आता राहुल गांधींवरही बायोपिक, 'माय नेम इज रा गा'चा टीझर झाला रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 04:21 PM2019-02-09T16:21:45+5:302019-02-09T16:23:21+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या बायोपिकचा ट्रेंड पाहायला मिळतोय. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक येत असल्याचे समजले होते. मात्र आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही चित्रपट येत आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या बायोपिकचा ट्रेंड पाहायला मिळतोय. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक येत असल्याचे समजले होते. मात्र आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही चित्रपट येत आहे. 'माय नेम इज रा गा' असे या चित्रपटाचे नाव असून त्याचा टीझरही प्रदर्शित झाला आहे.
'माय नेम इज रा गा'च्या टीझरमध्ये दाखवल्यानुसार, चित्रपटाची सुरुवात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दृश्यापासून होते व शेवट २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात होते. मूळचे पत्रकार असलेल्या रूपेश पॉल यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. राहुल गांधी यांचं बालपण, अमेरिकेतील विद्यार्थी जीवन आणि राजकीय वादविवादांचे चित्रण यात करण्यात आले आहे.
याबाबत रूपेश पॉल म्हणाले, 'माझा कोणत्याही नेत्याशी काहीही संबंध नाही. या चित्रपटासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. कारण, हा चित्रपट वास्तव परिस्थितीवर आधारित आहे. त्यात जे काही दाखवण्यात आले आहे ते जगजाहीर आहे.'
'माय नेम इज रा गा'मध्ये अश्विनी कुमारने राहुल गांधींची भूमिका साकारली आहे. तर, मोदींच्या भूमिकेत हिंमत कपाडिया आहेत. या चित्रपटात दिग्गज कलाकारांना घेण्याचा विचार होता. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून तो विचार टाळला. कुणाची प्रतिमा मलिन करणे हा माझ्या चित्रपटाचा हेतू नसल्याचे रूपेश पॉल यांनी सांगितले.
द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेरने साकारली होती. आता 'माय नेम इज रा गा' चित्रपटात माजी पंतप्रधानची भूमिका अनुपम खेरचा भाऊ राजू खेर निभावताना दिसणार आहे. याबाबत रुपेशने सांगितले की, 'बऱ्याच लोकांनी ही भूमिका करण्यासाठी नकार दिला होता. मात्र राजू खेर ही भूमिका करण्यासाठी तयार झाले.'
राहुल गांधींचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.