Shivpratap Garudjhep Marathi Movie Review : 'शिवप्रताप गरुडझेप' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:07 PM2022-10-06T17:07:22+5:302022-10-06T20:58:52+5:30

गोष्ट सोळाव्या शतकातील आहे. हिंदवी स्वराज्याचा विस्तार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाच्या छाटलेल्या बोटांचं शल्य औरंगजेबाच्या मनात सलत असतं.

Dr. Amol Kolhe starrer Shivpratap Garud Jhep Movie Review | Shivpratap Garudjhep Marathi Movie Review : 'शिवप्रताप गरुडझेप' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

Shivpratap Garudjhep Marathi Movie Review : 'शिवप्रताप गरुडझेप' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : डॉ. अमोल कोल्हे, यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, महेश फाळके, रमेश रोकडे, आदी ईराणी, विश्वजीत फडते
दिग्दर्शक : कार्तिक केंढे
निर्माते : डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक केंढे
शैली : हिस्टॅारिकल अ‍ॅक्शन ड्रामा
कालावधी : दोन तास १५ मिनिटे
दर्जा : स्टाडेतीन स्टार 
परीक्षण : संजय घावरे


आग्य्राहून सुटका हा छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय आहे. आजवर पुस्तक आणि मालिकेद्वारे समोर आलेला हा संपूर्ण अध्याय या चित्रपटात विस्तृतपणे दाखवण्यात आला आहे. यात शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हेनंच याची पटकथा लिहिली असून, लॅाजिकचा वापर करून बऱ्याच गोष्टी दाखवल्या आहेत. कार्तिक केंढेनं ऐतिहासिक वातावरण निर्मिती करत आग्य्राहून सुटकेचा थरार सादर केला आहे.

कथानक : गोष्ट सोळाव्या शतकातील आहे. हिंदवी स्वराज्याचा विस्तार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाच्या छाटलेल्या बोटांचं शल्य औरंगजेबाच्या मनात सलत असतं. तिकडे मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबतच्या तहात मनाला न पटणाऱ्या वाटाघाटी कराव्या लागल्यानं छत्रपतीही अस्वस्थ असतात. औरंगजेबाच्या वाढदिवसाचं निमित्त काढून छत्रपतींना आग्य्राला बोलावून भर दरबारात त्यांचा अवमान केला जातो. छत्रपती दरबारातून निघून जातात, पण त्यांना आग्य्रातून बाहेर पडू दिलं जात नाही. त्यांना नजरकैद केलं जातं. त्यानंतर रक्ताचा एक थेंबही न सांडता शत्रूच्या तावडीतून सहिसलमत निसटून स्वराज्यात परतण्याचं बुद्धीकौशल्य शिवराय दाखवतात.

लेखन-दिग्दर्शन : पटकथेत अमोलनं लॅाजिकलेस गोष्टी टाळत वास्तवदर्शी घटनांचा विचार केला आहे. त्यामुळेच आजवर इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या गोष्टींपेक्षा वेगळा शेवट यात आहे. अमोलनं युवराज पाटीलांसोबत लिहिलेले संवाद टाळ्या-शिट्यांसोबतच अंगावर रोमांच आणणारेही आहेत. 'स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राहील असंच वर्तन ठेवा', 'दिल्लीच्या तख्ताला मराठी रक्ताची ओळख पटेल', 'जळत्या होळीत हात घालून नारळ काढायचाय', 'मराठयांच्या चिरंतन अभिमानाची लढाई', 'वाघ आणि मराठे सहसा कुणाच्या वाट्याला जात नाहीत, पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय रहात नाहीत', 'धाडस छातीशी आणि मरण पाठीशी बांधून जगतात मराठे', 'शस्त्रांची गरज नाही मराठ्यांना लढण्यासाठी, मनगटातली ताकद अन उरातली हिंमत पुरेशी आहे गनिमाला गाढण्यासाठी' हे संवाद लक्षात राहतात. सुरुवातीला चित्रपट काहीसा मालिकेच्या शैलीसारखा वाटतो. मध्यंतरापूर्वी शिवरायांनी आग्य्राला जाण्याच्या घेतलेल्या निर्णयापूर्वी घडलेल्या गोष्टी आहेत. मध्यंतरानंतर घटना वेगात घडल्यानं थरार वाढतो. आग्य्राहून शिवराय नेमके कोणत्या मार्गानं स्वराज्यात पोहोचले याचं उत्तर चित्रपटात नाही. वाराणसीमधील भोलेनाथाचं गाणं औरंगजेबाच्या पापाची पार्श्वभूमी दाखवण्यासाठी पुरेसं ठरतं. वाघ आला हे शिवरायांचं वर्णन करणारं गाणं आणि गोंधळही चांगला आहे. कॅमेरावर्क चांगलं आहे. काही दृश्यांमधील व्हिएफएक्स बालीश व अनावश्यक वाटतात. संकलनातही गडबड जाणवते. कॅास्च्युम आणि मेकअप सुरेख आहेत.

अभिनय : शिवरायांची भूमिका अमोलने पुन्हा एकदा अत्यंत मेहनतीनं आणि मनापासून साकारली आहे. संवादफेकीपासून देहबोलीपर्यंत तो लक्ष वेधून घेतो. उरात धडकी भरवणारा औरंगजेब साकारताना यतिन कार्येकरांनी जीव ओतला आहे. प्रतिक्षा लोणकरांनी साकारलेल्या जिजाऊ शिवरायांच्या पश्चात स्वराज्यातील शिलेदारांचा उत्साह वाढवणाऱ्या आहेत. सोयराबाईंच्या भूमिकेत मनवा नाईक शोभून दिसते. पल्लवी वैद्यनं पुतळाबाईंची भूमिकाही चांगली साकारली आहे. बहिर्जी नाईक बनलेला अजय तपकिरे बऱ्याच दृश्यांमध्ये ओळखताही येत नाही. शैलेश दातार, हरीश दुधाडे, महेश फाळके, रमेश रोकडे, आदी ईराणी, विश्वजीत फडते यांचंही काम चांगलं आहे.

सकारात्मक बाजू : संवादलेखन, अभिनय, दिग्दर्शन, गेटअप, गीत-संगीत, अ‍ॅक्शन दृश्ये
नकारात्मक बाजू : व्हिएफएक्स, संकलन, मध्यंतरापूर्वी येणारा मालिकेसारखा फील 
थोडक्यात : जागतिक पातळीवर अभ्यासले जाणारे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील थरारक असलेले सोनेरी क्षण अनुभवण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी पहायलाच हवा.

Web Title: Dr. Amol Kolhe starrer Shivpratap Garud Jhep Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.