कर्नाटक निकालाचा  लोकसभेवर काय परिणाम? सर्वांनाच ‘रिथिंकिंग’ करावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 11:16 AM2023-05-14T11:16:56+5:302023-05-14T11:17:34+5:30

लोकसभा निवडणूक दहा महिन्यांवर आली असताना, विविध राज्यांतील निकालांमुळे सर्वांनाच ‘रिथिंकिंग’ करावे लागेल.

What is the effect of Karnataka result on Lok Sabha election Everyone will have to do 'rethinking' | कर्नाटक निकालाचा  लोकसभेवर काय परिणाम? सर्वांनाच ‘रिथिंकिंग’ करावे लागणार

कर्नाटक निकालाचा  लोकसभेवर काय परिणाम? सर्वांनाच ‘रिथिंकिंग’ करावे लागणार

googlenewsNext

सुनील चावके, सहयोगी संपादक, दिल्ली -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयांची ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदवून सत्तेत परतण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या भाजपची झोप कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवाने उडविली आहे. या पराभवानंतर भाजपची केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेत परतण्याचा मार्ग आणखीच बिकट झाला आहे.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहारपाठोपाठ कर्नाटक या लोकसभेच्या १५८ जागा असलेल्या चार राज्यांमध्ये वर्चस्व शाबूत राखून सत्तेत परतण्याचे अवघड आव्हान पंतप्रधान मोदी यांच्या भाजपपुढे असेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने  महाराष्ट्रात शिवसेना, तर बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टीशी युती करून या १५८ जागांपैकी १२५ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपचा वाटा ८३ जागांचा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने कर्नाटकात २६, महाराष्ट्रात २३, पश्चिम बंगालमध्ये १८ तर बिहारमध्ये १७ जागा जिंकल्या आहेत. पण या चार राज्यांमध्ये २०२४ चे चित्र एवढे गुलाबी नसेल. बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष जनता दल युनायटेडने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी युती केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने दुहेरी आकडा गाठू नये म्हणून ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे, तर महाराष्ट्रात भाजपची अवस्था सैरभैर झाल्याचे चित्र आहे.  लोकसभा निवडणूक दहा महिन्यांवर आली असताना या चार राज्यांनी भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढविली आहे. 

काँग्रेसने २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत १२५ जागा जिंकून सत्ता संपादन केल्यानंतर  २०१४ साली भाजपने लोकसभेच्या १७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस लोकसभेच्या ९ जागांवर विजयी झाली होती; पण २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत १०४ जागा जिंकून सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २५ जागा जिंकून प्रत्येकी एक जागा जिंकू शकलेल्या काँग्रेस आणि जद सेक्युलरचा धुव्वा उडविला होता. मात्र, आज विधानसभा निवडणुकीत दहा वर्षांनंतर निर्विवाद बहुमत मिळविताना काँग्रेसने तब्बल १५ लोकसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य प्रस्थापित करताना भाजपच्या गणिताला धक्का दिला आहे.  

कर्नाटक विधानसभेच्या ताज्या संख्याबळानुसार भाजपचा लोकसभेचा आकडा २५ वरून ८ वर घसरला आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास भाजपला कर्नाटकात २०१९ साली जिंकलेल्या २५ जागा शाबूत राखणे अतिशय जिकिरीचे ठरणार आहे. कर्नाटकात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ५१ टक्के मते मिळवत १६० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. पण २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची पार घसरगुंडी झाली आहे. भाजपची मते २०१९ च्या तुलनेत तब्बल १५ टक्क्यांनी घसरली असून, ५१ टक्क्यांवरून ३५.७४ टक्क्यांवर आली आहेत. कर्नाटकात विधानसभेतील पराभवाने भाजपच्या लोकसभेच्याही चिंता वाढविल्या आहेत.

Web Title: What is the effect of Karnataka result on Lok Sabha election Everyone will have to do 'rethinking'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.