देशाला आता ‘पुढे’ पाहावे लागेल, ‘मागे’ नव्हे; काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 09:41 AM2022-12-05T09:41:44+5:302022-12-05T09:42:15+5:30
खरे तर आता इतिहासात डोकावत राहण्यापेक्षा भविष्याचा विचार, नियोजन आणि आखणी करणे, त्याचबरोबर ‘पुढे पाहणे’ अधिक महत्त्वाचे आहे, असे मी मानतो!
शशी थरूर, खासदार, ज्येष्ठ काँग्रेस नेते
मी अनेक लोकांना विचारत असतो, तुम्हाला गेल्या आठ वर्षांतील मोदी सरकारच्या राजवटीतून काय लाभ झाला? मुंबईत एका कार्यक्रमावेळी मोठी गर्दी होती; तेव्हाही मी हा प्रश्न विचारला होता. फक्त एकट्यानेच ‘हो, मला फायदा झाला’- असे उत्तर दिले. उर्वरितांनी नाही. मोदी सरकारच्या काळात महागाई चहूबाजूंनी वाढली. तेल, डाळीसह स्वयंपाकाचे पदार्थ व वस्तू, तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. महागाईबाबत लोकांना राग आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस हाच लोकांना महत्त्वाचा पर्याय वाटतो.
केवळ एकटा काँग्रेस पक्ष मोदींच्या भाजपला टक्कर देऊ शकेल काय असा प्रश्न मला माध्यमांकडून विचारला जातो. मी म्हणेन, लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस हाच प्रमुख पक्ष असेल. देशभर काँग्रेस पसरलेली आहे. अनेक राज्यांत काँग्रेसकडे सत्ता नसली तरी, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच आहे. काही राज्यांत अन्य प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. अशा मजबूत प्रादेशिक पक्षांसोबत लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसला जागांबाबत समझोता करावा लागेल. विविध राज्यांमध्ये समविचारी व बलवान पक्ष हेरून त्यांच्याशी काँग्रेसने राज्यनिहाय समझोता केला तर ते लाभदायी ठरेल.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ने काँग्रेसच्या केडरमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. भारत जोडो यात्रेला सगळीकडे प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. विविध स्तरांवरील लोक या पदयात्रेत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांचा खरा, सतेज चेहरा या यात्रेतून पुढे आला. राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा भाजपसारख्या विरोधकांनी गेल्या काही वर्षांत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारत जोडो यात्रेद्वारे खूप प्रभावी असे राहुल गांधी पुढे आले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेगळीच ऊर्जा व उत्साह यात्रेद्वारे प्राप्त झाला आहे. राहुल गांधी यात्रेत अखंडपणे चालतात. शिवाय प्रत्येक ठिकाणी ते लोकांशी संवाद साधतात आणि प्रत्येक दिवशी ते लोकांचे वेगळे विषय घेऊन बोलतात. प्रत्येक भागात वेगळे प्रश्न असतात, त्या प्रश्नांवर राहुल बोलताना पाहायला मिळतात. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून काँग्रेसला जबरदस्त बळ मिळवून दिले आहे हे मान्य करावे लागेल.
महाराष्ट्रात यात्रा होती तेव्हा सावरकरांविषयी बोलण्याची गरज होती काय असा प्रश्न येऊ शकतो; पण त्यांना कुणी प्रश्न केल्यामुळे किंवा अन्य कारणास्तव बोलावे लागले काय हे मला ठाऊक नाही. मला त्याबाबतची पार्श्वभूमी ठाऊक नाही. महाराष्ट्रात असताना राहुल गांधी सावरकरांविषयी का व्यक्त झाले याचे कारण किंवा त्यावेळची नेमकी स्थिती, त्यांच्या विधानाचा नेमका संदर्भ मला ठाऊक नाही. त्यांनी स्वत:हून विषय काढला की, अन्य कुणीतरी विषय उपस्थित केला म्हणून त्यांना प्रतिक्रिया द्यावी लागली, हेही मला ठाऊक नाही. महाराष्ट्रात सावरकरांविषयी वेगळी जनभावना आहे हे मी जाणतो. शिवाय राहुल गांधी यांची सावरकरांविषयीची मते देशाला ठाऊक आहेत. त्यांनी पुन्हा त्या विषयाला स्पर्श करणे गरजेचे होते काय, असा मुद्दा येऊ शकतो; पण मी वर म्हटल्याप्रमाणे मला पार्श्वभूमी ठाऊक नाही. खरे तर आता इतिहासात डोकावत राहण्यापेक्षा भविष्याचा विचार, नियोजन आणि आखणी करणे अधिक महत्त्वाचे आहे असे मी मानतो. आज कधी नव्हती एवढी देशाला पुढे पाहण्याची गरज आहे!
(शब्दांकन : सद्गुरू पाटील, संपादक, लोकमत, गोवा)