सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयानेही केली प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 07:06 AM2021-01-08T07:06:55+5:302021-01-08T07:07:13+5:30
प्रियांका व मीतू यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, टेलिमेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डॉक्टर रुग्णांशी ऑनलाईन चर्चा करून औषध देऊ शकतात. कोरोनामुळे सुशांत स्वतः डॉक्टरांना भेटू शकला नाही. तसेच त्याने ते औषध घेतले, याचे काही पुरावे नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात केलेल्या अभिनयाची खुद्द उच्च न्यायालयानेही प्रशंसा केली. तो एक चांगली व्यक्ती होती, हे त्याच्या चेहऱ्यावरून कोणीही सांगू शकेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
७ सप्टेंबर रोजी रियाने सुशांतच्या बहिणी प्रियांका व मीतू यां गुन्हा रद्द करण्यासाठी या दोघींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील निर्णय न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने गुरुवारी राखून ठेवला.
प्रियांका व मीतू यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, टेलिमेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डॉक्टर रुग्णांशी ऑनलाईन चर्चा करून औषध देऊ शकतात. कोरोनामुळे सुशांत स्वतः डॉक्टरांना भेटू शकला नाही. तसेच त्याने ते औषध घेतले, याचे काही पुरावे नाहीत.
त्यावर मुंबई पोलिसांच्यावतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. राजपूत आणि त्याची बहीण प्रियांका यांच्यात व्हाॅट्सॲपद्वारे झालेल्या चॅटमधून निदर्शनास आले आहे की, तिने राजपूत आणि डॉक्टर यांच्यात कन्सल्टेशन न होताच औषधांचे प्रिस्क्रिप्शन दिले. ८ जून २०२० रोजी एक अनोळखी व्यक्ती राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेली. टोकन घेतल्यानंतर त्या आरोपीने डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन घेतले. पोलिसांकडे पुरावे आहेत, असे कामत यांनी सांगितले.
रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याचिका फेटाळण्याची विनंती केली. ड्रग्सचे कॉकटेल आणि औषधे यामुळे सुशांतचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. राजपूत ८ जूनपूर्वी १४ महिने रियाच्या देखरेखीखाली होता. राजपूत त्याची औषधे ड्रग्सबरोबर घेणार नाही, याची काळजी रियाने घेतली. राजपूतने ८ जून २०२० रोजी ड्रग्स बॉक्समध्ये ठेवल्याचे त्याचा आचारी आणि त्याच्याकडे घरकाम करणाऱ्या व्यक्तीने पाहिले होते. जेव्हा १४ जून २०२० रोजी राजपूतचा मृत्यू झाला, तेव्हा ते चारही ड्रग्स बॉक्समध्ये नसल्याचे आढळले. हे खुद्द घरकाम करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला.