आता धर्म पाहून प्रेम करायचे का? ‘लव्ह जिहाद’ कायद्यावर भडकला अभिनेता जीशान अय्युब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 02:42 PM2020-11-18T14:42:21+5:302020-11-18T14:45:20+5:30
'लव्ह जिहाद'विरोधात मध्य प्रदेश सरकार कायदा आणणार
मध्यप्रदेशचे सत्तारूढ भाजप सरकार लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे, ज्याअंतर्गत दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असेन. मध्यप्रदेश सरकारच्या या प्रस्तावित कायद्यावर तूर्तास अनेक ब-यावाईट प्रतिक्रिया उमटत आहेत. यापैकीच एक प्रतिक्रिया आहे बॉलिवूड अभिनेता मोहम्मद जीशान अय्युबची. लव्ह जिहाद विरोधात कायद्याच्या पार्श्वभूमीवर त्याने केलेले ट्विट सध्या चर्चेत आहेत. आता धर्म पाहून प्रेम करायचे का? असा सवाल त्याने यानिमित्ताने केला आहे.
काय केले ट्विट
प्यार करने पर जेल जाना पड़ेगा!!!
— Mohd. Zeeshan Ayyub (@Mdzeeshanayyub) November 17, 2020
या प्यार करने से पहले धर्म देखना पड़ेगा!!!
घबराइए मत, नफ़रत करने पर कोई नहीं टोकेगा, बल्कि तालियाँ बजाईं और बजवाईं जाएँगी!!👏🏼👏🏼👏🏼
#lovejihaad जैसे झूठ पर क़ानून बनाया जा रहा है! वाह साहेब वाह!!! https://t.co/7IgbrGh5vG
प्रेम केल्यास तुरुंगात जावे लागेल किंवा मग प्रेम करण्यापूर्वी धर्म कोणता ते पाहावे लागेल. घाबरू नका, समाजात द्वेष पसरवणा-यांना कोणी टोकणार नाही. उलट त्यांच्यासाठी टाळ्या पडतील. लव्ह जिहादसारख्या तद्दन खोट्या संकल्पनेवर कायदा बनवला जातोय. वाह साहेब वाह, असे ट्विट मोहम्मद जीशान अय्युबने केले आहे.
मोहम्मद जीशान अय्युब हा बॉलिवूडचा एक दमदार अभिनेता मानला जातो. 2011 मध्ये ‘नो वन किल्ड जेसिका’ या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तो निगेटीव्ह रोलमध्ये दिसला होता. यानंतर ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या सिनेमात तो दिसला होता. जीशानला खरी ओळख सोनम कपूर व धनुषच्या ‘रांझणा’ या सिनेमाने दिले. यात जीशानने धनुषच्या मित्राची भूमिका साकारली होती. ‘तनु वेड्स मनू’मध्ये तो चिंटूच्या भूमिकेत दिसला होता.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यापूर्वी या कायद्याबाबत कल्पना दिली होती. प्रेमाच्या नावाखाली कोणत्याही परिस्थितीत जिहाद सहन केला जाणार नाही, असे चौहान यांनी सांगितले होते. उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. या राज्यांमध्येही लव्ह जिहाद विरोधात कायद्याची तरतूद केली जाणार आहे. आंतरधर्मीय, विशेषत: मुसलमान मुलांनी हिंदू मुलींशी कथितपणे जबरदस्तीने केलेल्या लग्नाला भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी ‘लव्ह जिहाद’ हे नाव दिले आहे आणि त्याविरोधात कायदा आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.