नक्षलवादाची रक्तरंजित कहाणी! अदा शर्माचा पॉवरपॅक ॲक्शन परफॉर्मन्स; 'बस्तर' ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:49 IST2024-03-05T13:46:41+5:302024-03-05T13:49:09+5:30
'द केरळ स्टोरी'नंतर अदा शर्माच्या आगामी 'बस्तर'चा ज्वलंत ट्रेलर भेटीला आलाय

नक्षलवादाची रक्तरंजित कहाणी! अदा शर्माचा पॉवरपॅक ॲक्शन परफॉर्मन्स; 'बस्तर' ट्रेलर रिलीज
२०२३ ला आलेल्या 'द केरळ स्टोरी' सिनेमाने प्रेक्षक - समीक्षकांची वाहवा मिळवली. एका गंभीर मुद्द्याला सिनेमातून हात घालण्यात आला. आता याच सिनेमाची टिम म्हणजेच विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा यांचा आगामी चित्रपट 'बस्तर: द नक्सल स्टोरी'साठी सर्वांना उत्सुकता आहे. 'बस्तर: द नक्सल स्टोरी' सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. प्रेक्षकांच्या अपेक्षा एका नव्या उंचीवर घेऊन निर्मात्यांनी 'बस्तर: द नक्सल स्टोरी'चा ट्रेलर रिलीज केला आहे.
ट्रेलरमध्ये नक्षलवाद्यांकडून सीआरपीएफ जवानांना मारले जात असल्याची हृदयद्रावक झलक ट्रेलरमध्ये दिसते. पुढे जेएनयू मतदारसंघात देशाच्या सैनिकांच्या मृत्यूचा आनंद कसा साजरा केला जातो हे देखील ट्रेलरमध्ये दाखवले आहे. राष्ट्रगीत गाताना माणसांच्या कत्तली झालेल्या दृश्यांपासून ते लहान मुलांना जाळण्यापर्यंत, राजकीय व्यक्तींचे गोळीबार आणि निरपराधांना फासावर लटकवण्यापर्यंतच्या अनेक थरारक घटना ट्रेलरमध्ये दिसतात.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'बस्तर' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अदा शर्माचा दमदार अभिनय पाहायला मिळतो. 'बस्तर'चा ट्रेलर देशात घडत असलेल्या अज्ञात घटनांचा उलगडा करतो. ट्रेलर अनेकांना रक्तरंजित वाटू शकेल. 'बस्तर: द नक्सल स्टोरी' सिनेमा १५ मार्च २०२४ ला चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये मराठमोळे अभिनेते किशोर कदम यांचीही झलक पाहायला मिळतेय.