अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय; 'सत्यशोधक' सिनेमा महाराष्ट्रात 'टॅक्स फ्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 01:55 PM2024-01-10T13:55:17+5:302024-01-10T13:56:40+5:30
‘सत्यशोधक’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला होता.
मुंबई - राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महायुती सरकारमधील अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकली. राज्य सरकारच्या वित्त विभागाने सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात जाहीर केला आहे.
‘सत्यशोधक’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला होता, यावेळी ज्योतिरावांच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी (Sandeep Kulkarni) आणि सावित्रीमाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajashri Deshpande) यांनी त्यांच्या चित्रपटातील लूकमध्ये एंट्री घेतली. त्यामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि साक्षात, महात्मा ज्योतिबा आणि साऊ यांचं हे प्रेमळ जोडपं आपल्या समोर उभं राहिलं आहे असा भास उपस्थितांना झाला होता. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्राची ओळख सांगताना हा महाराष्ट्र, छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांचा असल्याचं नेहमीच आपण ऐकतो. त्यामुळे, महात्मा फुलेंच्या जीवनावरील चित्रपट टॅक्स फ्री करुन महायुती सरकारमध्ये अजित पवारांनी आपलं पुरोगामीत्व दाखवून दिलं आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
मंत्रिमंडळ निर्णय -
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 10, 2024
● राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.
(महिला व बालविकास)
● ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी.
(ग्राम विकास विभाग)
●शासकिय लेख्यातून…
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, 'सत्यशोधक' मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच, हा चित्रपट सिनेमागृहात टॅक्स फ्री पाहता येईल.
‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. रिलीजनंतरही म. फुले आणि सावित्रीमाईंच्या माहीत नसलेल्या पैलूंची उलगड सिनेमातून झाली आहे. त्यामुळे, चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यातच, महात्मा फुलेंचे विचार आणि कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी राज्य सरकारनेही चित्रपट टॅक्स फ्री केला आहे.
दरम्यान, महात्मा फुलेंच्या भूमिकेत असलेले कसदार अभिनेते संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले होते. यावेळी इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.