उद्धव ठाकरे राज्याचे ‘मुख्यमंत्री’ की ‘शिवसेना पक्षप्रमुख’ ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 06:12 AM2021-08-06T06:12:38+5:302021-08-06T06:17:44+5:30
Uddhav Thackeray News: शिवसेनेची आडदांड, कट्टर प्रतिमा बदलून परकेपणाची भावना घालवण्यासाठी ठाकरे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा चतुर उपयोग करून घेत आहेत! तो कसा?
- यदु जोशी
(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)
मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी त्यांच्यातील ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे’ यांना संपविणे वा कमी करणे सुरू केले आहे का?- पक्षप्रमुख पदाकडे त्यांचे हवे तेवढे लक्ष नाही, असा तर्क सध्या काही जण देताना दिसतात. सत्तेच्या नादी लागून ते पक्षाकडे दुर्लक्ष करत आहेत, पक्षात पूर्वीप्रमाणे लक्ष घालू शकत नाहीत, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे’ असे नाव दहावेळा छापून येते, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे’ हे नाव मात्र त्या मानाने दोनच वेळा छापून येते; त्यामुळे पक्षप्रमुखांवर मुख्यमंत्री भारी ठरत आहेत, असेही काहींचे म्हणणे आहे. साडेबारा कोटी लोकांचे राज्य चालवण्यात ठाकरे व्यग्र झाले आहेत, त्यामुळे पक्षाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते.
- अर्थात, या चर्चेला दुसरी बाजूदेखील आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा फायदा स्वतःच्या प्रतिमेचा विस्तार आणि शिवसेनेबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे करवून घेत आहेत. महाविकास आघाडी सरकारचे चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मध्यंतरी अभियान राबविले. हे नवे राजकारण भाजप आणि सरकारमधील मित्र पक्षांच्यादेखील लक्षात आलेले नसावे. शिवसेनेला स्वबळावर कधीही सत्ता प्राप्त करता आलेली नाही. कधी भाजपचा तर आता काँग्रेस-राष्ट्रवादीचा सहारा घ्यावा लागत आहे. दलित-मुस्लीम ही मोठी व्होट बँक शिवसेनेसोबत कधीही राहिली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखा करिष्मा असलेला नेता असूनदेखील त्यांना भाजपची साथ घ्यावी लागली होती. हिंदूंमधील धर्मनिरपेक्ष मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ दिली. संघाच्या चष्म्यातून हिंदुत्वाकडे पाहणाऱ्यांनी कमळ हातात घेतले. त्यामुळे शिवसेनेला बऱ्याच मर्यादा आल्या. ‘छत्रपतींचा आशीर्वाद’ असे म्हणत शिवसेनेकडील व्होट बँक स्वतःकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपने केले. कट्टर भूमिकेतून शिवसेनेचे बळ निर्माण झाले ही एक बाजू असली तरी त्याच भूमिकेमुळे बरेच समाजघटक त्यांच्यापासून दूर गेले हे वास्तवदेखील आहे. मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून तीच कट्टर प्रतिमा बदलायची आणि आतापर्यंत शिवसेनेच्या वाटेला न जाणाऱ्या मतदारांना जोडायचे अशी ठाकरे यांची रणनीती दिसते. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि माता-भगिनींनो” या वाक्याची जागा आता सरकारी कार्यक्रमांमध्ये साहजिकच, “जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो आणि माता-भगिनींनो” या वाक्याने घेतली आहे. शिवसेनेच्या व्यासपीठावर हिंदुत्व आणि इतर व्यासपीठांवर सर्वसमावेशकता असे संतुलन साधत स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा आणि शिवसेनेला व्यापक करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.
मुख्यमंत्री झाले म्हणून शिवसेना पक्षप्रमुख पदाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले हे तितके खरे नाही. उलट आपल्या मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेला कसा फायदा करून घेता येईल, पक्षाबाबत लोकांच्या मनातील भीती, परकेपणाची भावना कशी घालवता येईल याचे प्रयत्न करताना ते दिसतात. त्यासाठी हुकमी एक्का आहे ती त्यांची सोज्वळ प्रतिमा. कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेतून शिवसेनेने गतकाळात केलेल्या चुका, त्यातून दुखावलेली लोकांची मने हे विसरायला लावू शकेल अशी सर्वांना घेऊन चालणारी समंजस भूमिका ठाकरे घेऊ पाहत आहेत. आपला परंपरागत मतदार सोबतच राहील; परंतु आजवर आपल्याला न मानणारा मतदार आपल्या प्रतिमेच्या तसेच सरकारच्या माध्यमातून जोडावा हे ठाकरे यांचे लक्ष्य दिसते. सत्तेमुळे ठाकरे यांचे शिवसेनेकडे दुर्लक्ष झाले आहे या गैरसमजात राहून “आता पूर्वीची शिवसेना राहिली नाही” असे तर्कशास्त्र कोणी मांडत असेल तर ते स्वतःची फसवणूक करून घेत आहेत.
पूर्वीच्या आडदांड शिवसेनेला असलेल्या मर्यादा कशा दूर करता येतील आणि ‘सगळ्यांचे’ कसे होता येईल हे सध्याचे उद्दिष्ट दिसते. मुख्यमंत्री ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांचे हात मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून बळकट करत आहेत.
केवळ भाजपसाठीच नाही, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठीदेखील ही धोक्याची घंटा आहे. अर्थात हिंदुत्वाच्या बाहेर पक्ष नेण्याचा प्रयत्न कट्टर शिवसैनिकांच्या किती पचनी पडतो हा प्रश्न आहेच. शिवसेना सर्वव्यापी करण्याच्या ठाकरे यांच्या प्रयत्नात अदानींच्या बोर्डची मोडतोड करणे कुठे बसते, हे मात्र समजले नाही.
प्रतिमांच्या लढाईचे राजकारण
काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत गेल्याने त्यातील काहींची मने आधीच खट्टू झाली आहेत. भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा ठाकरेंना हेडऑन घेऊ शकेल असा दमदार नेता आहे. मुख्यमंत्री शिवसेनेची प्रतिमा बदलत आहेत हे चाणाक्ष फडणवीस यांनी नक्कीच ओळखले असणार. त्यामुळेच आक्रस्ताळेपणाऐवजी व्यवस्थित रणनीती आखून सरकार व ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्याचे तंत्र त्यांनी अवलंबिले आहे. यापुढे पक्षांबरोबरच नेत्यांच्या प्रतिमांची लढाई असेल. त्यात राज ठाकरे, अजित पवार यांनाही जागा शोधावी लागेल. काँग्रेसकडे तसे नेतृत्व दिसत नाही किंवा जे आहेत त्यांच्यात कोण्या एकाला प्रोजेक्ट करण्यासंदर्भात अजिबात एकमत नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसे प्रयत्न करीत आहेत; पण बाकीचे त्यांचे पाय ओढत आहेत. पक्षातील प्रस्थापितांशी त्यांचा सामना आहे. सध्याच्या शीर्षस्थ नेतृत्वाला उद्या काही कारणांनी मर्यादा आल्या तर वारसदार कोण, याची निश्चिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली नाही. हा पक्ष आजही शरद पवार यांच्या करिष्म्यावरच चालत आहे.
ओबीसींच्या जाती सापडल्या
ओबीसींचा ईम्पिरिकल डाटा तयार तर करायचा आहे; पण ओबीसींच्या जाती किती, याचीच माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडे नव्हती. बहुजन कल्याण विभागानेदेखील त्याबाबत हात वर केले होते. ‘लोकमत’ने बातमीचा दणका दिला.
आता ओबीसींच्या जाती किती याची माहिती गोळा करण्याचे काम बहुजन कल्याण विभागाने वेगाने हाती घेतले आहे. मार्च २०२१ मध्ये आनंद निरगुडे हे आयोगाचे नवे अध्यक्ष नेमले गेले. खूप बोंबाबोंब झाल्यानंतर ४ जून रोजी सदस्य निवडण्यात आले. तेव्हापासून आता महिना झाला तरी आयोगाला चांगले कार्यालय, व्यवस्थित स्टाफ मिळालेला नाही. ओबीसींबाबत ‘संथ वाहते कृष्णामाई’ हेच सुरू आहे.