12-09T05:09:13+5:302017-12-09T05:09:26+5:30
सोनिया गांधींच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीनंतर, राजकारणात दीर्घकाळ केंद्रस्थानी असलेल्या १३४ वर्षे वयाच्या सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद, ११ डिसेंबर रोजी राहुल गांधी स्वीकारणार आहेत.
सोनिया गांधींच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीनंतर, राजकारणात दीर्घकाळ केंद्रस्थानी असलेल्या १३४ वर्षे वयाच्या सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद, ११ डिसेंबर रोजी राहुल गांधी स्वीकारणार आहेत. राहुल गांधींनी ४ डिसेंबरला अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. काँग्रेस मुख्यालयात यावेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सवी वातावरण होते. नव्या अध्यक्षाने कार्यभार हाती घेण्यापूर्वी इमारतीच्या अंतर्गत सजावटीत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. मुख्यालयाच्या वास्तूवर नवा रंग चढला. काँग्रेस पक्षाचा एकूणच माहोल बदलत असल्याचे हे सूचक प्रतीक असावे, असे मुख्यालयाच्या प्रांगणात शिरल्यावर वाटले.
राहुल गांधींसमोर कठीण स्वरूपाची अनेक राजकीय आव्हाने उभी आहेत. त्यांनी अशावेळी अध्यक्षपद स्वीकारण्याची जोखीम पत्करलीय की, आणखी सात दिवसांनी गुजरात निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. काँग्रेसने गुजरातमध्ये जर चमत्कार घडवला, पंतप्रधान मोदींच्या गृहराज्यात २२ वर्षानंतर खरोखर भाजपला सत्ता गमवावी लागली, तर या देदीप्यमान यशामुळे राहुलच्या कारकिर्दीचा मजबूत प्रारंभ होऊ शकेल. गुजरातपाठोपाठ नव्या वर्षाच्या सुरुवातीला कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका आहेत. तिथे सत्ता कायम राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. कर्नाटकात सलग दुसºयांदा काँग्रेसला विजय प्राप्त झाला तर त्याचे सारे श्रेय राहुलना मिळेल. २०१८ अखेर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे एकाचवेळी विधानसभेची निवडणूक आहे. तीनही राज्यात आज भाजप सत्तेवर आहे. तरीही मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमधेच रंगणार आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर या निवडणुकांचे निकाल थेट परिणाम घडवणारे ठरतील. वर्षभरात पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने काही चमत्कार घडवले तर २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राहुलच्या नेतृत्वाखाली अधिक मजबूत पायावर पक्ष उभा असल्याचे चित्र दिसेल.
राहुल गांधींची सर्वात मोठी कमजोरी काय? तर आजवरच्या राजकीय कारकिर्दीत, राजकारणाविषयी ते गंभीर आहेत, असे चित्र दृश्य स्वरूपात दिसले नाही. कधी दीर्घ सुटीवर परदेशात निघून गेले तर महत्त्वाच्या राजकीय घटनाक्रमातही अनेकदा त्यांनी स्वत:ला दूर ठेवले. या कारणांमुळे विरोधकांच्या टीकेला अन् स्वपक्षीयांच्या नाराजीलाही ते कारणीभूत ठरले.
नरेंद्र मोदी २०१४ साली सत्तेवर विराजमान झाले तेव्हापासून काँग्रेसला विविध राज्यात सातत्याने पराभवाचे तोंड पहावे लागले. खुल्या दिलाने या पराभवांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी सोनियांच्या मागे बचावात्मक पवित्र्यात राहुल उभे आहेत असे चित्र देशाला दिसले. आता मात्र त्यांना असे करता येणार नाही. विजयाचे श्रेय जर शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवणारे असेल तर पराभवाची जबाबदारीही राहुलना उचलावीच लागेल. अध्यक्षपद स्वीकारल्याबरोबर गुजरात व कर्नाटकात अवघड सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागेल. दोन्ही राज्यात काँग्रेसला अपेक्षेनुसार यश मिळाले नाही, तर पक्षाला मोठा धक्का बसेल. मध्यप्रदेश आणि राजस्थानात आपल्या खास पसंतीच्या नेत्यांकडे राहुल गांधींनी राज्यातल्या संघटनेची सूत्रे सोपवली आहेत. काँग्रेस पक्ष या राज्यांमधे अंतर्गत गटबाजीचा शिकार आहे. या दोन राज्यात काँग्रेसला सत्ता हस्तगत करता आली नाही तर केवळ राहुलच्या नेतृत्वक्षमतेवरच नव्हे तर त्यांच्या पसंतीवरही प्रश्नचिन्हे उभी राहतील.
अध्यक्षपद स्वीकारल्यापासून प्रत्येक प्रसंगात राहुल गांधींची तुलना पंतप्रधान मोदींबरोबर होऊ लागेल. साहजिकच आपली राजकीय प्रतिमा मोदींच्या समकक्ष ठेवण्याचे मोठे आव्हान राहुल यांच्यासमोर आहे. घराणेशाहीतून आलेले नेतृत्व हा आरोप राहुल गांधींवर सुरुवातीपासून होत आला आहे. काँग्रेसच्या शीर्ष पदावर पोहोचलेल्या नेहरू-गांधी घराण्याच्या पाचव्या पिढीचे ते राजकीय वारसदार आहेत. मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यापैकी प्रत्येकाने आपल्या व्यक्तिगत गुणवत्तेच्या बळावर बºयावाईट प्रसंगांना तोंड दिले. सोनिया गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हाही काँग्रेसची स्थिती खराबच होती मात्र आजइतक्या दारुण अवस्थेत काँग्रेस पक्ष नव्हता. त्या तुलनेत राहुलसमोरची आव्हाने अधिक कठीण व अनेक पटींनी मोठी आहेत. आता त्यांचा थेट सामना सलग १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रिपद आणि ५ वर्षे देशाचे पंतप्रधानपद सांभाळलेल्या मोदींशी आहे.
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तरीही देशाच्या राजकारणात फारसे बदल घडण्याची शक्यता नाही, ही भाजपची अधिकृत प्रतिक्रिया असली तरी गुजरातमध्ये राहुलना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, भाजपने या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. राहुलनी स्वत:ला अपग्रेड करीत एका झुंजार नेत्याचे रूप गुजरातमध्ये धारण केले काँग्रेसचे अध्यक्षपद हाती आल्यानंतर तर त्यांची राजकीय प्रतिमा अधिकच उंचावेल या शंकेमुळे भाजपमधे सध्या वेट अँड वॉचची स्थिती आहे.
यापुढे पप्पूच्या प्रतिमेत राहुलचा प्रचार घडवता येणार नाही, याचीही जाणीव प्रमुख नेत्यांना झाली आहे. भाजपचे नेते गुजरातमध्ये पुन्हा भाजपच सत्तेवर येईल, हा वरकरणी आत्मविश्वास प्रदर्शित करीत असले तरी आज मनातून ते बºयापैकी हादरले आहेत. राजकीय सभ्यता सोडून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह ज्याप्रकारे राहुलवर हल्ले चढवीत सुटलेत, त्यामुळे राहुलची राजकीय उंची वाढायला मदतच झाली आहे.
सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)