इंडियाने महाराष्ट्राला काय दिले? महायुतीच्या बैठकीत रुसवे-फुगवे!
By अतुल कुलकर्णी | Published: September 3, 2023 06:43 AM2023-09-03T06:43:43+5:302023-09-03T06:43:54+5:30
बैठकीत जेव्हा नावांची यादी मागितली गेली तेव्हा टाईप करून तयार ठेवलेली यादी आत पाठवली गेली, अशी ‘अंदर की बात’ त्या नेत्याने उघड केली.
संपलेल्या आठवड्यात देशभरातील २८ पक्षाचे नेते मुंबईत आले. इंडियाची बैठक पार पडली. बैठक विस्कळीत दिसली तरी पडद्याआड नियोजनबद्ध काम चालू असल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या दिवशी सगळे नेते काही वेळ भेटले. दुसऱ्या दिवशी फोटोसेशन आणि पुन्हा काही काळ बैठक झाली. एवढ्या कमी कालावधीत आम्ही समन्वय समितीची नावे ठरवू असे तुम्हाला वाटते का..? असे सांगून एक ज्येष्ठ नेते म्हणाले, काल जाहीर केलेली समन्वय समिती आधीच ठरली होती. ती मुंबई जाहीर करायचे असेही ठरले होते. त्याप्रमाणे ती जाहीर झाली. समन्वय समितीच्या नावांची यादी टाईप करून ठेवलेली होती. त्यातील एक नाव फक्त एम. के. स्टालीन यांच्या विनंतीवरून बदलले गेले.
बैठकीत जेव्हा नावांची यादी मागितली गेली तेव्हा टाईप करून तयार ठेवलेली यादी आत पाठवली गेली, अशी ‘अंदर की बात’ त्या नेत्याने उघड केली. इंडियाच्या प्रमुख नेत्यांनी सगळ्या कामांसाठी एजन्सीही नेमली आहे. लॉजिस्टिक, स्ट्रॅटेजी, पैसा यावर चर्चा आणि नियोजन सुरू झाले आहे. मनापासून इंडियामध्ये कोण आहे, दाखवण्यापुरते कोण आहे, यांचीही नावे आम्हाला माहिती आहेत. आम्ही ठरवलेली प्रोफेशनल टीम पडद्याआड काम करत आहे. ती वेगवेगळ्या नेत्यांना जाऊन भेटते. ब्रीफिंग देते. निरोप एकमेकांना व्यवस्थित दिले जातात. अशा बैठकांमुळे वातावरण निर्मिती होते एवढेच... असेही त्या नेत्याने सांगितले.
इंडियाच्या पक्षांमध्ये कुरबुरी आहेत, असे वातावरण तयार केले जात आहे. पण इंडियाच्या नेत्यांनी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. जागा वाटपापर्यंत त्यांची चर्चा पुढे गेली आहे. आत्ताच सगळ्या गोष्टी माध्यमांमध्ये येऊ लागल्या, तर वाद सुरू केले जातील, म्हणून त्या सांगितल्या जात नाहीत. उद्या निवडणुका जाहीर झाल्या तरी सामोरे जाण्याची तयारी झाल्याचेही काही नेत्यांचे म्हणणे आहे. डिसेंबरमध्ये निवडणुका जाहीर होतील, म्हणून देशातली सगळी खासगी विमाने, हेलिकॉप्टर यांचे बुकिंग भाजपने केल्याची माहिती असल्याचे उद्धव ठाकरे एका भाषणात म्हणाले. याचाच अर्थ पडद्यामागे बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. महाराष्ट्रात इंडियाची मीटिंग झाल्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणखी जवळ आली. त्यांच्यात संवाद, समन्वय लक्षात येण्याइतपत वाढला आहे.
अकरा वर्षानंतर राहुल गांधी टिळक भवनमध्ये गेले. आमच्यात मतभेद आहेत. आम्ही ते उघडपणे बोलून दाखवतो, हीच आमची सगळ्यात मोठी ताकद आहे, आणि हेच आमच्या अपयशाचेही कारण आहे, असे विधान त्यांनी केले. महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेना जवळ येण्याच्या पार्श्वभूमीवर हे एकच विधान पुरेसे बोलके आहे. इंडियाच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फाटाफुटीचा फायदा जितेंद्र आव्हाड यांना झाला. इंडियाच्या पानभर जाहिरातीत जितेंद्र आव्हाड पहिल्या फळीत आल्याचे चित्र राज्यभर गेले, अन्यथा छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल या नेत्यांच्या यादीत आव्हाडांचा नंबर कधी लागला असता..?
आता नाही तर कधीच नाही, ही जाणीव इंडियामधील २८ पक्षांच्या नेत्यांना झालेली आहे. अनेक नेत्यांचे वय विचारात घेता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर पुढची निवडणूक होईल तेव्हा यातील किती नेते त्या निवडणुकीला सामोरे जातील हा प्रश्न आहे. त्यामुळेच प्रत्येकासाठी ही निवडणूक म्हणजे जीवन- मरणाची लढाई झाली आहे. याच कालावधीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादांचा राष्ट्रवादी यांनी स्टेजवर उभे राहून हातात हात घालत फोटो काढून घेतले. समोर बसलेले कार्यकर्ते मात्र तीन गटांत वेगवेगळे बसल्याचे चित्र होते. झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपला फेविकॉल का जोड... असे म्हणत महायुतीची बैठक मुंबईत पार पडली. याचा अर्थ तीन गटांत पडद्याआड वाजले आहे. म्हणूनच झाले गेले गंगेला मिळाले... अशी भाषा केली गेली.
अजित पवार यांनी घेतलेले काही निर्णय बदलावे लागले. शिंदे आणि अजित पवार गट यांच्यात होणारी वादावादी भाजपच्या फायद्याची ठरू शकते, हे नवे चित्रही पुढे आले आहे. अजितदादांचा गट, राष्ट्रवादी पक्ष कोणीही सोबत नसताना भाजप शिवसेना युतीने ४३ जागा जिंकल्या होत्या, याची आठवण गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या बैठकीत अजित पवारांना करून दिली. याचा अर्थच, सोबत तर आलो; पण अजून संसार सुरू झालेला नाही असाच आहे. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत नव्हते. अजित पवार तुम आगे बढो... या घोषणेला भाजप आणि शिंदे गटामधून प्रतिसाद येत नव्हता. तरी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली. संपलेला आठवडा राज्याचे राजकारण पुढे नेणारा ठरला.