Amethi Election Result : 'आम्ही तुमच्यासोबत आहोत...', अमेठीतील पराभवानंतर स्मृती इराणींना बॉलिवूडनं दिली साथ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 02:34 PM2024-06-05T14:34:55+5:302024-06-05T14:35:10+5:30
अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा पराभव केला आहे. इराणी यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. २०१९ मध्ये राहुल गांधींना पराभूत करणाऱ्या स्मृतींना दुसऱ्यांदा अमेठीच्या जनतेने संधी दिली नाही. स्मतृी इराणी यांच्या पराभवानंतरही बॉलिवूड कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
स्मृती इराणींनी पराभवानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहलं, हेच तर आयुष्य आहे. मी परिसरातील प्रत्येक गावात जाऊन काम केलं आहे. मी माझ्या आयुष्यातील १० वर्षे या भागासाठी दिली. परिसरातील लोकांचं आयुष्य सुधारवण्यात, प्रेरणा देण्यात, एक आशा निर्माण करण्यात, रस्ते, नाली, मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी मी काम केलं. विजय आणि पराभवात जे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांची मी सदैव ऋणी आहे. आज जे सेलिब्रेशन करत आहेत, त्यांचे अभिनंदन आणि How's the josh? विचारणाऱ्यांना मी म्हणते- it’s still high, Sir', असं स्मृती इराणींनी पोस्टमध्ये लिहिलंय.
स्मृती इराणी यांच्या पोस्टवर बॉलिवूड कलाकारांनी कमेंट करत स्मतृी यांचं मनोबळ वाढवलं. अभिनेत्री मौनी रॉयने स्मृती यांच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, 'आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत'. दुसरीकडे अभिनेता सोनू सूदने हार्ट इमोजी पोस्ट केली. यासोबतच याशिवाय टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीनेही लिहिलं, 'मेहनत नेहमीच फळ देते, मॅडम, काळजी करू नका, आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत'.
२०१९ मध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या स्मृती इराणींना आपला गढ राखता आला नाही. १० वर्षांपूर्वी २०१४ मध्ये त्या या मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या, त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना इथे विजय मिळवता आला. पण आता मात्र अमेठी मतदारसंघातील जनतेने त्यांना नाकारलं आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते किशोरी लाल शर्मा विजयी झाले आहेत. किशोरी लाल शर्मा यांनी मतमोजणी चालू झाल्यापासूनच आघाडी घेतली होती, ती आघाडी त्यांनी कायम ठेवली.