अभिनेते भाऊ कदम यांनी हाती बांधले 'घड्याळ'? अजित पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण, मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:35 IST2024-11-05T14:34:43+5:302024-11-05T14:35:49+5:30
अभिनेते भाऊ कदम यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली.

अभिनेते भाऊ कदम यांनी हाती बांधले 'घड्याळ'? अजित पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण, मात्र...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या, मारत आहेत. सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटी देखील प्रचार करताना दिसणार आहे. या धामधुमीत आज अभिनेते भाऊ कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
लोकांना खळखळवून हसवणारे कॉमेडी किंग भाऊ कदम यांनी अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. सध्या त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अजित पवार यांच्या एक्सवर (ट्विटर) एक फोटो पोस्ट केला आहे. "आज प्रसिद्ध मराठी अभिनेते भाऊ कदम यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. सुनील तटकरे, सिध्दार्थ कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते", असं कॅप्शन दिलं.
आज प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भाऊ कदम यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. श्री. सुनील तटकरे, श्री. सिध्दार्थ कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. pic.twitter.com/EwtruWtldd
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 5, 2024
भाऊ कदम यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. पण, भाऊ कदम सक्रिय राजकारणात उतरणार नाहीत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचं अभिनेत्याने स्पष्ट केलं आहे. भाऊ कदम यांच्या भेटीपूर्वी अजित पवार यांच्या पक्षात अभिनेते सजायी शिंदे यांनी प्रवेश घेतलाय. सयाजीराव राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करत आहेत.
महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. काल अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर अखेर विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील कडवी लढत पाहायला मिळणार आहे.