बॉलिवूडमध्ये निवडणूकीचे वारे !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:42 PM2019-04-12T15:42:36+5:302019-04-12T15:48:30+5:30

अगोदर राजकारणाशी बॉलिवूडचा संबंध क्वचितच ऐकायला मिळायचा, आता मात्र तारकांचा राजकारणात प्रवेश तसेच विद्यमान सरकारला तारकांचा पाठिंबा किंवा विरोध यामुळे जणू अख्खे बॉलिवूड राजकारणमय झाले की काय असे वाटू लागले आहे. एकंदरीत बॉलिवूड आणि राजकारण हे काय समीकरण आहे, यावर केलेले हे भाष्य...

Elections fever in Bollywood ! | बॉलिवूडमध्ये निवडणूकीचे वारे !

बॉलिवूडमध्ये निवडणूकीचे वारे !

googlenewsNext

-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप तसेच तारकांचा राजकारणात प्रवेश हे समीकरण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. बऱ्याचदा राजकारणी बॉलिवूड तारकांचा प्रचारासाठी प्रसंगी थेट निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असतात. दुसरीकडे बॉलिवूडमधील कारकिर्दीचा सुगीचा काळ संपल्यानंतर पुढील पर्याय म्हणून बरेच कलाकार राजकारणाचाही विचार करत असल्याचे अगदी सुरुवातीपासून दिसून आले आहे. मात्र अगोदर राजकारणाशी बॉलिवूडचा संबंध क्वचितच ऐकायला मिळायचा, आता मात्र तारकांचा राजकारणात प्रवेश तसेच विद्यमान सरकारला तारकांचा पाठिंबा किंवा विरोध यामुळे जणू अख्खे बॉलिवूड राजकारणमय झाले की काय असे वाटू लागले आहे. एकंदरीत बॉलिवूड आणि राजकारण हे काय समीकरण आहे, यावर केलेले हे भाष्य...

* तारे-तारकांसाठी राजकारण ठरतोय करिअरचा पर्याय
अगदी सुरुवातीपासून आपण अनेक तारकांना राजकारणात प्रवेश करताना पाहिले आहे. यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे जे दिग्गज स्टार्सचा राजकीय फायदा करुन घेणे, जेणेकरुन संबंधीत पार्टी जास्तीत जास्त मतांनी विजयी होईल आणि दुसरे कारण म्हणजे जर सिनेक्षेत्रात करिअरला उतरती कळा लागली तर राजकारणात नशिब आजमायचे. अर्थात राजकारणाला करिअरचे दुसरे ऑप्शन म्हणून पाहायचे. अलिकडेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे त्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

* दिग्गज कलाकारांना राजकीय आखाड्यात उतरवण्याचा आग्रह
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मुद्दयांवर भूमिका घेत नसल्याचा ठपका नेहमीच बॉलिवूडमधील कलाकारांवर ठेवला जातो. मात्र, निवडणुका जवळ आल्या की त्यांचे महत्व वाढलेले दिसते. प्रचारासाठी किंवा थेट निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी राजकीय पक्ष त्यांच्यापर्यंत पोहचतात. त्यांना संबंधीत राजकीय पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आग्रह केला जातो. बऱ्याचदा पक्षाचे तिकिट देऊन निवडणूकीच्या आख्याड्यातही उतरवले जाते. यानुसार काही स्टार्स हे मान्यही करतात, मात्र सर्वांनाच याठिकाणी यश मिळतेच असे नाही.

* काही स्टार्स यशस्वी तर काही अपयशी
राजकारणात सर्वांत यशस्वी ठरलेले कलाकार म्हणून दिवंगत सुनील दत्त आणि विनोद खन्ना यांच्याकडे पाहिले जाते. जयाप्रदा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या राजकीय कारकिर्दीकडेही यशस्वी म्हणूनच पाहावे लागेल. अमिताभ बच्चन यांनी राजकारणातून लवकर काढता पाय घेतला असला तरी त्यांच्या पत्नी जया बच्चन राजकीय पटलावर चांगला जम बसवून आहेत. राज बब्बर आणि हेमा मालिनी यांची राजकीय कारकिर्दही स्थिर मानावी लागेल. मात्र गोविंदा यांसारखे बडे कलाकारही लवकरच राजकारणातून गाशा गुंडाळत असल्याचेही आढळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक अशी ओळख निर्माण करणारे परेश रावल मागील निवडणुकीत विजयी झाले. मात्र, आताच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे. प्रकाश झा, महेश मांजरेकर हे आघाडीचे दिग्दर्शक मात्र राजकारणात यशस्वी होऊ शकले नाहीत.

* ६०० कलाकारांचा विरोध
देशभर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती निवडणुकांचीच. मत कुणाला द्यायचं, कुठलं सरकार यायला हवं यावरुन मतभेद पाहायला मिळताहेत. देशभरातले सगळे कलाकार यावर व्यक्त होताना दिसताहेत. काही दिवसांपूर्वी सहाशे कलाकारांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यात ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह, अमोल पालेकर, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक-शाह या कलाकारांबरोबर सहाशे कलाकारांनी सध्याच्या सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन लोकांना केलंय. 'धर्माभिमान, द्वेष आणि उदासीनता या साऱ्या गोष्टींना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी मतदान करायला हवं. भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्या विरोधात मतदान करावं' असं या सहाशे कलाकारांनी म्हटलं होतं.

* ९०० कलाकारांचा पाठिंबा
मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्याआधीच मात्र जवळपास नऊशे कलाकारांनी विद्यमान सरकारला पाठिंबा देण्याचं आवाहन जनतेला केलंय. यात विवेक ओबेरॉय, रिटा गांगुली, पंडित जसराज, शंकर महादेवन या कलाकारांची नावं आहेत. या नऊशे कलाकारांनी भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 'देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकारची गरज आहे. लोकांनी कोणत्याही प्रकारे पक्षपात न करता मतदान करायला हवं. दहशतवादाचं आव्हान समोर असताना एका भक्कम सरकारची देशाला गरज असेल. त्यामुळे आम्हाला वाटते की आताचं सरकारच पुढे निवडून यायला हवं', असं म्हणणं या कलाकारांनी मांडलं आहे. यात पल्लवी जोशी, विजय पाटकर, कोएना मित्रा, अनुराधा पौडवाल या कलाकारांचीही नावं आहेत.

* सोशल मीडियावर आवाहन
इंडस्ट्रीतले अनेक कलाकार आपापल्या पद्धतीनं सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसताहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे, कल्की कोएचलिन, स्वरा भास्कर, तिग्मांशू धुलिया, सयानी गुप्ता यांसारखी नावं मतदानाबाबत लोकांशी थेट बोलताना दिसताहेत. स्वरा भास्कर पहिल्यांदाच राजकीय प्रचाराच्या मैदानात उतरली. आपल्या अनोख्या अंदाजात तिनं जनतेसमोर भाषणही दिलं. त्यामुळे अनेक कलाकारही सोशल मीडियावरून राजकारणाच्या मैदानात उतरत लोकांना मतदान करण्याचं आवाहन करताना दिसताहेत.

 

Web Title: Elections fever in Bollywood !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.