"कमी वयात सोडून गेली", पूनम पांडेच्या 'स्टंट'बद्दल अजित पवारांना माहितच नाही; भर सभेत व्यक्त केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 07:07 PM2024-02-03T19:07:36+5:302024-02-03T19:08:55+5:30
Poonam Pandey Fake Demise: पूनम पांडेच्या स्टंटबद्दल अनभिज्ञ असलेल्या अजित पवारांनी भर सभेत तिला श्रद्धांजली वाहिली.
सोशल मीडिया सेन्सेशन आणि मॉडेल पूनम पांडे तिच्या कॅन्सर जनजागृती स्टंटमुळे चर्चेत आहे. पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शुक्रवारी(२ फेब्रुवारी) सकाळी तिचं निधन झाल्याची पोस्ट शेअर करण्यात आली होती. सर्व्हायकल कॅन्सरमुळे(गर्भाशयाचा कॅन्सर) तिचं निधन झाल्याचं यात म्हटलं गेलं होतं. पण, शनिवारी (३ फेब्रुवारी) स्वत: पूनमनेच जिवंत असल्याचं सांगितलं. त्यामुळे तिला ट्रोलही केलं गेलं. पण, पूनमच्या या जनजागृती स्टंटपासून उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र अनभिज्ञ होते. त्यामुळे त्यांनी एका कार्यक्रमात पूनम पांडेला श्रद्धांजलीही वाहिली.
अजित पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहरातील महानगरपालिका आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या महिला सर्वरोग शिबिराला हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितलं. अजित पवारांनी या भाषणात पूनम पांडेच्या मृत्यूचा उल्लेख करत तिला श्रद्धांजलीही वाहिली. "धकाधकीच्या जीवनात काम करत असताना कधी कोणता आजार होईल हे सांगता येत नाही. कमी वयाची पांडे म्हणून अभिनेत्री होती. तिला गंभीर आजार झाल्याने फार कमी वयात ती आपल्याला सोडून गेली. मला एकच सांगायचं आहे की तुम्ही पण काळजी घ्या. आम्ही पण सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ. महानगरपालिकाही तुमची काळजी घ्या," असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, पूनम पांडेच्या या जनजागृती स्टंटनंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही याबाबत पोस्ट शेअर करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.