काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत?
By विजय दर्डा | Published: March 4, 2024 08:16 AM2024-03-04T08:16:07+5:302024-03-04T08:16:47+5:30
काँग्रेस पक्षात पळापळ का सुरू झाली आहे, असा प्रश्न लोक भले विचारत असतील; परंतु काँग्रेसने तर शहामृगासारखी वाळूत मान खुपसलेली आहे.
डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -
लोक मला विचारतात, आपण कधी जाणार आहात? अजून गेला नाहीत? - मी फक्त हसतो आणि म्हणतो, गेल्या ७-८ वर्षांपासून मी हे ऐकत आलो आहे. आजपर्यंत जिथे होतो तिथेच आहे. पुढचे देवाला ठाऊक. लोक पुन्हा उलटा प्रश्न विचारतात की बाकीचे लोक का जात आहेत? हा प्रश्न मात्र खरंच गंभीर आहे. यावर विचार करणे काळाची गरज आहे; परंतु ज्यांनी असा विचार केला पाहिजे, ते तो करत आहेत काय? - कदाचित नाही. कारण पूर्वी ज्याप्रमाणे राजा, महाराजा जे बोलायचे तोच कायदा व्हायचा, तशी काहीशी परिस्थिती आहे. प्रश्न करण्याचा तर काही प्रश्नच राहिलेला नाही.
काहीतरी सांगायचे म्हणून असेही सांगितले जात आहे की, पुष्कळ लोक भीतीपोटी तिकडे जात आहेत. घाबरून किती लोक तिकडे गेले मला माहीत नाही; पण घर सोडून जाण्याची दोन कारणे असू शकतात असे मला वाटते. एक म्हणजे ते जेथे आहेत तेथे काही भविष्य उरलेले नाही असे त्यांना वाटते. आपण ज्या कारणाने राजकारणामध्ये आलो ती आशा-आकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आम्ही जात आहोत, असेही त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांच्यासारखा मोठा माणूस काँग्रेस पक्ष सोडून गेला ही किती गंभीर गोष्ट आहे! प्रफुल्ल पटेलही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले.
ज्या कामासाठी हे लोक राजकारणामध्ये आले ते पूर्ण होण्याची कुठलीच आशा न उरणे हे दुसरे कारण असू शकते. सगळेच लोक राजकारणात पैसा कमावण्यासाठी येत नाहीत. काही लोकांनी आपल्या उद्योगांनी राजकारण बदनाम केले. एरवी आपल्या राज्याचा, विभागाचा विकास व्हावा ही इच्छा घेऊन लोक राजकीय क्षेत्रात येतात. आपण विकसित भारताचा हिस्सा होऊ असे त्यांना वाटते. राजकारणात काम केल्यानेच नाव होते. शेवटी विकास तर करावाच लागेल. लोकांचे प्रश्न सोडवावे लागतील. जर या बाबतीत काही शंका निर्माण होत असतील तर कोणी माणूस पक्षात किती काळ राहील? कमीतकमी आपले म्हणणे ऐकून घेणारा तर कोणी असला पाहिजे! या परिस्थितीवर विचार करणारा तर कुणी हवा; परंतु इथे तर पक्षाच्या शीर्षनेतृत्वाला पक्ष सोडून जाणाऱ्यांची काही फिकीरच नाही! गुलाम नबी आझाद का गेले? पूर्वोत्तर भारतात काँग्रेसची मोठी ताकद असलेले हिमंत बिस्वा सरमा का गेले? आर. पी. एन. सिंह किंवा कृपाशंकर सिंह का गेले? आनंद शर्मा, मणिशंकर अय्यर, सचिन पायलट यांच्यासारखे लोक अडगळीत पडले आहेत. सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांना फोन केल्याने ते थांबले आणि त्यांच्या भूतकाळाबद्दल भाजपतूनही विरोध होता.
ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस सोडून का गेले? जितीन प्रसाद किंवा मिलिंद देवरा यांनी पक्षाचा निरोप का घेतला हे समजून घेण्याचा प्रयत्न कोणी केला आहे? हे सगळे जण तर राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटमधले लोक होते. समवयस्क होते. इथे तर पुढच्या दहा वर्षांत काही होण्याची शक्यताच नाही असे त्यांना वाटले असणार आणि १० वर्षांनी तर आपण म्हातारे होऊ. काल तरुण होते, आज आहेत आणि उद्याही असतील असे भाग्यवान लोक किती असणार? आता तर सोनिया गांधी यांनी सगळी जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर टाकली आहे. राहुल गांधी खूप कष्ट घेत आहेत. त्यांनी पक्षाच्या नेत्यांवर जबाबदारी टाकली आहे; पण ते नेते काय करत आहेत? राहुल गांधी यांच्या यात्रेत काही ठिकाणी विजय झाला तर त्याचे श्रेय मिळाले; पण वास्तव तर हे आहे की जिथे विजय हाती लागला तेथे स्थानिक नेत्यांचा प्रभाव उपयोगी पडला. तेलंगणामध्ये ए. रेवंत रेड्डी यांनी एका कोट्यधीश मुख्यमंत्र्याला हरवले, ती तर त्यांची ताकद होती. एरवीही काँग्रेस पक्षात भांडणे लावा आणि मजा पाहा असाच प्रकार चालला होता. गोवा आणि मध्य प्रदेशात तर जिंकूनसुद्धा पराभूत झाले ना! सरकारही घालवले.
चला, उशिरा का होईना, काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक झाली. मल्लिकार्जुन खरगे चांगले व्यक्ती आहेत; परंतु वयामुळे क्षमतेवर मर्यादा पडतातच. लोकांना आकर्षित करणे तसेच ऊर्जावान राहण्यासाठी पक्षात नवी हवा येणे गरजेचे असते. पुढच्या पिढीकडे सूत्रे सोपवावी लागतील. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेस पक्षात या विषयावर कुठे चर्चा होताना दिसली? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी कसा व्यवहार केला गेला? हरयाणात हुड्डा यांना कसे वागवले जात आहे? तामिळनाडू तर हातातून गेलेच आहे. कर्नाटकात भाजप घुसला आहे. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची जन्मभूमी असलेल्या गुजरातपासून ओडिशापर्यंत काँग्रेस उद्ध्वस्त झालेली आहे आणि होय, वास्तव हेही आहे की लोक भाजपला भुललेले नाहीत तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विकास कार्यक्रमामुळे प्रभावित होऊन त्यांच्या बरोबर जाताहेत; परंतु काँग्रेसला तसे वाटत नाही. विचारांचा मुद्दा बाजूलाच ठेवा. कारण विचार आता फक्त देखाव्यासाठी राहिलेत. काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा आणि सुप्रिया श्रीनेत यांच्यासारख्या नेत्यांनी पुढाकार घेतलेला दिसतो तेव्हा आशेचे किरण समोर येतात; परंतु त्यांना संसदेत पोहोचण्याची संधी तर मिळाली पाहिजे! इथे तर पाय ओढण्याची स्पर्धा लागली आहे.
सर्व बाजूंनी काँग्रेसचा विचार मजबूत करण्याबरोबरच भक्कम बचाव करणारा अभिषेक मनू सिंघवी यांच्यासारखा विद्वान राज्यसभेची निवडणूक हरतो यापेक्षा जास्त गंभीर गोष्ट काय असू शकते? काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन कसे काम करत आहे हेच यातून दिसते. नितीशकुमार आज भाजपबरोबर आहेत. यात काँग्रेसचा काहीच दोष नाही? आता इंडिया आघाडी कुठे आहे? आपण म्हणत राहा, ‘आय लव्ह माय इंडिया’ आणि ते तुम्हाला चारीमुंड्या चीत करत राहतील. आजचे वास्तव हेच आहे!