मल्याळम अभिनेते इनोसंट यांचं निधन, कोरोना अन् कॅन्सरवर मात पण 'या' कारणामुळे गेले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 09:21 AM2023-03-27T09:21:33+5:302023-03-27T09:23:02+5:30
इनोसंट यांनी 700 पेक्षा अधिक सिनेमांत काम केले आहे. तसंच ते मिमिक्रीही करायचे.
प्रसिद्ध मल्याळम अभिनेते आणि माजी राज्यसभा खासदार इनोसंट (Innocent) कोची येथे निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आयसीयूमध्ये होते. काल रात्री १०.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मल्याळम सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
इनोसंट अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या घशात संसर्ग झाला होता. श्वास घेण्यास अडथळा येत होता. ३ मार्च रोजीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे अनेक अवयव काम करणे बंद झाले होते. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
इमोसंट यांना गेल्या तीन वर्षाच तीन वेळा कोरोना होऊन गेला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत गेली होती. तसंच 2021 मध्ये त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांनी कॅन्सरवर मातही केली मात्र त्यांचे शरीर थकले होते. अशातच त्यांना घशात संसर्ग झाल्याने अॅडमिट करण्यात आले होते.
इनोसंट यांनी 700 पेक्षा अधिक सिनेमांत काम केले आहे. तसंच ते मिमिक्रीही करायचे. विनोदी भूमिकांमध्ये ते जास्त दिसायचे. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 2022 साली आलेला 'कडुवा' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. यामध्ये अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनची मुख्य भूमिका होती.
कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
मल्याळम अभिनेता इंद्रजीत सुकुमारन, निर्माते टोविनो थॉमस यांनी सोशल मीडियावरुन इनोसंट यांना श्रद्धांजली वाहिली. तर पृथ्वीराज सुकुमारन याने भावूक होत लिहिले, 'सिनेमाच्या इतिहासातील एका आयकॉनिक अध्यायाचा शेवट. रेस्ट इन पीस लीजेंड.'