यमुनेचे खवळलेले पाणी, पवार आणि प्रियांका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 05:46 AM2021-01-07T05:46:53+5:302021-01-07T05:55:22+5:30

Sharad Pawar: आपल्या बंधूंबाबत प्रियांका यांनी दिलेली ग्वाही बंडखोरांच्या पचनी पडेल काय? की यमुनेच्या पाण्यात मासेमारीसाठी स्वत: शरद पवार यांनाच उतरावे लागेल?

turbulent waters of the Yamuna, sharad Pawar and Priyanka gandhi | यमुनेचे खवळलेले पाणी, पवार आणि प्रियांका

यमुनेचे खवळलेले पाणी, पवार आणि प्रियांका

Next

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली


शरद पवार यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा अचानक कशा काय पालवल्या, याबद्दल एक रोचक गोष्ट सध्या राजधानी दिल्लीत ऐकू येते आहे.  असे सांगितले जाते, की राज्यसभेचे उपाध्यक्ष गुलाम नबी आझाद यांचा म्हणे पवार यांना फोन आला. राष्ट्रीय पातळीवर आपण भूमिका बजावण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी पवार यांना सांगितले. अशी काही भूमिका बजावण्याचा प्रयत्न यापूर्वी पवारांनी केलेला आहे आणि प्रत्येक वेळी त्यांचे हात पोळलेले असल्याने स्वाभाविकपणे ते बरेचसे अनुत्सुकच होते. इतर काही बंडखोर नेतेही पवार यांच्याशी बोलले असे म्हणतात. याच दरम्यान दुसरी एक घटना घडली...

बंडखोर नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे जाहीरपणे दुर्लक्ष केले. त्याचे झाले असे; अहमद पटेल यांच्या निधनानंतर  त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहुल गांधी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्याप्रसंगी आनंद शर्मा आणि भूपिंदरसिंग हुडा हेही तिथे होते. पण त्यांनी राहुल गांधींच्या तेथे असण्याची दखलच घेतली नाही. या घडामोडी प्रियांका गांधी यांच्या कानावर गेल्या. प्रियांका यांनी ताबडतोब सुजनसिंग पार्क या त्यांच्या निवासस्थानी गुलाम नबी, आनंद शर्मा आणि इतर बंडखोर नेत्यांना एकेक करून चहापानाला बोलावून घेतले. प्रियांका यांचा सूर मवाळ असल्याने अर्थातच हे नेते पाघळले म्हणतात. “सोनियांशी बोलून आपण मतभेद मिटवू,” असे प्रियांका यांनी यातल्या प्रत्येकाला सुचवले, ते त्यांनी मान्यही केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांनी “आम्ही राहुलना भेटणार नाही,” असे प्रियांका यांना स्पष्ट सांगितले. आपण कितीही प्रयत्न केले तरी राहुल बधणार नाहीत, त्यांनी जे ठरवले आहे तसेच ते वागत राहतील; हे आपले मत यातल्या प्रत्येकाने प्रियांकांना ऐकवले. आपले बंधुराज केवळ पक्ष बळकटीसाठी झटत राहतील, कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवणार नाहीत, अशी ग्वाही प्रियांका यांनी या नेत्यांना दिली, असे कळते. आता हे सारे बंडखोर नेते गांधी मंडळींचे ऐकतील काय? - की यमुनेच्या खवळलेल्या पाण्यात मासेमारी करायला स्वत: शरद पवार यांनाच उतरावे लागेल? - हे येणारा काळ सांगेल. प्रियांका यांनी तात्पुरती बाजी मारली हे मात्र खरे.


नितीश यांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा?
राज्याच्या कारभारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण संयुक्त  जनता दलाचे अध्यक्षपद सोडणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले आहेत. पण ते तसे काही करतील यावर कोणाचाच विश्वास नाही. गेली १६ वर्षे ते असेच करीत आले आहेत. आतल्या गोटातून कानावर येते ते असे की नितीश राज्यात अडकून राहायला कंटाळले आहेत. भाजपच्या पुढे पुढे करण्याचा त्यांना उबग आला आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनातून अजिबात गेलेली नाही. दुसरे असे की बिगर भाजप पक्षांत राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करील असा तोलामोलाचा नेता दिसत नाही. मोदी  यांना पर्याय देण्यात राहुल गांधी सपशेल अपयशी ठरले.  नितीश कुमार यांना सोबत घेऊन बिगर भाजप पक्षांचे नेतृत्व करता येईल का याची चाचपणी राहुल गांधी यांनी केलीही होती. पण ते प्रयत्न अज्ञात कारणास्तव फसले. आता “आपल्याला राष्ट्रीय पातळीवर  भूमिका आहे,” असे नितीश यांना दिसू लागले आहे.  शरद पवार यांना राष्ट्रीय पर्याय म्हणून स्वीकारण्यात काँग्रेस पक्षातले काही जण आकडूपणा करतील हे नितीश यांना ठाऊक आहे. अनेक विषयांवर भाजपचा समाचार घ्यायला  जनता दल नेत्यांनी सुरुवात केलीच आहे. लव्ह जिहाद, शेतीविषयक कायदे यांवर त्यांनी भाजपला बोचकारले आहे. उलथापालथ करण्याची क्षमता बाळगून असलेले नितीश कुमार आता काय करतात, हे बघायचे. 


परिवारात धुसफुस
सहा वेळा खासदार झालेले मनसुख वसावा यांनी  भाजप आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा मागे घेतला. पक्षातील नेत्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. वसावा यांनी राजीनामा भले मागे घेतला असेल. पण, या प्रकाराने संघ परिवारातील धुसफुस लपून राहिली नाही. घरातल्या गोष्टी घरातच झाकून ठेवण्यात भाजप पारंगत पक्ष मानला जातो. पण वसावा यांनी पंतप्रधान कार्यालयाबद्दल नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. नर्मदा जिल्ह्यातील १२१ खेडी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागात समाविष्ट करण्याविषयीचे हे प्रकरण वसावा यांनी लावून धरले होते. पर्यावरण मंत्रालयाने संबंधित अधिसूचना मागे घ्यावी, ही खेडी त्याच्या कक्षेतून वगळावीत, अशी वसावा यांची मागणी होती. पण पंतप्रधान कार्यालयाने त्यांचे ऐकले नाही. आदिवासींनी या विषयावर सुरू केलेल्या  आंदोलनाला वसावा यांनी पाठिंबा दिला. 


हे वसावा मोदी यांच्या गुजरातमधले. गुजरातच्या कोणत्याही विषयात असा हस्तक्षेप करण्याची हिंमत आजवर कोणी मंत्री वा नेता करू शकलेला नाही, ती हिंमत वसावा यांनी दाखवली. त्यांनी जेंव्हा खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली तेंव्हा बॉम्बगोळाच पडला. खुद्द मोदी यांनी त्यांना पुढच्या ३६ तासांत राजीनामा मागे घ्यायला सांगितले. सरकार कसा कारभार करते आहे, हे या घटनेतून उघड झाल्याने त्यातून काही संदेश गेलाच. पंतप्रधान कार्यालयाच्या इशाऱ्याशिवाय मोदींच्या राज्यात झाडाचे पानही हलत नाही, हे यातून अधोरेखित झाले. 
भाजपचेच राज्यसभेतले खासदार सुब्रमण्यम स्वामी सरकारला उभे - आडवे घेतच आहेत. प्रधान वैज्ञानिक सल्लागार नेमण्याच्या विषयावर स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालयावर टीका केली.  डॉ. विजय राघवन यांनी कोणत्याही परवानगीशिवाय चीनमधला वूहान वटवाघूळ  संशोधन प्रकल्प नागालँडमध्ये आणला. वटवाघळांवर त्यांना संशोधन करायचे होते. 


स्वामी यांनी तोफ डागल्यावर लगेच सूचना निघाली की त्यावर पक्षातून कोणीही प्रतिक्रिया द्यायची नाही. कोरोना साथ लक्षात घेऊन या वर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन घेऊ नका, असे स्वामी यांनी ट्विट करून पंतप्रधानांना सुचविले होते. हे स्वामी एप्रिल २०२२ मध्ये राज्यसभेतील नियुक्त सदस्यत्वावरून निवृत्त होतील. पुढची बेगमी करण्यासाठी स्वामी यांनी हे उद्योग चालवलेत, असे राजधानीत म्हटले जाते. अर्थात त्यांच्यासारखे अनेक जण आणखी कुठे काही मिळेल का, याचा शोध घेत आहेत.
 

Web Title: turbulent waters of the Yamuna, sharad Pawar and Priyanka gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.