बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 09:58 PM2024-10-06T21:58:08+5:302024-10-06T21:58:36+5:30
बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरजने ट्रॉफी जिंकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांनी पोस्ट शेअर केली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास होतं. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना सरप्राइजेस मिळाले. आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरजने ट्रॉफी जिंकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांनी पोस्ट शेअर केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचा सूरज ट्रॉफी जिंकल्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
सुनेत्रा पवार यांची सूरजसाठी पोस्ट
बारामतीचा सूरजने बिग बॉस जिंकले ..!
आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या सुपुत्राने बिग बॉस शोचे विजेतेपद पटकावले. त्याच्या आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे पडतायत.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला सूरज स्वत:च्या कलागुणांच्या बळावर आज जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत प्रसिद्ध पावला आहे. समस्त मराठी मनांचा लाडका झाला आहे.
सूरजने पहिल्या दिवसापासून बिग बॉस शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हाच खात्री पटली होती, की हे लेकरू बाजी मारणार. ती खात्री आज प्रत्यक्षात साकारली आहे.
सूरजला पाठिंबा देण्यासाठी आवाहन केले होते त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही दिवसांपूर्वी त्याच्या मोढवे गावी जाऊन तो विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचे सार्थक झाले. या उत्तुंग यशाबद्दल सूरजचे खूप खूप अभिनंदन.
बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलेल्या सूरजला 'बिग बॉस मराठी ५'चा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला १४.६० लाख रुपये मिळाले आहेत. तर इलेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळाली आहे.