अमोल कोल्हेंच्या प्रकृतीत सुधारणा; नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाला होता अपघात, म्हणाले, "दोन पावलं मागे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 11:34 AM2023-05-04T11:34:16+5:302023-05-04T11:41:28+5:30
राज्यभर 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाचे प्रयोग दणक्यात सुरु आहेत.
राज्यभर 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाचे प्रयोग दणक्यात सुरु आहेत. खासदार आणि डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे मुख्य भूमिकेत आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रयोगावेळी अमोल कोल्हेंचा अपघात झाला. त्यांना गंभीर दुखापत झाली होती. नुकताच त्यांनी रुग्णालयातील फोटो शेअर करत प्रकृतीबाबत अपडेट दिली.
गेल्या रविवारी 'शिवपुत्र संभाजी' नाटकाचा प्रयोग कराड शहरातील कल्याणी मैदानावर सुरु होता. यावेळी त्यांचा घोड्यावरुन एंट्री करतानाचा सीन सुरु होता. एंट्री होत असतानाच घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला आणि अमोल कोल्हेंना झटका बसला. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले,"काळजी करु नका! पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती...परंतू दुखापत फार गंभीर नाही.
लवकरच भेटू "11 मे ते 16 मे" हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे *"शिवपुत्र संभाजी"* महानाट्य!!! धन्यवाद.
अमोल कोल्हेंचा अपघात झाल्याचं कळताच चाहते आणि त्यांचे हितचिंतक चिंतेत होते. मात्र कोल्हे यांनी स्वत:च काळजी करण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. तसंच आपल्या पुढच्या प्रयोगाविषयीही माहिती दिली आहे.